प्रचाराची घसरती पातळी चिंतादायीच!

By किरण अग्रवाल | Published: May 9, 2019 08:19 AM2019-05-09T08:19:16+5:302019-05-09T08:20:31+5:30

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे टप्पे जसजसे उत्तरार्धाकडे जात आहेत, तसतशी प्रचाराची पातळी घसरत असून, ती विकासाऐवजी व्यक्तिकेंद्री होत आहे

Editorial on elections campaign downfall on personal allegations | प्रचाराची घसरती पातळी चिंतादायीच!

प्रचाराची घसरती पातळी चिंतादायीच!

Next

किरण अग्रवाल

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचे टप्पे जसजसे उत्तरार्धाकडे जात आहेत, तसतशी प्रचाराची पातळी घसरत असून, ती विकासाऐवजी व्यक्तिकेंद्री होत आहे. तसेही व्हायला एकवेळ हरकत नाही; परंतु व्यक्तिगत विखार त्यातून प्रदर्शित होऊ लागल्याने, अशातून खरेच लोकशाहीचे बळकटीकरण घडून येणार आहे का, हा प्रश्न उपस्थित व्हावा. सुदृढ व परिपक्व लोकशाहीचे गोडवे आपण गात असताना त्याच लोकशाहीचा उत्सव म्हणवणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात देशापुढील प्रश्नांची चर्चा घडून येण्याऐवजी प्रचाराची पातळी व्यक्तिगत निंदा-नालस्तीच्या वळणावर येऊन पोहोचणार असेल तर ती एकाचवेळी चिंता आणि चिंतनाचीही बाब ठरावी.

सतराव्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून, अखेरच्या दोन चरणातील ११८ जागांसाठीचे मतदान होणे अद्याप बाकी आहे, त्यामुळे देशातील निवडणुकीचा प्रचार अगदी चरणसीमेवर पोहोचला आहे. अर्थात, प्रचार म्हटला की, त्यात आरोप-प्रत्यारोप होतच असतात; पण यंदा त्यात अधिकचीच भर पडली असून, पक्ष व त्यांची धोरणे किंवा विकास आदी मुद्दे बाजूला पडून व्यक्तिकेंद्री आरोपांचे प्रमाण टोकाला गेले आहे. इतिहासातील दुर्योधन, अफजल खान, औरंगजेब आदी व्यक्तिरेखांशी तुलना करीत हे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांना वेगळी धार प्राप्त होऊन गेली आहे. या टोकदार प्रचारात स्वाभाविकच अन्य मुद्दे हरवून गेले आहेत. विशेष म्हणजे, स्वबळावर दोन अंकी जागा प्राप्त करू शकणा-या व त्रिशंकू स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या नेत्यांनी प्रचाराला अधिक टोकदार केले असून, यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनजी यांचे नाव अग्रणी असल्याचे दिसून येत आहे.

आजवर डाव्यांचा गड म्हणून ओळखल्या गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांप्रमाणेच दंडेलशाही करून ममतादीदींनी त्यांचे राजकारण चालविले आहे. त्यामुळे तेथे खरा सामना ममता व मोदी यांच्यातच होत आहे. परिणामी डावे घरातल्याच अंगणात संकोचले आहेत. ‘आज के दिनेर सीपीएम देर कोनो कोथाही नेई, सुदू म्हात्रो मोमोता दिदीर आर नरेंद्र मोदीर कोथा होच्चे!’... म्हणजे, कम्युनिस्टांची कुठेही चर्चा होताना दिसत नाही, ममतादीदी व नरेंद्र मोदी यांचाच सर्वत्र बोलबाला आहे. परिणामी या दोघांत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडून गेली आहे. मोदी यांनी बंगाली जनतेला आपलेसे करण्यासाठी ‘फणी’ वादळग्रस्तांच्या मदतीत ममता बॅनर्जी अडथळे आणत असल्याचा आरोप केला आहे, तर ममतांनी ‘एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या पंतप्रधानांशी आपण बोलणार नसल्याचे’ सांगून मोदींवर निशाणा साधला आहे. या दोन्ही नेत्यांमधील टोकाचा प्रचार पाहता स्थानिक कार्यकर्त्यांतही वाद होत असून, पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानात आसनसोल, बराकपोर आदी ठिकाणी हिंसाचार व गडबडी घडून आल्याचे दिसून आले आहे.

या टोकाच्या प्रचाराला संदर्भत आहे तो अर्थातच आपापले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या हेतूचा. कारण, पश्चिम बंगालमध्ये मोदी यांना समाधानकारक यश मिळवता आलेले नाही. गेल्यावेळी २०१४ मध्ये अवघ्या दोनच जागांवर त्यांना समाधान मानावे लागले होते. यंदा उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणी घटू शकणा-या जागांची कसर ते बंगालमध्ये काढू पाहात आहेत, त्यामुळे ममतादीदी रागावल्या आहेत. दुसरे म्हणजे, जर केंद्रात त्रिशंकू अवस्था आकारास आलीच, तर त्या स्थितीत ममतादीदींची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. यापूर्वी ज्योती बसू यांना चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी डाव्यांनी घालवून मोठी चूक केली, आता पुन्हा बंगालच्या बेटीला ती संधी आल्याचे तृणमूलचे नेते सांगत आहेत. यावरून मोदी व ममतांमधील टोकाच्या प्रचाराचे कारण स्पष्ट व्हावे; पण तसे असले तरी, ज्या टोकाला जाऊन निवडणुकीचे रण लढले जात आहे, त्यासाठी व्यक्तिगत आरोपांचा धुरळा उडत आहे व त्यातूनच कार्यकर्ते-समर्थकांत धुमश्चक्री उडत आहे, ते अवघे समाजमन गढूळ आणि भयभीत करणारेही ठरत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दलची नकारात्मकता वाढीस लागण्याची भीती नाकारता येऊ नये. प्रचारातील घसरत्या पातळीबद्दल चिंता वाटणे म्हणूनच स्वाभाविक ठरले आहे.  

Web Title: Editorial on elections campaign downfall on personal allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.