संपादकीय: पावसाचे शुभवर्तमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:58 AM2021-04-20T04:58:16+5:302021-04-20T04:59:14+5:30

सलग दुसऱ्या वर्षी भारतात सर्वत्र पाऊस सरासरीइतका होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Editorial: Good news of rain! | संपादकीय: पावसाचे शुभवर्तमान!

संपादकीय: पावसाचे शुभवर्तमान!

Next

एका मराठी चारोळीकाराने म्हटले आहे की, पावसाचे आघात झेलूनच माती बनते सुगंधी, तिचा गोडवा पसरताच वातावरण होते आनंदी ! नैर्ऋत्य  मोसमी पावसाचे आगमन होताच खऱ्या अर्थाने भारतीय कृषी व संस्कृतीचा उत्सव सुरू होतो. त्याचे आगमन वेळेवर झाले की, शेतकरीवर्ग आनंदाने आयुधे बाहेर काढून सुगंधी बनलेल्या मातीत पेरणी करायला तयार होतो. नैर्ऋत्य दिशेने हिंदी महासागरातील तापमानावर अवलंबून असणारे वारे वाहू लागताच वातावरणातला आल्हाददायी उत्साह वाढीस लागतो. पेरण्या होतात. खरीप हंगाम चांगला जाण्यास या मोसमी पावसाचे महत्त्व भारतीय उपखंडात अधिकच जाणवते.

सलग दुसऱ्या वर्षी भारतात सर्वत्र पाऊस सरासरीइतका होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उन्हाळ्याचा चटका जाणवू लागतो तसा हवामान खात्याचा अभ्यासही सुरू होतो. एप्रिलच्या प्रारंभीच हा अंदाज येऊ लागतो की, चालू वर्षात १ जूनपासून सुरू होणारा पावसाळा किती असणार आहे. त्याच्याशी भारतीय अर्थकारणाची सांगड मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मार्चअखेरीस लॉकडाऊन जाहीर करताच उत्पादनापासून सेवा क्षेत्रापर्यंतची आर्थिक घडी विस्कटली होती. तेव्हा उत्तम पाऊस झाल्याने कृषिक्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सांभाळले, असे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पटलावर नोंदविले होते. याला उत्तम पाऊसमान हेच कारण होते. २०२० हे साल कोरोनाच्या संसर्गामुळे कायमचे स्मरणात राहत असताना गेल्या वीस वर्षांतील पावसाच्या नोंदीचा टप्पा पार करीत १०९ टक्के पाऊस झाला होता. मध्य भारतातील थाेडासा भाग वगळला तर सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. भारतीय शेतकऱ्यांनी गतवर्षी ११ कोटी १६ हेक्टर शेतीवर पेरणी केली हादेखील एक विक्रमच होता. त्याच्या मागील वर्षी  खरिपाची पेरणी १० कोटी ६६ लाख हेक्टरवर झाली होती. शेती क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पादनात चौदा टक्के वाटा असला तरी देशाच्या निम्म्या लोकसंख्येला रोजगार देण्याची महत्त्वाची भूमिका कृषिक्षेत्राकडून बजावली जाते. हेच कृषिक्षेत्र मोसमी पावसावर अवलंबून आहे. नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस देशभरात पडत एकूण पाण्याच्या गरजेच्या सत्तर टक्के गरज भागवितो.  मान्सून संपताच पूर्वेकडून येणाऱ्या पावसाने उर्वरित पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मोसमी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाच्या धारा या महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्या अंदाजाचे शुभवर्तमान सांगण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय हवामान विभाग गेली अनेक वर्षे नित्यनियमाने करतो आहे. त्या अंदाजानंतरही मेच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार व जून ते ३० सप्टेंबर या मान्सूनच्या काळात पाऊस कसा पडेल हे सांगितले जाते. येणाऱ्या हंगामात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस होईल, असे म्हटले आहे.

भारतात सरासरी ३०० ते ६५० मिलिमीटर पाऊस होतो. त्यापैकी सर्वाधिक पाऊस दक्षिण भारताच्या पश्चिम किनारपट्टीपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होतो. त्याचा लाभ महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर होतो. मध्य महाराष्ट्रवगळता मुंबईसह कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि विदर्भात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज आहे. अलीकडे हवामान विभागाने रडारच्या मदतीने स्थानिक शास्त्रीय निरीक्षणानुसार वेगवेगळ्या विभागात पावसाचे प्रमाण कसे असेल याचा अंदाज व्यक्त करणे सुरू केले आहे आणि तो अंदाज तंतोतंत नसला तरी सरासरीच्या प्रमाणात खरा ठरतो आहे. १९९४ मध्ये भारतात सर्वत्र सरासरी ११० टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर गेल्या सत्तावीस वर्षांत गतवर्षीच पाऊस शंभर टक्क्यांपेक्षा अधिक (१०९ टक्के) झाला. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक, तर जुलैमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. हिंदी महासागरातील हवामानाच्या बदलावर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग निश्चित होतो. तापमान अधिक वाढले की, पावसाची सुरुवात लवकर होण्यास मदत होते. त्यासाठी पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्याचे महत्त्व आहे. त्याला आपण ऋतुचक्र म्हणतो. सध्या कोरोना संसर्गाची दुसरी-तिसरी लाट चालू आहे. रुग्णसंख्या देशात दररोज अडीच लाखांनी वाढत आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. काही भागांत संचारबंदीसारखे कटु निर्णय घ्यावे लागत आहेत. यामुळे तेथील जनजीवन ठप्प होत आहे.  त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर निश्चित होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर पावसाचा अंदाज व्यक्त करणारी वार्ता ही शुभवर्तमानच मानावी लागेल.

Web Title: Editorial: Good news of rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस