गाव करी ते राव काय करी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 02:02 PM2018-06-21T14:02:33+5:302018-06-21T14:02:33+5:30
शासनाच्या लोककल्याणकारी योजना भरपूर आहेत, परंतु त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही, अशी सार्वकालिक तक्रार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे शासकीय निधी वाटपातील त्रुटींविषयी वक्तव्य अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे.
- मिलिंद कुलकर्णी
शासनाच्या लोककल्याणकारी योजना भरपूर आहेत, परंतु त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही, अशी सार्वकालिक तक्रार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे शासकीय निधी वाटपातील त्रुटींविषयी वक्तव्य अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. दिल्लीहून एक रुपया दिला गेला तर गावातील शेवटच्या घटकापर्यंत १५ पैसेदेखील पोहोचत नाही, असे राजीवजी म्हणाले होते. त्यानंतर शासकीय योजना, उपक्रमांमध्ये लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले. गावाच्या विकासात योगदान देता येऊ लागल्याने ग्रामस्थ उत्साहित झाले. ग्रामसभांमध्ये गावाच्या विकास निधीविषयी ठराव होऊ लागले. जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गावे या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न झाले. आणि या प्रयत्नांना मोठे यश मिळू लागले.
आपल्या गावाचा विकास आपणच करु शकतो ही भावना या उपक्रमांमधून गावागावात रुजू लागली. मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी शहरांमध्ये स्थानिक झालेले उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार गावाच्या विकास कार्यात तन मन धनाने योगदान देऊ लागले. एक मोठी चळवळ यानिमित्ताने सुरु झाली. धुळे या जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर लामकानी हे एक गाव आहे. शेती आणि पशुपालन हाच ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. या गावाला मोठे नैसर्गिक वरदान लाभले ते चौफेर असलेल्या डोंगर आणि डोंगरावर उगवणाऱ्या गवताचे...पूर्वी प्रत्येक गावासाठी गायरान तर काही ठिकाणी गवताळ जंगले असत. ज्या गावांनी या दोन्ही गोष्टी राखल्या; ती गावे खºया अर्थाने संपन्न आहेत. ज्यांचे दुर्लक्ष झाले त्या गावांमध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमणे झाली तर जंगले बोडकी झाली. लामकानी या गावाला डॉ.धनंजय नेवाडकर यांच्यासारखा धन्वंतरी लाभला. १५-१७ वर्षांपूर्वी त्यांनी जन्मगावाचा कायापालट करण्याचा संकल्प सोडला. धुळ्यात वैद्यकीय व्यवसाय करीत असताना शासकीय अधिकाºयांकडे पाठपुरावा करुन शासकीय योजना गावात राबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लोकसहभागाची हमी दिली. एकदा जिल्हाधिकारी गावात आले असता त्यांना मातीच्या बांधाची दुरवस्था दिसली. गावक-यांची परीक्षा घेण्याच्यादृष्टीने ते म्हणाले, या बांधांची श्रमदानातून दुरुस्ती करुन दाखवली तर मी तुमच्या गावाला शासकीय योजना देईल. गावक-यांनी हे आव्हान स्विकारले. अनुभवी वृध्दांचे मार्गदर्शन, तरुणांची जिद्द आणि डॉ.नेवाडकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे रात्रदिवस श्रमदान करुन बांधाची दुरुस्ती केली. जिल्हाधिका-यांनी आनंद व्यक्त केला आणि त्यांनी शब्द पाळला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी लामकानीमध्ये होऊ शकते, हा विश्वास प्रशासनाला आला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, वनविभाग, पाटबंधारे विभागाच्या वेगवेगळ्या योजना गावात आल्या. ग्रामस्थांनी एकोप्याने त्या राबविल्या. गावाभोवताली असलेल्या डोंगरावर मुबलक गवत तसेच अंजन, बाभळी अशी झुडपे उगवितात. खडकाळ, मुरमाड जमीन असल्याने मोठ्या पानांची झाडे याठिकाणी जगत नाही. अभ्यासाअंती हे लक्षात आल्यानंतर उगाच शासकीय लागवडीतील ‘शतकोटी’च्या भानगडीत न पडता वनविभागाकडून चर खोदणे, दगडी बांध घालणे असे उपक्रम रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याऐवजी डोंगरावर झिरपले. त्यामुळे गावातील जलपातळी वाढली. रानातील विहिरींना पाणी वाढले आणि दोन्ही हंगाम बहरले. डोंगरावर नैसर्गिकरित्या उगविणा-या डोंगरी आणि पवना जातीच्या गवताचे उत्पादन वाढले. दगडी बांधामुळे उन्हाळ्यातील वणवा पसरण्याचे प्रमाण कमी झाले.
गुरेचराईवर प्रतिबंध घालण्यात आल्याने गवताळ कुरण संरक्षित राखले गेले. ते रहावे, यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेतला. गावातील पशुपालकांनी स्वत: डोंगरावर जाऊन हवे तेवढे गवत तोडून आणावे, मात्र तेथे गुरे नेऊ नये, असा निर्णय करण्यात आला. काठेवाडी मंडळींना प्रतिबंध करण्यात आल्याने गवत, त्याची मुळे जपली गेली. उत्पादन अधिक वाढले. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलजागृती करणा-या चित्रपट अभिनेता अमीर खान यांनी मे महिन्यात लामकानीला भेट दिली. त्यावेळी डॉ.धनंजय नेवाडकर यांनी जलसंधारणा सोबत कुरण विकासाची जोड देण्याची सूचना केली. अमीर खान यांना ही कल्पना आवडली, त्यांनी नॅन्सी नावाच्या सहकाºयाला लामकानीला धाडले आणि कामाची माहिती घेतली. गाव करी ते राव काय करी या म्हणीचा प्रत्यय लामकानीला भेट देणाºया प्रत्येकाला हमखास येतोच.