पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:41 AM2022-01-17T05:41:37+5:302022-01-17T05:42:09+5:30

दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन!

editorial on indias neighboring countries sri lanka and pakistan verge on bankruptcy | पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

पाकिस्तान अन् श्रीलंका, भारताचे शेजारी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Next

पाकिस्तान आणि श्रीलंका हे आपले दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे उभे राहिले आहे. पाकिस्तानने जन्मापासूनच भारताशी उभे वैर मांडलेले! आपला आकार, वकूब आणि कुवत विचारता न घेता, प्रत्येक बाबतीत भारताशी बरोबरी करण्याच्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या ईर्ष्येचा त्या देशाला नादारीप्रत पोहोचविण्यात मोठा हात आहे. श्रीलंकेचे मात्र तसे नाही. भारताच्या आगेमागेच स्वतंत्र झालेल्या या देशाचे भारताशी प्राचीन ऋणानुबंध आहेत. दोघांचा सांस्कृतिक वारसाही एकच! उभय देशांदरम्यान बराच काळापर्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते; परंतु प्रारंभी त्या देशातील सिंहली-तामिळ वांशिक वादाची किनार आणि पुढे श्रीलंकन राज्यकर्त्यांच्या अवास्तव महत्त्वाकांक्षांपोटी संबंध काहीसे दुरावत गेले. हे दोन्ही शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताचा तिसरा शेजारी चीन!

केवळ पाकिस्तान व श्रीलंकाच नव्हे, तर आफ्रिका खंडातीलही काही गरीब देशांना चीननेच दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर नेऊन उभे केले आहे. चीन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सावकार आहे. सावकाराच्या कर्जाच्या सापळ्यात अडकलेली व्यक्ती कितीही परतफेड केली तरी कचाट्यातून मुक्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणेच चीनकडून कर्ज घेतलेला देशही व्याजाच्या दलदलीतून बाहेर पडू शकत नाही. काही वर्षांपूर्वी चीनचे महत्त्वाकांक्षी नेते शी जिनपिंग यांच्या डोक्यातून ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ नावाची कल्पना बाहेर पडली. प्राचीन रेशीम मार्गाच्या धर्तीवर आशिया खंडातील देशांना रस्ते आणि रेल्वेमार्गाने पार युरोपला जोडायचे, अशी ही वरकरणी अत्यंत आकर्षक  योजना! प्रत्यक्षात तो गरीब देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशांमधील नैसर्गिक संसाधनांचे दोहन करण्याचा आणि सर्वदूर लष्करी प्रभाव वाढविण्याचा चीनचा कुटिल डाव होता, हे आता ध्यानी येऊ लागले आहे.



पाकिस्तान, श्रीलंकेसारख्या देशांच्या दृष्टीने तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्थात, चीनच्या पुरता कच्छपी लागलेला पाकिस्तान ते कदापिही मान्य करणार नाही. ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’अंतर्गत चीनने पायाभूत सुविधा विकासासाठी मोठी कर्जे वाटली. त्या कर्जांचा व्याजदर बराच जास्त आहे. त्यामुळे बरेच देश वेळेत कर्जांचे हप्ते फेडू शकले नाहीत आणि मग त्याचा लाभ घेत, चीनने त्या देशांमधील बंदरे, विमानतळ, जमिनी हडपण्यास प्रारंभ केला. श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर चीनने अशाच प्रकारे तब्बल ९९ वर्षांसाठी घशात घातले आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रकरण तेवढ्यावरच थांबले नाही, तर श्रीलंका कधीही दिवाळखोर होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेला आगामी वर्षभरात जवळपास साडेसात अब्ज डॉलर्स एवढे विदेशी कर्ज चुकवायचे आहे. महागाईचा दर ११ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे आणि श्रीलंकेची अर्थव्यवस्था ज्या पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे, तो उद्योग कोरोनामुळे रसातळाला गेला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका चीनचे कर्ज चुकविणार?



पाकिस्तानवर तर चीनचे सुमारे २५ अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड कर्ज आहे. ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा पहिला प्रकल्प असलेल्या चीन- पाकिस्तान आर्थिक जोडमार्ग म्हणजेच सीपीईसीसाठी चीनने पाकिस्तानला भले थोरले कर्ज दिले. चीनचे अमेरिका अथवा भारतासोबत युद्ध झाल्यास, मलाक्काच्या सामुद्रधुनीत चिनी जहाजांचा मार्ग रोखून चीनचा खनिज तेलाचा पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. त्यामुळेच चीन अनेक वर्षांपासून नव्या आयात मार्गाच्या शोधात होता. सीपीईसीच्या माध्यमातून चीनची ती गरज भागणार आहे; पण त्यासाठी चीनने पाकिस्तानला कर्जाच्या गाळात रुतवले आहे! या प्रकल्पापायी पाकिस्ताननेही ग्वादर बंदर चीनच्या घशात घातले आहेच आणि तो देश जवळपास दिवाळखोर झाल्याचे त्या देशातील प्रसारमाध्यमेच कंठशोष करून सांगत आहेत. भारतात त्यामुळे अनेकांना आनंद होत असला तरी, सीमेवर एक अण्वस्त्रधारी व दहशतवादाचे नंदनवन असलेला दिवाळखोर देश असणे भारताला परवडण्यासारखे नाही. श्रीलंका तर एवीतेवी आपला अति प्राचीन काळापासूनचा मित्र आहे. मित्र भरकटला तरी त्याला मदत करणे हे सच्च्या मित्राचे कर्तव्यच असते. त्यामुळे आपल्या दोन्ही शेजारी देशांमध्ये जे घडत आहे, त्याकडे त्रयस्थपणे न बघता परिस्थितीचा योग्य लाभ कसा घेता येईल, या दृष्टीने भारताने विचार करायला हवा!

Web Title: editorial on indias neighboring countries sri lanka and pakistan verge on bankruptcy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.