कोरोना संकटामुळे लोकोत्सवही ‘लॉकडाऊन’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:35 AM2020-06-20T05:35:41+5:302020-06-20T05:37:15+5:30
भारतीय संस्कृती ही उत्सव साजरा करण्यासाठी जेवढी समृद्ध आहे, तेवढीच ती समाज आणि माणसांची काळजी घेण्यासाठीही प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त करणारी आहे. माणसांनी एकत्रच येण्यावर मर्यादा आल्याने त्यांचे व्यवहार मंद झाले आहेत.
गावोगावच्या जत्रा-यात्रा, ऊरुस, कुस्त्यांचे फड, तमाशांचे रंग, परीक्षा संपताच उन्हाळी सुट्ट्यांची धूम, लग्नसराईचा माहोल, आंब्याचा हंगाम आणि कडक उन्हाळा, असे सर्व मार्च ते जूनचे चार महिने जाणार होते. देश-विदेशांतील पर्यटनाचा बहार येणार होता. मनुष्यप्राण्यांच्या या सर्व उत्सवावर कोरोनाचे सावट आले अन् जीवनच निरर्थक वाटू लागले. भीतीचा गोळा प्रत्येकाच्या पोटात आला. प्रशासन हादरले. शासन नावाची यंत्रणा सर्व कामे रद्द करून या सावटाचा परिणाम मनुष्यप्राण्यांवर होऊ नये, यासाठी रात्रीचा दिवस करू लागली आहे. या सावटाची गर्दता अजून संपलेली नाही. किंबहुना दिवाळीचा आनंदसुद्धा लुटता येईल की नाही, अशी शंका आहे.
मान्सूनचा पाऊस सुरू होतो. भारतीय कृषी संस्कृतीच्या नव्या अध्यायाने धरणीमाता हिरवीगार शालू नेसून नवा अंकुर फुलविण्यासाठी तयारी करत असते. सरीवर सरी पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने माणसांची कडक उन्हाळ्यापासून सुटका होते. बैलपोळा साजरा झाला की, नद्यांना येणाऱ्या नव्या पाण्याच्या यात्रा सुरू होतात. अंबील जत्रांनी गावे नटून जातात. अशा एकामागून एक सणांची गर्दीच होऊन जाते. ‘श्रावणमासी, हर्ष मानसी’ गुणगुणावे असे वातावरण बनते. श्रावणात अनेक डोंगरमाथ्यांवर वस्ती करून असलेल्या देव-देविकांच्या यात्रांचा उत्सव रंगत असतो. भारतीय मनुष्याच्या मनात उत्सवांची मोठी भाऊगर्दी असते. तेवढ्यात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू होते. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सवाने संपूर्ण महाराष्ट्र न्हाऊन निघतो. कोरोनाने या जीवनपद्धतीचा बेरंग करून सोडला आहे. माणसाने समूहाने राहणे आणि आनंदी जगणे यावरच मर्यादा आल्या आहेत. परिणामी, हजारो-लाखोंच्या संख्येने लोकांना एकत्र आणणारा लोकोत्सव कसा साजरा करता येईल, याची चिंता पडणे साहजिकच आहे.
मध्यंतरीच्या काळात मुस्लिम समाजबांधवांचा पवित्र रमजान महिना येऊन गेला. त्यासाठी केवळ मुस्लिमच नव्हे, तर हिंदू बांधवही एकत्र येत असतो. त्याला मर्यादा आल्या. रमजानचा शेवटचा उपवास चंद्रदर्शनाने संपतो आणि सामूहिक नमाज पठण होते. त्यासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येतात. त्यांना हिंदू बांधवही शुभेच्छा देतात. तो रमजान साजरा करता आला नाही. मुस्लिम बांधवांना एकत्र येण्याचे टाळून घरोघरीच नमाज पठण केले. हा कोरोनाच्या सावटाने बदललेला समाज आहे. त्याचा प्रसार अद्याप थांबलेला नाही. २४ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये वाटचाल करायचा थांबला आहे. उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण बंद आहे. अशा परिस्थितीत दरमहा येणारे सणवार साजरे कसे करायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने घरगुती स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बहुतेक महानगरांत गणेशोत्सव मंडळांची एकी घडवून आणणारे संघ किंवा महामंडळे आहेत. त्यांच्याही बैठका होत आहेत आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे निर्णय घेण्यात येत आहेत.
लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. त्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी झाले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षणसंस्थांची मंदिरे बंद आहेत. यावर तोडगा काढता आलेला नाही. अशा या अभूतपूर्व संकटाच्या काळी गणेशोत्सवासह सर्वच सणवार व यात्रा, जत्रा यांच्याविषयी सामंजस्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भारतीय संस्कृती ही उत्सव साजरा करण्यासाठी जेवढी समृद्ध आहे, तेवढीच ती समाजाची आणि माणसांची काळजी घेण्यासाठीही प्रबळ इच्छाशक्ती व्यक्त करणारी आहे. माणसांनी एकत्रच येण्यावर मर्यादा आल्याने त्यांचे व्यवहारच मंद झाले आहेत.
कोरोनाचा सामना करताना आजवर कष्ट पडले तरी संयम पाळला आहे तसाच यापुढेही पाळावा लागणार आहे. कोरोनाचा विषाणू समाजात असणार आहे. त्याची साखळी होऊन प्रसार होणार नाही, हीच दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्सवाचा, आनंदाचा त्यागही करण्यास आपणास तयार राहावे लागणार आहे. गणेशोत्सव हा समाजाचे मन सजग करण्यासाठी आहे. त्यामुळे तो साधेपणाने साजरा करणे, हेदेखील एकप्रकारे सार्वजनिक कार्यच ठरणार आहे. ते समाजाने स्वीकारावे, यातच सर्वांचे भले आहे.