संपादकीय: खेळ की खेळखंडोबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:45 AM2024-10-01T09:45:25+5:302024-10-01T09:47:27+5:30

पूर्ण राज्यासह विशेष दर्जा असलेल्या जम्मू-काश्मीर व लेह-लडाखच्या मतदारांनी २०१४ मध्ये त्रिशंकू काैल दिला होता.

Editorial: Game or game in Jammu Kashmir assembly Election? | संपादकीय: खेळ की खेळखंडोबा?

संपादकीय: खेळ की खेळखंडोबा?

दहा वर्षांच्या खंडानंतर होणाऱ्या जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी ते राज्य सज्ज आहे. आधीच्या १८ व २५ सप्टेंबरच्या दोन टप्प्यांमध्ये अनुक्रमे २४ व २६ जागांसाठी मतदान झाले. ९० सदस्यांच्या विधानसभेतील उरलेल्या ४० जागांवर आता शेवटच्या टप्प्यात आज, मंगळवारी मतदान होईल. आधीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये साठ टक्क्यांच्या आत-बाहेर मतदान झाल्यामुळे सिद्ध झाले की, ३७० कलमाच्या रूपाने विशेष दर्जा गमावलेल्या या केंद्रशासित प्रदेशातील जनतेत लोकशाही प्रक्रियेप्रति मोठे आकर्षण आहे. त्याचे कारण मधल्या काळात झालेल्या जिल्हा कौन्सिलच्या निवडणुका वगळल्या तर २०१४ नंतर प्रथमच या बहुचर्चित प्रांतातील मतदार निवडणुकांमधील अधिकार वापरत आहेत. या दहा वर्षांत जम्मू-काश्मीरचे राजकीय चित्र आमूलाग्र बदलले.

पूर्ण राज्यासह विशेष दर्जा असलेल्या जम्मू-काश्मीर व लेह-लडाखच्या मतदारांनी २०१४ मध्ये त्रिशंकू काैल दिला होता. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे पीडीपी २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष होता. भाजपला २५, तर नॅशनल काॅन्फरन्स व काँग्रेसला अनुक्रमे १५ व १२ जागा मिळाल्या. अगदी अनपेक्षितपणे भाजपने पीडीपीसोबत युती केली. मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री बनले. तथापि, दोन वर्षांतच त्यांचे निधन झाले. मेहबूबा मुफ्ती यांच्याकडे ते पद आले. ही युती अभद्र असल्याचा आरोप होत असल्याने भाजपने आणखी दोन वर्षांनी, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ती युती तोडली. त्यामुळे मेहबूबा सरकार कोसळले. नंतर विधानसभा बरखास्त झाली आणि राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ३१ ऑक्टोबर २०१९ ला ३७० कलम हटविले आणि जम्मू-काश्मीर व लेह-लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या निवडणूक होत आहे. अर्थातच या घटनाक्रमामुळे उद्याच्या मतदानावेळीही मतदारांचा असाच उत्साह पाहायला मिळू शकतो. किंबहुना या टप्प्यात त्याहून अधिक मतदान होईल. कारण, या टप्प्यात जम्मू प्रांतातील २४ आणि काश्मीर खोऱ्यातील १६ जागा आहेत. जम्मूमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होऊ घातला आहे, तर काश्मीर खोऱ्यात नॅशनल काॅन्फरन्स, काँग्रेस अशा इंडिया आघाडीतील घटक पक्षांपुढे जेके पीपल्स काॅन्फरन्स, अवामी आझाद पार्टीचे आव्हान आहे. याशिवाय, मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी, अपनी पार्टी तसेच गुलाम नबी आझाद यांची डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी हे पक्षही रिंगणात आहेत. थोडक्यात, जम्मूची जनता ज्यांना काैल देईल, ते पक्ष सत्तेच्या अधिक जवळ जातील.

भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना स्थानिक पक्षांच्या आधारे ही निवडणूक लढवावी लागत आहे. हे पक्ष निवडणुकीत कशी कामगिरी करतात यावर सत्ता स्थापनेची गणिते निश्चित होतील. जम्मू-काश्मीरसोबत निवडणुकीसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होत असलेल्या हरयाणातही असेच स्थानिक पक्षांच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष असेल. या राज्याला तर राष्ट्रीय पक्षांची समीकरणे बिघडवणाऱ्या स्थानिक पक्षांची मोठी परंपरा आहे. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला यावेळी हॅट्‌ट्रिक खुणावत असेल. तथापि, लोकसभा निवडणुकीत राज्यातील निम्म्या, म्हणजे पाच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. ९० सदस्यांच्या हरयाणात विधानसभेच्या प्रत्येकी ८९ जागा भाजप व काँग्रेस लढवत असली तरी तेथील खरा खेळ इतर पक्षांवर अवलंबून आहे. देवीलाल, बन्सीलाल व भजनलाल या दिग्गजांच्या राजकारणासाठी देशभर ओळख असलेल्या हरयाणात सध्या भजनलाल व बन्सीलाल यांच्या पुढच्या पिढ्या भाजपमध्ये आहेत. बन्सीलाल यांच्या सूनबाई किरण चाैधरी भाजपच्या राज्यसभा सदस्या आहेत, तर नात श्रुती चाैधरी तोशाम मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांचा सामना चुलत भाऊ अनिरुद्ध चाैधरी यांच्याशी आहे. भजनलाल यांचे चिरंजीव कुलदीप बिष्णोई हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. देवीलाल यांचे पणतू दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टीच्या मदतीनेच गेल्यावेळी भाजपला सत्ता स्थापन करता आली. तथापि, नंतर दोन्ही पक्षांमध्ये बेबनाव झाला. हरयाणात २०१९ मध्ये ५३ जागा अशा होत्या, की विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराची मते अधिक होती. आताही जेजेपी-आझाद समाज पार्टी युती, लोकदल व बसपा युती, तसेच आम आदमी पक्ष, असे तीन तगडे तिसरे खेळाडू रिंगणात आहेत. ते कुणाचा खेळ बिघडवतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Web Title: Editorial: Game or game in Jammu Kashmir assembly Election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.