नाट्य संमेलनासाठी किती काळ सरकारी मदतीवर अवलंबून राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 04:24 AM2019-11-18T04:24:55+5:302019-11-18T04:25:00+5:30
एकेकाळी वसंत कानेटकर, बाळ कोल्हटकर तसेच विजय तेंडुलकर, जयवंत दळवी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकांच्या नाट्यकृती विक्रम करताना पाहिल्या आहेत. सध्या नाटकांची वेबसीरिज, चित्रपटांशी स्पर्धा असली तरी कसदार साहित्यकृतींची वानवा आहेच.
मुख्यमंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागलेल्या एका वल्लीस एकदा भेटायला एक मोठी कलाकार व्यक्ती येणार असल्याचे कळले. मुख्यमंत्री त्या कलाकाराचे फॅन असल्याने ठेवणीतील कपडे घालून वाट बघत बसले. ती मोठी कलाकार व्यक्ती जेव्हा त्यांच्यापुढे उभी राहिली, तेव्हा इतकी लाळघोटेपणा करीत होती की, आपण बसलेले पद किती मोठे आहे, याचा त्या वल्लीस साक्षात्कार झाला. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून दोन जुन्या मित्रांमध्ये वडवानल पेटल्याने ‘युती’ खाक होऊन नवी ‘महाआघाडी’ उदयाला येत आहे. सरकार स्थापनेस विलंब होत असल्याने सर्वसाधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत होणारे अ.भा. नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात येणार आहे. यंदाचे हे शंभरावे नाट्य संमेलन असल्याने नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेसह सर्व नाट्यकर्मींची हे संमेलन ‘महासंमेलन’ करण्याची इच्छा आहे. याबाबतचा तपशील व तारखा निश्चित झालेल्या नसल्या तरी सरकार स्थापनेच्या विलंबामुळे संमेलन पुढे ढकलावे की न ढकलावे, यावरून वादंग सुरू झाले आहेत.
संमेलन मग ते नाट्य असो की साहित्य, त्याला वादाची फोडणी मिळाल्याखेरीज मराठी मन तृप्त होत नाही. नाट्य संमेलनाकरिता सरकार ५० लाखांचे अनुदान देते. सध्या राष्ट्रपती राजवट असल्याने नियोजित वेळी संमेलन आयोजित केले तर ही रक्कम मिळेल, याची खात्री नाही. शिवाय, सरकारच अस्तित्वात नसल्याने संमेलनाच्या सोहळ्याकरिता सांस्कृतिकमंत्री किंवा यजमानपद मिरवणारा मंत्री कुणी असणार नाही. गतवर्षी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या पाहुणचाराने तृप्त झालेले नाट्यकर्मी नव्या यजमानाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाचे वर्ष शंभरावे असल्याने वेगवेगळ्या शहरांत एकाच वेळी किंवा वर्षभर संमेलने घेण्याचा परिषदेचा विचार सुरू आहे. हा विचार स्तुत्य आहे, परंतु त्याकरिता केवळ सरकारी आर्थिक मदतीवर अवलंबून राहणे उचित नाही.
अनेक मराठी कलाकार चित्रपट व नाटकांत काम करतात. सध्या मराठी चित्रपटांना व कलाकारांना चांगले दिवस आलेले आहेत. अनेकांकडे विदेशी मोटारींपासून सुबत्ता आहे. त्यामुळे समजा कलाकारांनी आपापल्या खिशात हात घातला तर संमेलनाकरिता निधी उभा राहू शकतो. परंतु, अनेक कलाकार हे नाट्य संमेलनाच्या दिंडीत फुगड्या घालून टीव्हीवर चमकण्यापुरते किंवा संमेलनात त्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम असल्यास त्याकरिता घसघशीत बिदागी घेऊन हजेरी लावतात. परिसंवाद व अन्य चर्चांना फिरकत नाहीत. आजूबाजूच्या प्रश्नांवर जेव्हा ठोस भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा काही मोजके अपवाद वगळता फारसे कुणी बोलत नाही. अनेक कलाकार हे वेगवेगळ्या वाहिन्या, वेबसीरियल्समध्ये व्यस्त असल्याने आठवडाभर शूटिंगमध्ये व्यग्र असतात व केवळ शनिवार-रविवारी मुंबई, ठाणे, पुणे येथे नाटकांचे प्रयोग करतात. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत होणाऱ्या नाट्यप्रयोगांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. नाट्यप्रयोग होत नसल्याने तेथील नाट्यगृहांची दुरवस्था झाली आहे. अगदी प्रमुख शहरांसह डोंबिवली, कल्याणमधील नाट्यगृहांची स्थितीही दयनीय आहे.
नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर नेत्यांना व संबंधित नोकरशहांना बोलावून राज्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर विचारमंथन होण्याची व परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. सध्या काही मोजके अपवाद वगळता जुन्या नाट्यकृतींचे नव्या संचात प्रयोग केले जात आहेत. हमखास यशस्वी नाट्यसंहिता लिहिणारी लेखक मंडळी सध्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहेत. त्यामुळे निर्माते पूर्वपुण्याई गाठीशी असलेल्या जुन्या नाटकांचे खेळ लावत आहेत. संमेलनाचा डामडौल करण्यापेक्षा अशा आव्हानांवर चर्चा व्हायला हवी. अन्यथा, संत चोखामेळा यांच्या लेखणीतून व बालगंधर्वांच्या सुरेल गळ्यातून गायल्या गेलेल्या ‘जोहार मायबाप जोहार...’ या नाट्यगीतामधील ‘बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो,’ अशी अवस्था आयोजकांची झाल्याचे दिसेल.