संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:45 AM2023-03-01T07:45:38+5:302023-03-01T07:46:36+5:30

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

Editorial: Late light! America's report on india pakistan terrorism came | संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

संपादकीय: उशिरा पडलेला प्रकाश! अमेरिकेचा दहशतवादावरील अहवाल आला

googlenewsNext

भारताने वर्षानुवर्षे कानीकपाळी ओरडूनही सातत्याने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाकडे दुर्लक्ष केलेल्या अमेरिकेच्या डोक्यात उशिरा पडलेल्या प्रकाशाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ काउंटर टेररिझम’ने नुकतेच ‘कंट्री रिपोर्ट् ऑन टेररिझम २०२१’ या नावाने विभिन्न देशांच्या २०२१ मधील दहशतवादविरोधी उपाययोजनांचे मूल्यमापन करणारे अहवाल जारी केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसलेल्या भारतासंदर्भातील अहवाल आहे आणि दहशतवादाची जननी पाकिस्तानसंदर्भातील अहवालही आहे. अर्थातच उभय अहवालांचा तोंडावळा पूर्णतः भिन्न आहे.

दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची मुक्त कंठे प्रशंसा करताना त्याच मापदंडावर पाकिस्तानची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. अजिबात उशीर आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तमाम दहशतवादी संघटना समूळ नष्ट करण्याच्या प्रतिज्ञेसंदर्भात पाकिस्तानने काहीही केले नसल्याचा ठपका, पाकिस्तानसंदर्भातील अहवालात ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी भारतासंदर्भातील अहवालात भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांना दाद देण्यात आली आहे. भारताने २०२१ मध्ये दहशतवादी संघटनांना वेसण घालण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले, दहशतवादी संघटनांसंदर्भात अमेरिकेने जी माहिती मागितली, ती तातडीने पुरवली आणि अमेरिकेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादी संघटनांच्या विरोधात जलदगतीने कारवाया केल्या, असे गौरवोद्गार अहवालात काढण्यात आले आहेत. भारत गत काही दशकांपासून स्वबळावर दहशतवादाच्या विरोधात लढा देत आला आहे. या दीर्घकालीन लढाईत एक पंतप्रधान व एका माजी पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेते, उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, लष्कर व निमलष्करी दलांचे कित्येक जवान आणि हजारो निष्पाप नागरिक हुतात्मा झाले आहेत.

युद्धभूमीत भारताला मात देता येत नसल्याचा तीनदा अनुभव घेऊन झाल्यावर आणि त्या प्रयत्नांत बांगलादेशाच्या रूपाने मोठा भूभाग गमावल्यावर, पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचे शस्त्र उपसले. देशाच्या अनेक शहरांमध्ये हजारो निष्पाप सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले! आज न उद्या दहशतवादाचा भस्मासूर उर्वरित जगाच्याही डोक्यावर हात ठेवणार असल्याचा इशारा कंठशोष करून देत होता; परंतु जगाचा पोलिस बनून मिरविणाऱ्या अमेरिकेसह उर्वरित जगानेही भारताला तोपर्यंत गांभीर्याने घेतले नाही, जोपर्यंत भारताचा इशारा खरा ठरला नाही.  २००१ मध्ये ९/११ या नावाने इतिहासात नोंद झालेला अमेरिकेवरील प्रचंड दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याने मात्र अमेरिकेसह संपूर्ण जग हादरले आणि मग भारताची ओरड अनाठायी नसल्याचे, दहशतवाद ही तातडीने आणि गांभीर्याने लक्ष घालण्याजोगी जागतिक समस्या असल्याचे मान्य केले. दुर्दैवाने त्यानंतरही पाकिस्तानातून उगम पावणाऱ्या दहशतवादाला वेसण घालण्यासाठी पुरेशी पावले अमेरिकेने उचलली नाहीत. त्यानंतर बराच काळापर्यंत अमेरिकेचा दहशतवादविरोधी लढा केवळ ९/११ चा बदला घेण्यासाठी अल कायदा ही दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यापुरताच मर्यादित राहिला होता. त्यांना संपवूनही दहशतवाद काही संपत नाही, हे बघून मात्र अमेरिकेचा दहशतवादाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जागतिक दहशतवाद संपवायचा असल्यास पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे अमेरिकेने मान्य केले.

अमेरिकेचा बदललेला दृष्टिकोनच ताज्या अहवालांमधूनही झळकत आहे. जोपर्यंत रशियाच्या विरोधात आणि अफगाणिस्तानात पाकिस्तानची गरज होती, तोपर्यंत अमेरिकेला पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद दिसत नव्हता किंवा त्याकडे डोळेझाक करण्याचे काम अमेरिकेने वर्षानुवर्षे केले. बदललेल्या जागतिक परिस्थितीत आता अमेरिकेला पाकिस्तानची फारशी गरज उरलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने त्या देशाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. आता अमेरिकेला चीनला लगाम घालायचा आहे आणि त्यासाठी भारताची गरज आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून अमेरिकेला भारतप्रेमाचे भरते आले आहे. उद्या जागतिक परिस्थिती बदलली तर पुन्हा अमेरिकेची भूमिका बदलणारच नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे, याची खूणगाठ भारतीय नेतृत्वाने बांधलेली बरी !

Web Title: Editorial: Late light! America's report on india pakistan terrorism came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.