अग्रलेख : संकटांचा पदरव वाढतो आहे! धुळीच्या वादळाचे चीनमध्ये थैमान, मंगोलियालाही तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:23 AM2021-03-17T03:23:08+5:302021-03-17T06:58:33+5:30
मानवाचा प्रगतीचा ध्यास अघोरी वळणावर पोहोचलेला असून प्रदूषणाचा विळखा आवळू लागल्याचे दर्शवणारे वातावरण बदल केवळ चीनपुरतेच मर्यादित नाहीत, हे आपण भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडला पावसाळा लहरी झालेला आहे.
चीनची राजधानी बीजिंगसह देशाच्या बऱ्याच मोठ्या भागाला सध्या धुळीच्या वादळाने वेढले आहे. या दशकांतील हे सर्वांत मोठे वादळ असल्याचे जाणकार सांगतात. चीनच्या शेजारी असलेल्या मंगोलियालाही या वादळाने तडाखा दिला असून, तब्बल ३४१ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. दोन्ही देशांशी संलग्न असलेल्या गोबीच्या वाळवंटातून येणारे तप्त वारे ही वादळे घेऊन आले आहेत. बीजिंगसह चीनच्या काही प्रमुख शहरांतील रहदारी आणि औद्योगिकीकरणाने या वादळाशी हातमिळवणी करत तिथली हवा इतकी प्रदूषित केलीय की नागरिकांच्या स्वास्थ्याचा फार मोठा प्रश्न त्या देशासमोर उभा राहू शकेल. अशी धुळीची वादळे चीनला नवी नसली तरी त्यांचे सातत्य वाढत असून वनसंहार आणि त्यामुळे जमिनीची होणारी धूप यांच्याशी त्यांचा थेट संबंध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मानवाचा प्रगतीचा ध्यास अघोरी वळणावर पोहोचलेला असून प्रदूषणाचा विळखा आवळू लागल्याचे दर्शवणारे वातावरण बदल केवळ चीनपुरतेच मर्यादित नाहीत, हे आपण भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडला पावसाळा लहरी झालेला आहे. मान्सूनच्या आरंभी पल्ल्यात येणाऱ्या केरळपासून गोव्यापर्यंतच्या पट्ट्यात जानेवारी - फेब्रुवारीमध्ये दमदार पाऊस बरसला. यंदाची थंडी कडाक्याची म्हणण्यापर्यंत गेलीच नाही. तूर्तास उष्णतेच्या लाटेचा पारा अगम्यपणे वरखाली होताना दिसतो.
हिमनग वितळून उत्तराखंडात झालेला हाहाकार अजूनही आपल्या स्मृतीत असेल. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर आपण आवर आणला नाही तर उष्माघात वस्तीला येण्याचा जितका धोका आहे तितकाच दुष्काळ, ढगफुटी, पूर, किनारपट्टीची धूप आदी संकटांची व्याप्ती वाढण्याचाही आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वातावरण बदलाच्या धोक्याला हसण्यावारी नेताना ते अमेरिकेचे पाय ओढण्यासाठी चीनने आरंभलेले कारस्थान असल्याचे विनोदी वक्तव्य वारंवार करायचे. आता चीनमधली धुळीची वादळे आणि अमेरिकेच्या किनारपट्टीला धडकत अवेळी पावसाच्या कहरास कारणीभूत ठरणारी चक्रीवादळे यांनी केलेले नुकसान पाहून त्यांची विनोदवृत्ती अकलेचे कोणते तारे तोडील हे सांगणे अवघड असले तरी निरक्षरालाही समजावे अशा प्रकारे निसर्ग आपल्याला धोक्याचे इशारे देतोय, एवढे निश्चित. भारतापुरते बोलायचे तर गेल्या दोन दशकांत आपल्याकडल्या तापमानात ०.७ अंश सेल्सियसनी वाढ झालेली आहे.
ही वाढ प्रत्यक्षात त्याहून अधिक आहे; पण प्रदूषणामुळे हवेत पसरलेल्या धुळीच्या आणि धुराच्या दुलईने तिला आपल्यापासून थोडेसे दूरच ठेवलेले आहे. आपण आताच उपाययोजना केली नाही तर पुढील पन्नास ते सत्तर वर्षांतली तापमान वाढ ४ अंश सेल्सियसच्या वरची असेल. भारतासह जगातील बहुतेक देशांनी वातावरण बदलाचे परिणाम ओळखून आवश्यक उपाययोजनेसाठीच्या आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केलेल्या असल्या, तरी या देशांचे प्रत्यक्षातले वर्तन निष्काळजीपणाकडेच निर्देश करते आहे.
भारतासह कोणत्याही देशाने हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आवरते घेण्याचे गांभीर्यपूर्वक प्रयत्न सुरूदेखील केलेले नाहीत, असा बिगर सरकारी संघटनांचा दावा असून तो खोडून काढावा असे प्रशासनालाही वाटत नाही. हिंदुकुश हिमालयात गेल्या सहा दशकांत झालेली १.३ अंश सेल्सियसची तापमानवाढ तिथल्या बर्फवृष्टीवर प्रतिकूल परिणाम करू लागली असून, त्यातूनच हिमनगांचे आपल्या मूलाधारांपासून विलग होत आणि वितळत खालच्या लोकवस्तीत येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता गडद झालेली आहे. येत्या काही दशकांत होऊ घातलेली ५.२ अंश सेल्सियसची तापमान वाढ उत्तर भारतावर कसले अरिष्ट आणील याची कल्पनाही करवत नाही.
जमिनीचे तापमान वाढते तेव्हा समुद्रही तप्त होत असतो आणि त्या तापमान वाढीचे अनिष्ट परिणाम मान्सूनचे आगमन व त्याच्या द्वीपकल्पातल्या प्रवासावर होत असतात. पाऊसरहित मान्सूनकाल वाढू शकतो आणि अथक मुसळधारेमुळे ओला दुष्काळही येऊ शकतो. जलसंवर्धन, पर्जन्यजलाची साठवण, भूगर्भातील पाण्याचे नियोजन, पाणी आणि अन्नाची नासाडी रोखणे, कृषीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन, जमिनीची धूप रोखणारी उपाययोजना, नागरी हरितपट्टे आणि नागरी कृषीला उत्तेजन, प्रदूषण नियंत्रण, वनसंवर्धन, वृक्षारोपण, कांदळवनांचे जतन इथपासून आपत्तीनिवारणासाठीच्या सक्षम उपाययोजनेपर्यंत अनेक गोष्टी आपण शासकीय, सामाजिक आणि निम्न स्तरावरही करू शकतो. पण, त्यासाठी आपली तयारी आहे का?