कोरोना आलाय, काळजी घ्या, चिंता नको!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 07:57 AM2023-12-22T07:57:31+5:302023-12-22T07:58:25+5:30
कोरोना दुसऱ्या लाटेत जसा प्राणघातक भासला तसा आता कधीच भासणार नाही. नियमित औषधे घेतली व विलगीकरण करवून घेतले तर चार दिवसांत आजार बरा होणार आहे.
दीड वर्षापूर्वी आपल्या तोंडचे पाणी पळवून लावणाऱ्या कोरोनाबरोबर अजूनही आपली लपाछपी सुरू आहे. काही काळाकरिता कोरोना लुप्त होतो, मात्र अचानक डोके वर काढतो. सध्या केरळमध्ये ‘जेएन १’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने मान वर काढली आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाच महाराष्ट्रातही ४५ कोरोना रुग्ण आढळून आले. सिंधुदुर्ग या गोव्याला खेटून असलेल्या जिल्ह्यात नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला. सध्या या आजाराची लक्षणे ही सर्दी, खोकला व ताप अशी साधारणपणे थंडी-पावसात फ्ल्यूची असतात तशीच आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण आढळायला लागताच तापाच्या रुग्णांना डॉक्टर अँटिजन अथवा आरटीपीसीआर चाचणी करण्यास भाग पाडणार. चाचण्यांची संख्या जेवढी वाढेल तेवढी रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
कोरोना दुसऱ्या लाटेत जसा प्राणघातक भासला तसा आता कधीच भासणार नाही. नियमित औषधे घेतली व विलगीकरण करवून घेतले तर चार दिवसांत आजार बरा होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मुख्यत्वे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. ज्यांना सर्दी, खोकला ही लक्षणे आहेत त्यांनी तर सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळून कोरोनाचे वाहक बनू नये. गर्दीत प्रामुख्याने रेल्वे, बसमधून प्रवास करताना, बाजारपेठेत मास्क लावणे गरजेचे आहे. कोरोनाने आपल्याला स्वच्छताविषयक धडे दिले आहेतच. वरचे वर हात धुणे, फळे-भाज्या धुतल्याखेरीज न खाणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे गरजेचे आहे. सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोनाची लस बाजारात आली नव्हती तोपर्यंत अशा अनेक गोष्टी आपण एखाद्या कठोर व्रतवैकल्यासारख्या अमलात आणत होतो. कोरोनाची लस आल्यावर आपला जीव भांड्यात पडला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कवचकुंडले प्राप्त झाली. मग आपल्याला कोरोनाने स्वच्छतेच्या शिकवलेल्या धड्यांचा हळूहळू विसर पडला. घराघरातील मास्क कपड्यांच्या गठ्ठ्यात लुप्त झाले. सॅनिटायझरच्या बाटल्या एक्स्पायरी डेट उलटल्याने कचऱ्यात फेकल्या गेल्या. जेव्हा कोरोनाचे रुग्ण आढळतात तेव्हा आपल्याला मास्क, सॅनिटायझर वगैरेंची आठवण होते.
खरेतर कोरोना आपल्या आजूबाजूलाच आहे. लस घेतल्यामुळे आपल्या शरीरात त्याच्याशी लढण्याची शक्ती आहे एवढेच. कोरोनाला मानवी शरीराचेच आकर्षण असल्याने तो रूप बदलून (ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच जेएन १ हे नवे रूप असल्याने) मानवी शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारामुळे कमकुवत झालेले शरीर कोरोनाला प्रवेशाकरिता मिळाले तर मग तो शिरजोर होतो. वृद्धांकरिता कोरोना घातक ठरू शकतो. त्यामुळे कोरोना प्रबळ असो अथवा नसो, त्याचा नवा व्हेरिएंट येवो अथवा न येवो कोरोनाशी लढायचे असेल तर प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवायला हवी. सध्याच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनात पुरेशी झोप, घरचे शिजवलेले स्वच्छ अन्न, माफक व्यायाम, वेळच्या वेळी औषधे, स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करून आपण आपली प्रतिकारशक्ती उत्तम राखू शकतो. प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर कोरोनाने जरी आपल्या शरीरात प्रवेश केला तरी केवळ सर्दी, खोकला व ताप या पलीकडे तो घातक ठरणार नाही.
२००९ मध्ये भारतात आलेला स्वाइन फ्लू आजही डोके वर काढतो. त्याचप्रमाणे कोरोनासोबत आपल्याला पुढील किती वर्षे काढावी लागणार हे कुणीच सांगू शकत नाही. कोरोनाकाळात वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हा रुग्णालयांमध्ये कोरोनाचे स्वतंत्र कक्ष निर्माण केले होते. ज्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला होता तेथे खासगी इस्पितळांनाही कोविड हॉस्पिटल जाहीर केले होते. कोरोनाची चाहूल लागताच पुन्हा वेगवेगळ्या शहरात रुग्णांच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष, ऑक्सिजन, औषधे याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था आपली जबाबदारी चोख पार पाडतील. परंतु, जबाबदार नागरिक या नात्याने ‘व्हॉट्सॲप विद्यापीठात’ येणारे जुने मेसेज, व्हिडीओ फॉरवर्ड करून विनाकारण भय वाढवायचे नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाने साऱ्यांनाच दिलेला आर्थिक फटका आपण पूर्णपणे विसरून चालणार नाही. ख्रिसमस, नववर्ष तोंडावर आले आहे. अनेकांनी बाहेर जाण्यापासून हॉटेलमधील सेलिब्रेशनचे बेत आखले असतील. नववर्षाचे स्वागत जोमात करायचे आहेच. परंतु, सर्व नियम पाळून आपण नव्या वर्षात प्रवेश करताना कोरोनाला मागे दूर दूर टाकायचे आहे, याचा विसर नको.