सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?

By विजय दर्डा | Published: October 14, 2024 07:34 AM2024-10-14T07:34:13+5:302024-10-14T07:35:55+5:30

सण-उत्सवांच्या काळात रस्त्यांवरून रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. इतक्या बेजबाबदार अतिक्रमणांची परवानगी कोण आणि का देते?

Editorial During the festival, the hands of the administration go to eat bananas | सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?

सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

छोटे छोटे प्रादेशिक उत्सव वगळले तरीदेखील आपण भारतवासी दरवर्षी ३० पेक्षा जास्त उत्सव साजरे करतो हे कधी तुमच्या लक्षात आले आहे काय? जगातल्या कुठल्याच देशात इतके उत्सव साजरे केले जात नाहीत. हे उत्सव आपल्याला एका धाग्याने बांधून ठेवण्यात निश्चितच मोठी भूमिका बजावतात; आणि आपले जीवन सुखी समाधानी करतात. उत्सवातील उत्साह, त्यामागची आपली परंपरा आणि रीतिरिवाज रोजच्या जगण्यात रंग भरतात, हे खरेच आहे.

उत्सवाच्या रंगात रंगून जाण्याचा वारसा मलाही मिळाला आहे. मी प्रत्येक धर्माचा उत्सव पूर्ण श्रद्धेने साजरा करतो. कारण उत्सवातील सामाजिकता देश मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असा माझा विश्वास आहे. परंतु यावर्षी माझ्या यवतमाळमध्ये जे काही अनुभवले, त्यामुळे मी अस्वस्थ आहे.  हा केवळ यवतमाळचा प्रश्न नाही, तर जिथे जिथे प्रशासनाच्या अकार्यक्षमेमुळे सर्वसामान्य माणसांना त्रास सोसावा लागतो, त्या प्रत्येक ठिकाणचा हा प्रश्न आहे. नवरात्राच्या पवित्र अशा पर्वकाळात रस्त्यांवर ज्या प्रकारे अतिक्रमण केले गेले होते, ते पाहून मला वाटले, प्रशासन काय करते आहे?  रस्त्यावर चालायला जागा नव्हती. एका रुग्णवाहिकेलाही वळून लांबच्या रस्त्याने जावे लागले हे मी पाहिले. इस्पितळात पोहोचायला झालेल्या उशिरामुळे त्या रुग्णाचे काय हाल झाले असतील याचा विचार कोणी केला का?

नवरात्रीच्या याच दिवसात मी गरब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदाबादमध्ये होतो; याच काळात मी मुंबई आणि नागपूरलाही होतो. रस्ते वाहतुकीसाठी संपूर्णपणे खुले असलेले मी पाहिले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईची व्यवस्था मी दरवर्षी पाहत आलो. एकही रस्ता बंद होत नाही. लाखोंच्या संख्येने लोक उल्हसित होऊन रस्त्यावर उतरतात. चौपाटीवर जमतात. पोलिस त्यांच्या उत्साहात दुपटीने भर घालतात. परंतु वाहतुकीचे नियोजन अशा पद्धतीने केले जाते की कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. उत्सवांच्या काळात मुंबई आणि नागपूरमध्ये वाहतुकीची व्यवस्था ठीकठाक होऊ शकते, तर यवतमाळसारख्या छोट्या शहरात ती तशी का होऊ नये?

उत्सव उत्साहात साजरे केलेच पाहिजेत, हे माझे मत आहे. गुजरातमध्ये सुरू झालेला अंबेची आराधना करणारा गरबा दांडिया आता संपूर्ण देशात खेळला जातो. जाती-धर्माची रिंगणे तोडून लोक दांडिया रास खेळायला जातात. सगळीकडे भक्तीचा अथांग सागर नजरेस पडतो. धर्म आणि जातीचा कुठलाच भेदभाव नाही. गरब्याच्या मंडपात उभा भारत एका धाग्याने बांधलेला दिसतो हा शुभसंकेत होय. हे सगळे आयोजित करताना कुठल्याही रस्त्यावर कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी की नको? कोणाला त्रास व्हावा असे वागायला आपल्या देवीदेवता आपल्याला शिकवत नाहीत. 

यवतमाळमध्ये मी जे पाहिले आणि अन्यत्र लोकांना जो अनुभव येत आहे तो चिंतेचा विषय होय.  न्यायालयांनी पुढाकार घेऊन या विषयावर खटला दाखल करून घेतला पाहिजे. ज्यांनी नियम धाब्यावर बसवण्याचा खोडसाळपणा केला असेल, त्यांच्यावरच नव्हे तर मुख्यत्वेकरून प्रशासनावर खटला दाखल केला पाहिजे. त्यांनी परवानगी दिली कशी? लोकांना त्रास होतो आहे, हे दिसत असताना प्रशासनाने कोणतीच कारवाई का केली नाही? याचा अर्थ प्रशासनावर काही दबाव होता, असा घ्यावा काय? 

माझा प्रश्न गजाननाला आहे, अंबामातेला आहे, न्यायदेवतेलाही आहे - आम्ही आपली आराधना करतो, उपवास करतो; परंतु लोकांना त्रास होऊ नये हे आमच्या लक्षात कसे येत नाही?  आपण जिची भक्ती करतो, त्या देवतेला तरी आपल्यामुळे कमीपणा येऊ नये, हेही समजेनासे झाले आहे का? 

हा सगळा आपल्या व्यवस्थेने माजवलेल्या अराजकाच्या व्यवहाराचा परिणाम आहे. या उत्सवी वातावरणात प्रत्येक ठिकाणी मोठमोठी होर्डिंग्ज लटकावलेली दिसतात. जो उठतो, तो होर्डिंग लावत सुटतो, असे चित्र आहे. याबाबत न्यायालयाने दिलेले आदेश सरळसरळ धुडकावले जातात. ज्यांचे फोटो या होर्डिंगवर झळकत असतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही? किंवा ज्या कंपन्या अशा प्रकारची होर्डिंग प्रायोजित करतात त्यांचा गळा का धरला जात नाही? उत्सवी गजबजाटात प्रशासनाचे हात केळी खायला जातात का?

आता दिवाळी येते आहे. उत्सवप्रियता तर आपल्या भारतीयांच्या रक्तातच असून ती आपली  ओळखही आहे. सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन उल्हसित व्हावे, खूप नाचावे, गावे, खावे, डीजे वाजवावा, फटाके फोडावेत परंतु फटाक्यांनी किंवा डीजेमुळे कुणाचे कान फुटणार नाहीत, याची काळजी मात्र जरूर घ्यावी.

माझा हा स्तंभ वाचून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसारखे वरिष्ठ अधिकारी या गंभीर  मुद्द्याकडे लक्ष देतील अशी मला अपेक्षा आहे.
 

Web Title: Editorial During the festival, the hands of the administration go to eat bananas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.