कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:15 AM2020-07-04T04:15:02+5:302020-07-04T04:15:18+5:30

कोरोना विषाणूला प्रतिकार करणारी लस शोधण्याच्या जागतिक प्रयत्नांत भारतीय शास्त्रज्ञही आहेत. तुलनेने उशिरा प्रारंभ करूनही भारतीय संशोधन निर्णायक टप्प्यावर आलेले असून, ही सुखदायी वार्ता आहे.

Editorial on Indian scientist will get positive result of Corona vaccine in Future | कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार

कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार

googlenewsNext

कोविडकाळ नैराश्य आणि उद्विग्नतेने भरलेला निघाला. उद्यमाच्या पायात पडलेल्या बेड्यांनी अर्थव्यवस्था जेरीस आली. संसर्गाच्या संक्रमणामुळे प्रियजन दगावल्याचे दु:ख वस्तीला आले. महामारीही अशी की, तिचा अंत कधी व कुठे होईल, याचा अंदाज अद्यापही येत नाही. सगळेच निरुत्साहाचे वातावरण; पण काळ्या ढगांनाही रूपेरी किनार असते. निराशेलाही आव्हान देत परिस्थितीशी झुंजणारे लढवय्ये असतात, म्हणूनच उद्याच्या भरवशावर समाज जगत असतो. कोविडकाळातील अनिश्चिततेत भविष्याचा भरवसा देण्यासाठी झटताहेत अनेक वैज्ञानिक व संशोधक. लक्ष्य आहे कोविडवरला उतारा शोधण्याचे. आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या या यत्नांना यशही येते आहे. ‘ग्लेनमार्क’ने आपले ‘फाविपिरावीर’ हे औषध हल्लीच विक्रीस उपलब्ध केले. सिप्ला आणि हेटरो इमर्जन्सी संयुक्तपणे ‘रमडेसीवीर’ हे दुसरे औषध उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता भारतात पहिली कोरोनाविरोधी लस तयार होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारताच्या औषध महानियंत्रकांनी हैदराबादस्थित भारत बायोटेक या औषध निर्मात्या कंपनीने तयार केलेल्या लसीचे पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावरले प्रयोग स्वयंसेवकांवर करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने सहकार्याचा हात पुढे केला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी

Coronavirus Vaccine: India

ही लस जनतेला उपलब्ध करण्याचा संकल्प सोडलेला आहे. यातला अतिआत्मविश्वासाचा भाग सोडला तरी लसनिर्मितीची प्रक्रिया गतिमान झाल्याचे नाकारता येणार नाही. ही प्रक्रिया याच महिन्यात सुरू होऊन आॅक्टोबरपर्यंत लसीची उपयुक्तता समजून येईल. त्यानंतर विस्तृत प्रमाणात प्रात्यक्षिके घेता येतील. भारत बायोटेक हे लसनिर्मिती क्षेत्रातले जगन्मान्य नाव. त्यांनी याआधी ‘रोटा व्हायरस’ आणि ‘एचवनएनवन’ विषाणूंच्या संसर्गावरली लसही विकसित केली आहे. आता त्यांनी विकसित केलेली ‘कोवॅक्सिन’ लस प्रारंभीच्या चाचण्यांत तरी बरीच प्रभावी ठरल्याची माहिती समोर आली आहे. आणखीही काही कंपन्या लसीच्या शोधात असून, त्यांच्या प्रयत्नांनाही यश मिळते आहे. इम्युनोलॉजिकल्स, झायडेक कॅडिला, बायोलॉजिकल ई, माईनव्हॅक्स या कंपन्यांनी या दिशेने संशोधन केले असून, काहींनी चाचण्याही घेतल्या. भारतीय कंपन्यांकडून हीच अपेक्षा होती. औषधनिर्मितीत भारताचा हात धरणारा देश जगाच्या पाठीवर नाही. भारत बायोटेकने आतापर्यंत चार अब्ज लसी तयार करून त्यांची जगभरात विक्री केली आहे. हा इतिहास पाहता कोरोनाचा नायनाट करणारी लस भारतात वेगाने तयार होणे स्वाभाविक आहे. कोरोनाचा उद्भव जगात सर्वप्रथम जिथे आढळला, त्या चीनमध्येही लसीसाठीचे संशोधन बरेच पुढे गेलेले असून तिथल्या सिनोव्हॅक बायोटेक कंपनीची लस अंतिम चाचणीच्या स्तरावर पोहोचल्याचे सांगितले जाते.

Coronavirus, Covid-19 Vaccine Latest Update in India, World ...

इंग्लंडमधले प्रयत्नही अशाच प्रगत स्तरावर आहेत. कदाचित आपल्याआधी त्यांच्या लसी उपलब्ध होतीलही; पण आपल्यासाठी जमेची बाब म्हणजे कोविडच्या नायनाटासाठी पाश्चिमात्य जग वा चीनच्या दातृत्वावर अवलंबून राहावे लागणार नाही. आव्हानाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची आपली क्षमता भारतातील संशोधन क्षेत्राने पुन्हा एकवार सिद्ध केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आपण चीनच्या तुलनेत बरीच उशिरा सुरुवात केली होती. पूर्वसूचनेशिवाय जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे देशात गोंधळाचे वातावरण होते. संसर्गाचा कहर झाला, तर अपुºया आरोग्यसुविधा असलेला आपला देश फार काळ तग धरू शकणार नसल्याचे भाकित वर्तवले जात होते. आपल्याकडे आवश्यक प्रमाणात सुरक्षा किट्स नाहीत, व्हेंटिलेटर्स नाहीत, आयसीयू विभाग नाहीत. पाश्चिमात्य जग किंवा चीनप्रमाणे संशोधनासाठी ओतण्याकरिता अवाढव्य साधनसंपत्ती नाही. त्यामुळे मृत्यूची दाहकता आपल्याला अधिक सोसावी लागेल, असा समज देशभरात दृढ होऊ लागला होता. आजही तो तसाच असला तरी संसर्गाची व्याप्ती वाढली असतानाही चिवटपणे लढतो आहोत, हेही महत्त्वाचे आहे. लढण्याचा तोच बाणा आपल्या संशोधकांनीही दाखवला असून, भविष्यात संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अन्य देशांच्या तोंडाकडे पाहण्याची, लसीचे दान पडण्यासाठी प्रतीक्षा करण्याची आवश्यकता राहाणार नाही, हेच त्यांनी आपल्या कर्तृत्वानिशी सिद्ध केले आहे. कोरोना काळातील निरुत्साहाच्या कृष्णमेघांना असलेली आश्वस्ततेची रूपेरी किनार ती हीच.

How one Indian company could be world

Web Title: Editorial on Indian scientist will get positive result of Corona vaccine in Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.