संपादकीय: क्रिकेटचा जीव आखडला? बीसीसीआयनेही तेच केले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:55 AM2023-03-04T07:55:55+5:302023-03-04T07:56:47+5:30
मर्यादित षटकांच्या सामन्यांचा अलीकडे भडिमार होत आहे. अशावेळी खेळाडूंची मानसिकता बदलल्याची टीका होत आहे. पाच दिवसांच्या सामन्यात एकाग्रता टिकविण्यात खेळाडू कमी पडतात, असे जाणकारांना वाटते.
इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर हतबल दिसत होते. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. या पराभवाचे एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास ‘आपण खणलेल्या खड्ड्यात आपणच उताणे पडलो,’असे म्हणावे लागेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत भारतावर दडपण आणले. फलंदाजीत उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धावा काढल्या. चार सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने माघारलेल्या संघाची ही परिपूर्ण सांघिक कामगिरी होती. मर्यादित षटकांच्या सामन्यांचा अलीकडे भडिमार होत आहे. अशावेळी खेळाडूंची मानसिकता बदलल्याची टीका होत आहे. पाच दिवसांच्या सामन्यात एकाग्रता टिकविण्यात खेळाडू कमी पडतात, असे जाणकारांना वाटते. काही अंशी ते खरेही आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केल्यास लक्षात येईल की, कसोटी क्रिकेटमधील रटाळपणा संपविण्याच्या प्रयत्नांत आशियात खेळपट्ट्या निकाल लावणाऱ्या असाव्या, असा नवा विचार पुढे आला. त्यात विश्व कसोटी अजिंक्यपद अर्थात डब्ल्यूटीसीसाठी चढाओढ वाढली. या प्रयत्नांत सर्वत्र जलद निकाल लावणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यावर भर दिला जात आहे.
बीसीसीआयने हेच केले. डब्ल्यूटीसी फायनलसाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघाच्या हितावह अतिघाईत फिरकीला पूरक खेळपट्ट्या बनविण्यावर भर दिला. पहिल्या दोन कसोटींप्रमाणे इंदूरची खेळपट्टीदेखील पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणारी करण्यात आली होती. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करायची होती. त्यामुळे सर्व भारताच्या मनासारखे झाले, अशी क्रिकेट चाहत्यांची भावना होती. मात्र पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे फासे उलटे पडले. कांगारूंच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. कांगारूही फार काळ तग धरणार नाहीत, असे वाटत होते. मात्र त्यांनी झुंजारवृत्ती दाखवली. नागपूर आणि दिल्लीतील दमदार विजयानंतर इंदूरमध्ये ‘टर्निंग विकेट’ मिळाल्यावर भारतीय खेळाडू आनंदात होते. पण इथे स्टीव्ह स्मिथने चांगलाच पलटवार केला. आम्ही विसरलो की कांगारूंकडेही नाथन लायन आणि कोहनेमॅनसारखे फिरकीपटू आहेत, शिवाय मार्नस लाबुशेन, हेड, स्टीव्ह स्मिथ आणि ख्वाजा हे धावा काढणारे फलंदाज आहेत. लाबुशेन आयसीसी फलंदाजी क्रमवारीत नंबर वन आहे. उलटपक्षी आमची फलंदाजी अवसानघातकी आहे. आघाडीचे सर्वच फलंदाज अपयशी ठरत आहेत. या मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात भारत तळाच्या स्थानावरील फलंदाजांच्या कामगिरीमुळे जिंकला.
इंदूरमध्ये तळाचे फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरताच सव्वादोन दिवसांत दारुण पराभव नशिबी आला. घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फिरकी गोलंदाजीपुढे आपले दिग्गज लोटांगण घालताना दिसले. अर्धा-एक तास स्थिरावण्याचा संयम एकाही मोठ्या खेळाडूने दाखविला नाही. पाच दिवसांचा सामना किमान चार दिवस तरी चालायला हवा, ही चाहत्यांची माफक अपेक्षा पहिल्या तिन्ही सामन्यात धुळीस मिळाली. भारताबाहेरही कसोटी सामने पाच दिवस चालत नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना तीन दिवसांत संपला. कसोटी सामन्यात अधिक रंजकता आणण्याचा हेतू असेलही, पण मग अशी आव्हाने स्वीकारण्याची खेळाडूंची तयारी असायला हवी. कसोटीची गुणवत्ता टिकावी यासाठी वरच्या किंवा तळाच्या फळीतील कोणीही चांगली फलंदाजी केली तरी ती संघासाठी उपयुक्त योगदान ठरते, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इंदूर कसोटी जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान काबीज करण्यासोबतच डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे भारताचे मनसुबे होते. पराभवामुळे ते फसले. ऑस्ट्रेलियाने मात्र सुरुवातीचे दोन सामने गमावूनदेखील गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. तिसरा सामना जिंकून अंतिम फेरीतही आपले स्थान पक्के केले. सामना हरल्यानंतर कर्णधार रोहितच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या. कारण पराभवानंतर भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघ पुढचा सामना हरला तर समीकरण अधिकच गुंतागुंतीचे होईल. न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंडने श्रीलंकेचा दोन्ही सामन्यात पराभव करावा किंवा किमान मालिका १-० ने जिंकावी, अशी प्रार्थना करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.