Holi 2020: आनंदाच्या रंगांनी आयुष्याचाच उत्सव होवो!
By विजय दर्डा | Published: March 9, 2020 02:27 AM2020-03-09T02:27:35+5:302020-03-09T06:27:49+5:30
होळी हा केवळ सण नव्हे, तर सद्भावनेच्या थोर परंपरेचे प्रतीक
विजय दर्डा
कोरोनाच्या भयंकर साथीने आपणा सर्वांनाच घोर चिंता लागली आहे. या चिंताग्रस्त अवस्थेतच आपणा सर्वांचा आवडता होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा रंगांचा उत्सव आहे, परस्परांच्या भेटीगाठींचा सण आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी कशी साजरी करावी, याची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मला वाटते, बस्स, आपण सर्वांनी सतर्क राहण्याची खरी गरज आहे. आणखी हेही लक्षात घ्या की, उत्सव साजरा करणे ही प्रफुल्लित मनाची अवस्था आहे. त्यासाठी स्वत: आणि इतरांना रासायनिक रंगांनी माखविण्याची थोडीच गरज आहे? कोरड्या होळीसारखी उत्तम होळी अन्य कोणती असू शकते?
शिवाय यंदाच्या होळीला दिल्लीतील भीषण दंगलींच्या विषण्णतेची झालर आहे. दंगलींमुळे समाजात पसरलेला विखार अद्याप गेलेला नाही. त्यामुळे या होळीत आपण प्रेम व ममतेच्या रंगातच न्हाऊन निघू या! होळी हा केवळ रंगांचा सण नाही. सामाजिक सद््भाव व बंधुभावाची मुळे खोलवर रुजलेल्या आपल्या संस्कृतीचा तो प्रातिनिधिक उत्सवही आहे. होळी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. समाजातील भेदभाव संपवून एकोप्याने राहण्याचा हा सण आहे. होळीच्या दिवशी जात व धर्माची सर्व बंधने गळून पडतात. नवोदित कवी संजय वर्मा यांनी लिहिलेल्या या ओळी किती समर्पक आहेत पाहा:
रंगों की कोई जात नहीं होती
भाईचारे के देश में दुश्मनी की बात नहीं होती
ये खेल है प्रेम की होली का
मिलकर रहते इसलिए टकराव की बात नहीं होती.
होळीच्या दिवशी वैर आणि शत्रुत्व विसरून सर्वांनी गळ्यात गळे घालण्याची भारताची जुनी परंपरा आहे. याचाच अर्थ असा की, तुम्ही दोस्तीचा रंग जेवढा गडद कराल तेवढेच वैमनस्य फिके होत जाईल. होळी साजरी करण्याच्या परंपरेविषयी अनेक किस्से आपल्या समाजात रूढ आहेत. पण मला असे वाटते की, समाजात प्रेम आणि बंधुभावाची भावना रुजविण्यासाठीच या सणाची सुरुवात झाली असावी. या सणाची परंपरा जुनी असली तरी आपण आजही तो तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो याचे कारणच हे की, रंगांबद्दल आपल्या मनात मनापासून ओढ आहे.
आर्यांच्या काळातही होळी प्रचलित होती. नारद पुराण व भविष्य पुराणाच्या प्राचीन हस्तलिखितांमध्येही होळीचा उल्लेख आढळतो. प्रसिद्ध मुस्लीम पर्यटक अलबरुनीच्या प्रवासवर्णनातही या सणाचे वर्णन आहे. रंगांच्या या ताकदीमुळेच हा सण मुघलकाळातही टिकून राहिला. अकबर जोधाबाईसोबत व जहांगिर नूरजहाँशी होळी खेळत असे, असे इतिहासात नमूद आहे. शहाजहाँच्या काळात होळीला ईद-ए-गुलाबी व आब-ए-पाशी (रंगांचे फवारे) असे म्हटले जायचे. अंतिम मुघल बादशहा
बहादूरशहा जफर यांना होळीच्या दिवशी अनेक मंत्री रंग लावायचे. आपल्या समाजात बंधुभाव दृढ होण्यात होळीचे योगदान किती मोठे आहे, हे समजावे म्हणून मी इतिहासातील हे दाखले मुद्दाम दिले. एवढेच नव्हे, मुस्लीम कवींनी होळीवर सुंदर काव्यरचना केलेल्या आहेत. नझीर अकबराबादी यांची ही रचना माहीत नाही, असा भारतीय अभावानेच आढळेल:
जब फागुन रंग झमकते हों,
तब देख बहारें होली की
और डफ के शोर खड़कते हों,
तब देख बहारें होली की
परियों के रंग दमकते हों,
तब देख बहारें होली की
कुछ घुंघरू ताल छनकते हों,
तब देख बहारें होली की
नझीर अकबराबादी यांची ही रचना सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे. नझीर बनारसी यांचे हे ८० वर्षांपूर्वीचे काव्यही याहून कमी सरस नाही:
कहीं पड़े न मोहब्बत की मार होली में
अदा से प्रेम करो दिल से प्यार होली में
गले में डाल दो बांहों का हार होली में
उतारो एक बरस का खुमार होली में
मिलो गले से गले बार बार होली में
होली मिलन हे खरे तर वैमनस्य दूर सारून समाजात दोस्तीचा रंग पक्का, अधिक गहीरा करण्याचे प्रतीक आहे. तेव्हा यंदाच्या होळीमध्ये आपण मैत्रीचा रंग एवढा गडद करू या, प्रेमाचा गुलाल एवढा दूरवर उधळू या की, वैराचे बीज समाजात अंकुरित व्हायलाही संधी मिळू नये! मग आनंदाची खरी रंगवर्षा होईल व संपूर्ण जीवनच जणू उत्सव होऊन जाईल! या पृथ्वीतलावर माणुसकीच्या रंगाहून सुंदर रंग कोणताही रंग नाही, हे पक्के लक्षात ठेवा.
तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून भरपूर शुभेच्छा! स्वस्थ राहा, आनंदी राहा.
(लेखक लोकमत समूह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)
(vijaydarda@lokmat.com)