अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:09 AM2019-10-31T02:09:47+5:302019-10-31T06:24:49+5:30

राजकारणातील अशा मागण्या आपल्या ताटात जास्तीचे काही पाडून घेण्यासाठी व आपला भाव वाढवून घेण्यासाठी केल्या जातात. पूर्वी हे काँग्रेस व राष्ट्रवादीत झाले, आता ते भाजप व सेना यांच्यात होत आहे एवढेच. शिवसेना आता काय करते, ते आपल्याला पाहायचे आहे.

Editorial on instability of State Power, It is in the interest of the state to have a stable government come to power soon | अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

अस्थिरता संपवा! स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे

googlenewsNext

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे मिळाल्याखेरीज तडजोड नाही, अशी शिवसेनेने भाजपकडे केलेली मागणी म्हणावी तेवढी ठाम नाही. ती पातळ करून सरकारात सामील व्हायचे, हा सेनेचा पवित्रा जुना आहे आणि तोच याही वेळी पत्करेल, असे वातावरण आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा १२२ वरून कमी होऊन १०५ वर आल्या असल्या, तरी सेनेच्या जागाही फारशा वाढल्या नाहीत. भाजपचे सरकार दिल्लीत आहे आणि आता ते ईडीचा राजकीय वापर करण्यात तरबेज झाले आहे. त्यामुळे सेनेला आपला द्वेष फार काळ चालविता येण्याजोगा नाही, शिवाय विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढले आहे. मागल्या निवडणुकीनंतर सेनेने भाजपची अशीच कोंडी केली, तेव्हा ‘घाबरू नका, मी तुम्हाला सत्तेबाहेर जाऊ देणार नाही,’ असे सांगून पवारांनीच भाजपला आश्वस्त केले होते. तीही एक भीती सेनेला आहे. एक गोष्ट मात्र खरी, सेनेच्या मदतीवाचून भाजपचे सरकार सत्तारूढ होत नाही आणि यावेळी ‘भाजपशी कोणतीही तडजोड न करण्याचा’ पवित्रा पवारांनीही घेतला आहे.

Image result for Shiv sena bjp

काही राजकीय बुद्धिवंतांच्या मते, पवारच सेनेशी युती करून व काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर काढतील. मात्र, पवार त्याहीबाबत ‘आम्हाला सत्ता नको, आम्ही विरोधातच राहू’ असे वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे ही स्थिती सरकारची स्थापना खोळंबून ठेवणारी असली, तरी ती कायमची थांबवू शकणारी नाही, अशी आहे. एका गोष्टीवर भाजपनेही ठाम भूमिका घेतलेली दिसते. मंत्रिपदे देऊ, पण मुख्यमंत्रिपद मात्र कोणत्याही स्थितीत अडीच वर्षांसाठी सोडा, एका वर्षासाठीही तो पक्ष सेनेला देणार नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे. एवढ्या साऱ्यांची नामर्जी भाजप ओढवून घेईल, अशी शक्यता अजिबात नाही. त्याची मान्यता व मतसंख्या कमी झाल्याचे दिसत असले, तरी तो पक्ष आपला राष्ट्रीय चेहरा गमावील, असे मात्र नाही. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे एक सूचक वक्तव्य आहे. ते म्हणाले, ‘सेनेने आमच्याकडे अजूनपर्यंत तरी विचारणा केली नाही.’ (अर्थात, अशी विचारणा कुणी उघडही करणार नाही, हे साऱ्यांना समजणारे आहे.) त्या वक्तव्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन पवारांची भेट घेतली. नंतर ते दोन्ही नेते गप्पच राहिलेले दिसतात.

Related image

त्यामुळे या साºयांबाबत कुतूहल आणि अंदाज बाळगणे एवढेच आपल्याला करता येणार आहे. खरा प्रश्न भाजप हा पक्ष किती कमी पदांवर सेनेला तडजोडीसाठी भाग पाडतो हा आणि सेनेला तो उपमुख्यमंत्रिंपदाचे पद तरी देईल की नाही हा आहे. राजकारणातील तडजोडी न बोलता करायच्या आणि मुकाटपणे विसरायच्या असतात. ते सेना कशी काय करते, हे खरे तर आपल्याला पाहायचे आहे. हरयाणाचे गणित सोपे होते. तेथे भाजपला ४० तर काँग्रेसला ३६ जागा मिळाल्या होत्या. ९० सभासदांच्या सभागृहात जेएनएन ७ आमदार मिळवून भाजपच्या खट्टरांना बहुमत जोडणे जमणारे होते व ते त्यांनी केलेही. महाराष्ट्रात सारेच तुल्यबळ आहेत आणि कुणी एकटाच सबळ नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात यापूर्वी सख्य राहिले आहे. अगदी पवार हे या वयातही कुणास कशी हुलकावणी देतात, यांचा अंदाज त्यांच्या जवळच्यांनाही बांधता येत नाही. भाजपमधील शिवसेनेविषयीची साशंकता त्यातून येणारी आहे.

Image result for Shiv sena bjp sharad pawar

त्यातून आमच्या राजकारणाचा तत्त्वांशी, भूमिकांशी व खरे तर समाजकारणाशीही फारसा संबंध उरला नसल्याने, पुढारी केव्हा कुणाशी हातमिळवणी करतील, याचा नेम उरला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवायला वेळ लागत आहे. तो जास्तीतजास्त ताणून धरणे शिवसेनेच्या लाभाचे, भाजपच्या चिंतेचे, पवारांच्या डावपेचांचे आणि काँग्रेसच्या करमणुकीचे ठरणार आहे. ते काहीही असले, तरी अस्थिरता लवकर संपणे व स्थिर सरकारने लवकर सत्तारूढ होणे, हे राज्याच्या हिताचे आहे.

Web Title: Editorial on instability of State Power, It is in the interest of the state to have a stable government come to power soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.