Editorial: संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:03 AM2021-11-03T10:03:55+5:302021-11-03T10:05:26+5:30

सोन्याच्या खरेदीला झळाळी येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाज्या, अन्नधान्ये, बसप्रवास महाग झाला असताना गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे, ते  सोनेच. त्यामुळे यंदा दिवाळीत सोन्याची खरेदी अधिक होईल.

Editorial: gold 2500 rupees Cheaper than last year | Editorial: संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त

Editorial: संपादकीय! सोने पे सुहागा; गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त

Next

आपण सर्व भारतीयांना पूर्वापार सोन्याचे भलतेच आकर्षण. सणासुदीला आपण हमखास सोने विकत घेतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असो की घरातील विवाह असो किंवा गुंतवणूक वा बचत म्हणून असो, आपले सोन्याशी एक भावनिक नातेही आहे. त्यामुळे प्रेयसी वा प्रियकर यांनाही प्रेमाने सोना, सोनिया, सोनू, सोनी, अशा नावाने हाक मारली जाते. आपण आवडणाऱ्या पिवळ्या चाफ्यालाही सोनचाफा हे नाव दिले आहे. गाण्यातही आपण सोने आणले आहे, ‘ओ मेरे सोना, सोना कितना सोना है’पासून सोनियाचा दिवस आजि, सोनियाचा पाळणा, सोनियाच्या शिंपल्यात... अशी किती तरी. अनेक चित्रपटांत सासू तिच्या सासूने दिलेले दागिने आपल्या सुनेला देते. लग्नात आई मुलीला दागिने देते. इतकेच काय, मुलगी वर्षभराची झाल्यापासून, तिच्या लग्नात द्यावे लागेल, म्हणून आई- बाप थोडेथोडे सोने घेत असतात. अनेकदा ते अर्धा वा एक ग्रॅम असते. तसे करून मुलीचे लग्न ठरताना आई-वडिलांनी बक्कळ सोने जमवून झालेले असते. अनेक मुलींना, महिलांना सोन्याचा सोस असतो. त्या सतत सोने घेतात, त्याचे दागिने बनवतात, मोडतात, नवे बनवतात. काही जणी आता जुन्या पद्धतीच्या दागिन्यांच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. भारतातील महिलांकडेच सुमारे २५ हजार टन सोने आहे, असा एक अंदाज आहे. मंदिरे, देवस्थाने यांच्याकडे असलेले सोने व दागिने तर वेगळेच. केरळमधील एकट्या पद्मनाभस्वामी मंदिराकडे ९० हजार कोटी रुपये किमतीचे सोने व दागिने आहेत. आता पुरुषही सोन्याच्या प्रेमात पडले आहेत. बप्पी लाहिरी, दालेर मेहंदी यासारखे कलाकार अंगभर दागिने घालून फिरतात. त्यांचे अनुकरण करणाऱ्या अनेकांच्या अंगावर तर दोन किलो, तीन किलो सोने अस्ताव्यस्त पसरलेले असते. याची आठवण येण्याचे कारण म्हणजे यंदा सोने स्वस्त आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल अडीच हजार रुपयांनी स्वस्त. त्यामुळे सोन्याच्या खरेदीला झळाळी येताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, भाज्या, अन्नधान्ये, बसप्रवास महाग झाला असताना गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त आहे, ते  सोनेच. त्यामुळे यंदा दिवाळीत सोन्याची खरेदी अधिक होईल. सराफ आणि सुवर्ण व्यावसायिकांच्या मते यंदा  ३० टक्के अधिक खरेदी हाेईल सोन्याची. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर तब्बल ८०० कोटी रुपयांची सोनेखरेदी होईल, असा अंदाज आहे. यंदा असे होण्याची अनेक कारणे आहेत. एक तर वर्ष, दीड वर्ष आपण सारे कोरोना संसर्गाच्या सावटाखाली होतो. सतत दडपण, भीती असे वातावरण. त्यामुळे गेली दिवाळी उदास होती. खरेदीचा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे भय संपल्यात जमा आहे. तिसरी लाट आली नसल्याने समाधान आहे. त्यामुळे दिवाळी उत्साहात साजरी करण्याचा मूड आहे. सोने खरेदीचे दुसरे कारण अर्थातच ते यंदा स्वस्त असले तरी पुढील काळात त्याचा भाव वाढत जाणार हे आहे. त्यामुळे ते विकत घेण्याकडे कल असणे स्वाभाविकच. तिसरे कारण म्हणजे अनेक मध्यमवर्गीयांना शेअर बाजारात पैसा गुंतवायची भीती वाटते. ती मोठी जोखीम असते. रोजच्या रोज कोणता शेअर कोसळतोय, कोणता वर जातोय, हे पाहत बसायला वेळ नाही आणि नुसते शेअर ठेवले आणि काही काळाने त्यांचा भाव कोसळला तर काय घ्या, या भीतीने त्याकडे मराठी मध्यमवर्ग शक्यतो फिरकत नाही. ते योग्य नसेलही; पण वस्तुस्थिती आहे. आणखी एक कारण म्हणजे आपल्याला बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवणे सुरक्षित वाटते, हे खरे असले तरी गेल्या काही वर्षांत त्यावर मिळणारे व्याज कमी कमी होत चालले आहे.

कमाईतील मोठी रक्कम बँकेत ठेवूनही फार परतावा नसेल, तर काय फायदा, हा विचार असतो. घर, जमीन घ्यायची तर कैक लाख रुपये हातात नाहीत. आपण एक तोळा, अर्धा तोळा सोने घेणारे लोक. तेवढी रक्कम असते आपल्याकडे. त्यामुळे सोन्याची खरेदी व ते जपून ठेवणे हाच खरा मध्यमवर्गीयांचा गुंतवणुकीचा मार्ग बनत चालला आहे. यावर्षीच्या दिवाळीने हा मार्ग अधिक सुकर केला आहे. दिवाळी संपताच विवाहाचे मुहूर्त सुरू होतील. गेल्या वर्षी लग्नावरही निर्बंध होते. त्यामुळे विवाह साधेपणानेच पार पडले वा पुढे ढकलण्यात आले. आता बंधने कमी झाल्याने लग्नसोहळे दणक्यात होतील आणि सोन्यापासून सारीच खरेदी जोरात होईल. चांदीचे भावही बऱ्यापैकी स्थिर असल्याने यंदा सणाला चंदेरी झालर दिसत असून, सराफा बाजारही आनंदला आहे. ही दिवाळी जणू सोनियाच्या पावलांनीच आली आहे.
महागाईच्या काळात पिवळा धातू स्वस्त होणे म्हणजे सोने पे सुहागाच.

Web Title: Editorial: gold 2500 rupees Cheaper than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं