वाढते तणावांमुळे घरोघरी प्रेशर कुकर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:05 PM2021-08-12T16:05:45+5:302021-08-12T16:05:59+5:30

आपल्या जीवनातील अपयशाचे खापर इतरांवर फोडता येत नाही, यामुळेही राग आणखी अनावर होतो आहे. परिणामी घरोघरी मनावर प्रेशर देणारी कुकर्स तयार झाली आहेत.

editorial on increasing mental pressure and criminal cases | वाढते तणावांमुळे घरोघरी प्रेशर कुकर्स!

वाढते तणावांमुळे घरोघरी प्रेशर कुकर्स!

Next

‘घरोघरी मातीच्या चुली !’ ही म्हण आता जुनी झाली. कारण मातीच्या चुलींची जागा गॅसने घेतली आणि भांडीकुंडी यातदेखील बदल होऊन प्रेशर कुकर्स, मिक्सर, नॉनस्टिक तव्यांनी त्यांची जागा घेतली आहे. ही सर्व वरकरणी दिसणारी आधुनिकता घरी आली तरी घराघरांत तणावाची विविध कारणांनी गर्दी झाली आहे. मोकळा श्वास घेण्यास जागा उरली नाही. कोरोना संसर्गाने हा श्वासही रोखून धरला जाऊ लागला आहे. परिणामी वाढत्या ताणतणावाने जवळचे नातेसंबंध एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत विसरले जाऊ लागले आहेत. गेल्या दोन आठवड्यातील महाराष्ट्रातील घटनांची दोन उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. नवी मुंबईतील एरोली सेक्टर सातमधील एका पंधरा वर्षांच्या मुलीने अभ्यासाबद्दल रागावल्याने आईचा गळा आवळून खून केला. शिवाय आईने आत्महत्या केली असे भासविण्याची हुशारीदेखील दाखवून कुटुंबीयांना तसेच पोलीस यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला. दुसरी घटना नाशिकची आहे. केवळ साडेतीन वर्षांचा मुलगा ऑनलाइन अभ्यास करीत नाही म्हणून राग अनावर झाल्याने त्याच्या आईने गळा आवळून त्याची हत्या केली.



कोरोनानंतरचा बदललेला समाज आणि घरोघरी झालेल्या बदलांचा हा परिणाम आहे. माणूस किती तणावाखाली येऊ शकतो आणि त्यातून रागावर नियंत्रण ठेवणे कसे अशक्य ठरते, याचे हे उदाहरण आहे. शिक्षणातून ज्ञान मिळो न मिळो पैसा मिळविण्याचे कौशल्य पाल्याला जरूर मिळाले पाहिजे, पैसा मिळाला की, सर्व सुखं विकत घेता येऊ शकतात, जीवन अधिक आरामदायी जगण्याचे साधन हाताला लागू शकते, असा अनेकांचा समज तयार झाला आहे. कोरोनाकाळात ज्यांच्याकडे पैसा होता, ते नशिबवान ठरले. त्यामुळे येन-केन प्रकारे पैसा कमवित राहण्याचे मशीन तयार करण्यासाठी पाल्यांवर प्रेशर आणणारी कुकर्स घराघरांत तयार झाली आहेत.



अलीकडच्या काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्येलादेखील आता मध्यमवर्गीय शहरी माणसांनी माघारी टाकले आहे. शेतकऱ्यांची नापिकी किंवा दुबार पेरणी तसेच आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही, याचा वाढता दबाव अनेकांच्या घरी तणाव निर्माण करीत आहे. सरकारी शाळा या पालकांना नको होत्या. कारण भरमसाठ वेतन घेऊनही शिक्षक उत्तम पद्धतीने शिकवत नाहीत हा आक्षेप होता. तिथे इंग्रजीत शिकविले जात नव्हते. किमान सेमी इंग्लिशपण नव्हते. अशा या प्रेशरला बळी पडलेल्या पालकांना शाळा ऑनलाइन असतानाही हजारो रुपये फी भरावी लागत आहे. स्मार्ट फोन, उत्तम कनेक्टिव्हिटी असणारी यंत्रणा हवी आहे. जेणेकरून आपला मुलगा किंवा मुलगी चार पैसे कमावणारे कौशल्य अंगी बाणवेल. हा सर्व तणाव डोक्यात घेऊन पालक वावरत आहेत. पैसे कमावले नाहीत, तर आपल्या पाल्याचे पुढे काही खरे नाही, या जाणिवेनेही पालकांचा जीव कुरतडला जात आहे. आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा जीव घ्यावा, असे कोणत्या मातेला वाटेल; पण तिचे मन, शरीर, गॅसवर लावलेल्या प्रेशर कुकरप्रमाणे तापले आहे. त्यातील प्रेशर बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे पाल्याला मारझोड करणे किंवा मातेच्या तगाद्याला वैतागून तिच्यावरच हात उचलण्याचे धारिष्ट्य पंधरा वर्षांच्या मुलीच्या अंगात येणे !

लोकांचे अन्न, कपडा आणि निवारा आदींचे प्रश्न सकृतक्षणी नजरेस पडतात. मनात आलेल्या तणावाला वाट कशी करून देणार? हाती बक्कळ पैसा असता तर हा तणाव आला नसता, या निष्कर्षावर येऊन मन थांबते आणि राग पुन्हा अनावर होतो. आपल्या जीवनातील अपयशाचे खापर इतरांवर फोडता येत नाही, यामुळेही राग आणखी अनावर होतो आहे. परिणामी घरोघरी मनावर प्रेशर देणारी कुकर्स तयार झाली आहेत. सध्या ही दोन प्रकरणे समोर आलेली आहेत. अशी असंख्य घरे आहेत, जी तणावाखाली दिवस पुढे ढकलत आहेत. हा सर्व असंघटित वर्ग आहे. त्याला मूळ प्रश्नांची उकल करून सांगणारे कोणी नाही. ज्या प्रकारची समाजरचना आपण जवळ केली त्यात यातील अनेक प्रश्न दडलेले आहेत, याचे भानही त्यांना येत नाही.

सार्वजनिक व्यवस्था तयार करणारी सरकारी यंत्रणा संवेदनशील नाही. त्यातील शासन अन् प्रशासनाने स्वत:ची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यांना उपकाराच्या भावनेने काही करता आले, किंबहुना केले तर धन्य वाटते. मात्र, त्या मानवी भाव-भावनांचाही आता अंत झाला आहे. मनातल्या वाफेची कोंडी होत आहे. ही वाफ बाहेर पडण्यासाठी कुठलीच जागा नाही. तसे प्रयत्नही होत नाहीत. यामुळे घरोघरी प्रेशर कुकर्सचा स्फोट होत राहणार आहे. याची अभिजन वर्गानेच नोंद घेऊन मार्ग दाखविला पाहिजे.

Web Title: editorial on increasing mental pressure and criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.