संपादकीय - अफवांच्या वादळाला वेसण कशी घालणार?
By विजय दर्डा | Published: April 24, 2023 09:53 AM2023-04-24T09:53:14+5:302023-04-24T09:58:04+5:30
बच्चन परिवाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच; पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या बाबतीत असा खोडसाळपणा झाल्याची अगणित उदाहरणे सापडतील.
विजय दर्डा
झूठ का खौफनाक मंजर,
अफवाहों का ये समंदर
किसकी बातों पर ऐतबार करूं
यहा तो हरओर है
हवाओ मे उडता खंजर वंजर
- या ओळी अचानक आठवल्या आणि मनात काहूर उठले. अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या हिच्याविषयी तिचे आजारपणच नव्हे तर थेट मृत्यूची खोटी बातमी ज्याने समाजमाध्यमांवर पसरवली त्याची मानसिकता किती घाणेरडी असेल? त्या व्यक्तीने टाकलेले व्हिडीओ लोकांनीही मागचा-पुढचा विचार न करता धडाधड एकमेकांना पाठवले. दुवा देणाऱ्या-घेणाऱ्यांच्या संस्कृतीतले आपण लोक, आपण कुणाच्या मृत्यूची कल्पना कशी करू शकतो? परंतु समाजमाध्यमांवर अशा विकृत लोकांची वर्दळ सातत्याने वाढते आहे, हेच आजचे सत्य आहे.
बच्चन परिवाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच; पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांच्या बाबतीत असा खोडसाळपणा झाल्याची अगणित उदाहरणे सापडतील. फिल्मी गॉसिप काय आहे? नेत्यांच्या बाबतीतही असेच होते. दुसऱ्याची टोपी उडवण्यात मजा येणे हा एक आजारच! त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याचा विचार हे लोक करत नाहीत. आराध्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सगळे संबंधित व्हिडीओ गुगल आणि यूट्यूबवरून हटवायला सांगितले. आराध्याच्या व्यक्तिगत हक्कांवर गदा येईल असे व्हिडीओ अपलोड करायला मनाई केली. न्यायालयाने ते व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांची सविस्तर माहितीही मागवली आहे. गुगल, यूट्यूबसाठी ही माहिती मिळवणे अजिबात कठीण नाही. ही माहिती न्यायालयापर्यंत पोहोचेल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल अशी आपण आशा करू या. याबाबत काळजी घेण्याची जबाबदारी गुगल, यूट्यूबची आहे, असेही न्यायालयाने म्हटले.
भारतीय न्यायालयांनी एकदा नव्हे अनेकदा दटावले, सरकारने मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला; परंतु समाजमाध्यमे सतत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. त्यांनी वाटेल ते करावे आणि कायद्याने त्यांना लगाम लावला जाऊ नये इतका त्यांचा दबदबा का असावा? ही सगळी माध्यमे मुळात भेटीगाठींसाठी सुरू झाली; परंतु मोठ्या हुशारीने त्यांना समाजमाध्यमे म्हटले जाऊ लागले. माध्यम म्हणजे बातमी आणि मुद्यांच्या विश्लेषणाचे व्यासपीठ. वृत्तपत्रांपासून टीव्ही वाहिन्या आणि संकेतस्थळांपर्यंत बातम्यांच्या बाबतीत त्यांचे महत्त्व आणि सत्य-असत्याची शहानिशा करण्याचा प्रघात आहे. या माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार काही चुकीचे छापले जाणार नाही याची काळजी घेतात. समाजमाध्यमांवर अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नाही.
या माध्यमांवर कुणीही काहीही लिहू शकतो आणि काहीही अपलोड करू शकतो. फेसबुक स्क्रोल करताना शरम वाटेल असे एखादे रील अचानक आपल्या समोर उलगडेल. शिवीगाळीची गोष्ट सोडा, लैंगिक व्यवहारांचेही उघडेवाघडे दर्शन होते. हे कुठे ना कुठे थांबवले गेले पाहिजे. सरकार जेव्हा या माध्यमांना लगाम लावू पाहते तेव्हा लोक आरडाओरडा करतात; परंतु स्वतःचा विवेक वापरत नाहीत. शेवटी सरकार आपलेच आहे आणि लोकशाहीमध्ये तर आपणच सरकार आहोत. मग हे काम कोण करणार? माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीचा मी सदस्य होतो. इंटरनेट हा माहितीचा खजिना आहे हे खरेच! परंतु लोकांसमोर काय आणले जाते, लोक काय पाहतात याचा विचार आपल्याला करावा लागेल. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. काही लोकांच्या चुकांचा फटका समाजमाध्यमांवर वावरणाऱ्या चांगल्या लोकांनाही बसतो आहे.
मध्यंतरी तामिळनाडूमध्ये बिहारच्या मजुरांना मारझोड करून पळवून लावले जात आहे असे व्हिडीओ अचानक समाजमाध्यमांवर झळकू लागले. बिहारमधले लोक भडकले. हैराण तामिळनाडू सरकारने तातडीने तपास केला. बिहारचा एक यूट्यूबर मनीष कश्यप याचा हा उद्योग होता. तामिळनाडूत अशी कोणतीच घटना झाली नव्हती. शिवाय, ते व्हिडीओ तामिळनाडूबाहेरचे आणि खूप जुने होते. एक व्हिडीओ तर होळीमध्ये घरी जाणाऱ्या मजुरांचा होता. जो या मनीषने ते पळून चालले आहेत असे दाखवण्यासाठी वापरला. लोकांनी मात्र त्यावर विश्वास ठेवला.
मला वसीम बरेलवी यांचा एक शेर आठवतो आहे...
वो झूठ बोल रहा था, बडे सलीके से
मै एतबार न करता, तो और क्या करता?
मनीष सध्या कायद्याच्या जाळ्यात सापडला आहे. पुन्हा प्रश्न तोच : अशा व्हिडीओंच्या खऱ्या-खोट्याची शहानिशा करण्याची काही व्यवस्थाच कशी नाही? ट्विटरने तर आपल्या ट्रस्ट अँड सेफ्टी काउन्सिलचे विसर्जनच करून टाकले आहे. समाजमाध्यमांमधून वैरभाव पसरवणारे वातावरण तयार केले जाते असे संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे. किमानपक्षी भारतात तर हे घडताना आपण पाहतोच आहोत. त्याचे परिणामही भोगत आहोत. आपली सामाजिक वीण त्यामुळे सैल होते, तणावाखाली येते. शारीख कैफी यांचा एक शेर आहे..
झूठ पर उसके, भरोसा कर लिया
धूप इतनी थी, की साया कर लिया
- तर ही वेळ जागे राहण्याची आहे. इतक्या सगळ्या गोष्टी वेगाने आपल्यासमोर येतात, की मन भ्रमित होणे अत्यंत स्वाभाविक होय! म्हणूनच आपण थोडे डोके वापरून पाहिले पाहिजे, नाहीतर अफवांचे हे वादळ आपल्याही नाकातोंडात जाऊ शकते.
(लेखक लोकमत एडिटोरियल बोर्ड आणि लोकमत समूहचे, चेअरमन आहेत)