संपादकीय - बाप्पा, तुझ्या स्वागतासाठी खड्डेयुक्त रस्ते तयार..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:46 AM2022-07-24T07:46:29+5:302022-07-24T07:47:09+5:30
बाप्पा, तू चराचरात व्यापलेला आहेस. मात्र महाराष्ट्रात येताना तुला अन्य कोणत्याही देशाची आठवण येऊ नये
अतुल कुलकर्णी
प्रिय गणपती बाप्पा,
साष्टांग दंडवत.
तुझ्या आगमनाला आता फक्त एक महिनाच उरला आहे. तुझ्या स्वागताची आम्ही जय्यत तयारी सुरू केली आहे... मध्यंतरी मोठा पाऊस झाला. त्यामुळे आम्ही थोडे गडबडलो. मात्र, आता पावसाची सगळी खबरदारी घेऊन आम्ही तयारी सुरू केली आहे. तुझ्या आगमनानिमित्त मिरवणुका निघणार. आमच्या सरकारनेसुद्धा तुझ्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे... त्याचाच भाग म्हणून जागोजागी तुझ्यासाठी खड्डे करून ठेवले आहेत. विशेष म्हणजे या कामाचे श्रेय घ्यायला कोणीही पुढे येत नाही... बाप्पाचं काम, त्याचं श्रेय कसं घ्यायचं..? असं म्हणतात सगळे नेते..! किती चांगल्या विचाराचे आहेत ना बाप्पा हे सगळे... आता या कामाचं श्रेय आधीच्या सरकारचं की आताच्या सरकारचं..? हे मात्र तुलाच ठाऊक... आम्हाला तुझ्यासाठी खड्डेयुक्त रस्ते झाले याचाच जास्त आनंद आहे. आम्ही मध्यमवर्गीय माणसं... तुझ्या स्वागतासाठी कोणीतरी काहीतरी करत आहे, याचाच आम्हाला आनंद... त्यामुळे सगळ्या राज्यभरातले रस्ते खड्ड्यांनी भरून टाकण्याचं नेक आणि उत्तम काम कोणत्या सरकारनं केलं हे तूच ठरव... आम्हाला त्या वादात नको घेऊस... नाहीतर, उद्या आम्ही या गटाचे की त्या गटाचे, असे विचारायला लागतील... कुठल्या एका गटाचं नाव घेतलं तर दुसरा गट आम्हाला वर्गणी देणार नाही... तेव्हा जो आमच्याकडे येईल त्याला “आम्ही तुमचेच,” असं सांगून मोकळे होतो. बरोबर करतो ना बाप्पा आम्ही..?
बाप्पा, तू चराचरात व्यापलेला आहेस. मात्र महाराष्ट्रात येताना तुला अन्य कोणत्याही देशाची आठवण येऊ नये, याचीदेखील सोय आमच्या इथं सरकारनं करून ठेवली आहे. जागोजागी आम्ही जे खड्डे केले आहेत, ते वेगवेगळ्या देशांच्या नकाशांचा विचार करून केले आहेत. त्यामुळे तुला एकट्या महाराष्ट्रातच सगळ्या जगाची सफर केल्याचा आनंद मिळेल. खड्डे पडल्यामुळे खालची काळी माती छान दिसू लागली आहे. त्यात पाणीही साचलं आहे...! आमच्या पोरांनी त्यात फुलांची रोपं लावली आहेत. महिन्याभरात चांगली फुलं फुलतील. तीच फुलं सजावटीला कामाला येतील... आम्ही किती बाजूंनी सगळ्या गोष्टींचा विचार करतो हे तुझ्या लक्षात आलं असेलच... आणि किती कल्पक आहोत हेही तुला आता पटलं असेल. यावेळी पाऊस आला तर तुझी नाही, पण आमची अडचण होऊ नये म्हणून आम्ही पत्र्याचे मजबूत मंडप टाकायला सांगितले आहेत. पूर्ण दहा दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. पत्ते कोणी आणायचे... हिशोब कोणी लिहून ठेवायचा... वर्गणी कोणी गोळा करायची... ही कामेदेखील वाटून दिली आहेत. तुझ्या दर्शनाला भल्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळं यावेळी कमीतकमी वेळात जास्तीतजास्त लोक कसं दर्शन घेतील याचं प्रशिक्षण आत्तापासून आम्ही सुरू केलं आहे. लोक उगाच आमच्यावर ढकलाढकली केल्याचा आरोप करतात... आता एवढी गर्दी उरकायची म्हणजे धक्काबुक्की होणारच... त्यामुळे आमची कोणी तुझ्याकडं तक्रार केली तर तू फार गंभीरपणे घेऊ नकोस... आमचा हेतू तुझं दर्शन लवकरात लवकर कसं संपवता येईल हा असतो... कारण, अनेक व्हीआयपी लोक येत असतात. सिनेमाचे सेलिब्रेटीज.... राजकारणी... अधिकारी... पत्रकार... त्या सगळ्यांचं दर्शन नीट झालं पाहिजे... ते जास्त महत्त्वाचं आहे बाप्पा...! आमची कामं पडतात या लोकांकडे... त्यामुळे या लोकांचं दर्शन नीट झालं की पुढे वर्षभर काम करायला सोपं जातं... त्यामुळे तुझ्याकडे येणाऱ्या तक्रारींकडे तू दुर्लक्ष कर..!
विसर्जनाच्या दिवशी आम्ही धामधुमीत मिरवणूक काढतो. मुंबईची शान असणाऱ्या समुद्रात तुझं विसर्जन करतो. नेमकं दुसऱ्या दिवशी ओहोटी येते आणि ठिकठिकाणी भंगलेल्या मूर्ती दिसू लागतात... त्यात आमचा काहीही दोष नाही. बाप्पा महापालिकेने काळजी घ्यायला नको का..? असो. तुझ्या आगमनाआधीच तुझ्या विसर्जनाची चर्चा कशाला..? तू आलास की बाकीचे विषय आपण बोलू. जाता जाता एक सांगतो, यावेळी भन्नाट डीजेचं बुकिंग केलं आहे... वेगवेगळ्या हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून घेतलंय... बाप्पा भजन, कीर्तन, भावगीत अशा गोष्टी कोणी ऐकत नाही... जुना जमाना गेला... त्यावेळी नाटकं व्हायची, संगीताचे कार्यक्रम व्हायचे, आता भव्यदिव्य देखावा करू.... लोक तो बघायला येतील... डीजे लावू.... बाप्पा, तू ये तर खरं... बघ आम्ही किती जय्यत तयारी केली आहे ते.... - तुझाच, बाबूराव
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक, आहेत)