डॉक्टरेट भरपूर; पण 'प्रॉडक्ट' दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 05:45 AM2020-01-04T05:45:49+5:302020-01-04T05:47:11+5:30
शोधनिबंधांची संख्या जगात तिसरी असल्याचा आनंद जरुर आहे; पण लोकोपयोगी ‘अॅप्लाईड’ संशोधन कोणते, भारंभार ‘डॉक्टरेट’चा समाजाला लाभ होतो का, पेटंट-शोधनिबंधांमधून ‘प्रॉडक्ट’ जन्माला येतात का, याची उत्तरे समाधानकारक असल्याचे दिसत नाही.
विज्ञान-तंत्रज्ञानातील शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात भारत जगात तिसरा असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने जाहीर केले. या बाबतीत चीन पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. आता मुद्दा येतो ती ही वाढ गुणात्मक आहे का याचा. पाच हजार वर्षे जुनी संस्कृती असलेल्या या भारतवर्षात काय नव्हते? सोन्याचा धूर निघत होता. क्षेपणास्त्रे उडवली जात होती. ‘टेस्ट ट्यूब बेबी’सारखे वैद्यकीय चमत्कार घडत होते. आयुर्वेदाच्या बाहेरची कोणतीच व्याधी अस्तित्वात नव्हती. फळे-फुलांनी, दुधा-मधाने कृषी संस्कृती बहरली होती. एकूणात काय तर मानवी प्रगतीच्या आणि त्या प्रगतीद्वारे येणाऱ्या सुखाच्या सर्वोच्च सीमा भारताने ओलांडलेल्या होत्या.
फक्त ऐहिक सुखाचीच बात नव्हे. अध्यात्म, योग, पतंजलीच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीही येथे शक्य होती. पुरातन ग्रंथांमधून हे सर्व ज्ञानभांडार ठासून भरल्याची अनेकांची ठाम धारणा आहे. अर्थात पुरावे मागू जाल तर भारतीयांच्या अचाट बुद्धीसामर्थ्याचे, प्रगतीचे आणि कौशल्याचे दाखले केवळ स्थापत्यशास्त्राच्या माध्यमातूनच पाहायला मिळतात. त्यावर युक्तिवाद असा केला जातो, की मध्यंतरीची काही शतके परचक्र, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे भारतीयांची ज्ञानासक्ती लुप्त पावली आणि भारतीय उपखंड अंधारयुगात लोटला गेला. परिणामी यंत्रयुगाच्या आधीपासून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश कायम परप्रकाशी राहिला.
ब्रिटिशांच्या काळात युरोपीय तंत्रज्ञान सुलभतेने भारतात येऊ लागले. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची कवाडे भारतीयांना खुली झाली. गेल्या दीड शतकात डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्यापासून सी. व्ही. रामनांंपर्यंत आणि रवींद्रनाथ टागोरांपासून ते डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेकांनी भारतीयांची बुद्धिमत्ता पाश्चिमात्यांच्या तोडीची असल्याचे सिद्ध केले. भारतीय ज्ञानवंतांचा उदय जागतिक पटलावर होत असल्याची चाहूल लागत असतानाच पुन्हा जणू भारताला ग्लानी आली आणि विज्ञान, उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षणपद्धती आदी बाबतींत पाश्चिमात्यांचे अनुकरण सुरू झाले. सुईसुद्धा परदेशातून आयात होत असल्याचे भारताने पाहिले. खास करून स्वातंत्र्यांनंतर मूलभूत संशोधनापेक्षा ‘कॉपी-पेस्ट’वरच देश अवलंबून राहिला. हरित क्रांतीपासून संगणकांपर्यंत आणि डेअरीपासून जहाजबांधणीपर्यंत भारत पश्चिमेकडे नजर लावून बसू लागला.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी नव्वदीच्या दशकात आर्थिक उदारीकरणाची वाट दाखवली आणि भारताने कूस बदलली. डॉ. भटकरांच्या रूपाने परमसंगणकाची निर्मिती झाली. डॉ. माशेलकरांनी हळदीच्या पेटंटची लढाई जिंकली. रशियाने अडवणूक करूनही क्रायोजेनिक इंजिनाविना भारताचा उपग्रह कार्यक्रम अडला नाही. युरोप-अमेरिकेतल्या सॉफ्टवेअर, मेडिसीन क्षेत्रात भारतीयांनी घोडदौड सुरू केली. अर्थात यातही ‘ओरिजिनॅलिटी’चा मुद्दा पुन्हा-पुन्हा ऐरणीवर येतच राहिला. गेल्या दोन-तीन दशकांत भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाने जगाला काय दिले, याचे उत्तर चटकन सांगता येत नाही.
सध्या डिजीटल, ब्लॉकचेन, लाइफ सायन्सेस यात भारतीयांनी आघाडी घेतली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंगवर चीनचा भर आहे. लोकसंख्येच्या, शारीरिक बळावर नव्हे तर बुद्धिसंपदेच्या जोरावर जगावर स्वामित्व गाजवण्याचा हा काळ आहे. त्यामुळे नुसती संख्या नव्हे, तर शोधनिबंधांची गुणात्मकता आणि व्यावसायिकीकरण होण्याची त्याची क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे ही सरकारची, विद्यापीठांची, संशोधन संस्थांची जबाबदारी असेल. भारतीय ज्ञानवंतांच्या प्रतिभेला परदेशात नव्हे, याच भूमीत धुमारे फुटतील अशा ज्ञानाला प्रतिष्ठा देणाऱ्या वातावरणाची निर्मिती करणे हे समाजाचेही दायित्व आहे; अन्यथा संख्येच्या कौतुकात फार रमता येणार नाही. अॅपल, अॅमेझॉन, अलिबाबासारख्या कंपन्या भारतात जन्माला येणे महत्वाचे.