संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:00 AM2023-10-17T08:00:54+5:302023-10-17T08:02:07+5:30

समाेर लाल दिव्याची गाडी दिसताच चालक घाबरून जातात. पाेलिस किंवा परिवहन खात्याचे कर्मचारी वाहनधारकांना मदतीस येत नाही, अडविण्यासाठीच असतात, हे आता महाराष्ट्राला माहीत झाले आहे.

Editorial: looting on the highway by RTO, Police! Financial assistance only to devotees-pilgrims after accident, why not others... | संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही...

संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही...

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रविवारी मध्यरात्री आणखी एक भीषण अपघात झाल्याने अपघाताच्या मालिकेची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात हा अपघात केवळ परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) बेजबाबदार वर्तनाने झाल्याचा प्रचंड संताप महाराष्ट्र व्यक्त करताे आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मालमाेटारीस तातडीने राेखण्यासाठी हात करताच चालकाने ब्रेक दाबले. मागून येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील टेम्पाे ट्रॅव्हलर्सला वेग आवरता आला नाही. महामार्गावरील धावणाऱ्या मालमाेटारीस अचानकपणे थांबविण्याचा गुन्हा परिवहन अधिकाऱ्यांनी केला. वास्तविक महाराष्ट्राला हे नवे नाही.

काेणत्याही महामार्गावर किंवा राज्य मार्गावरून प्रवास करताना परिवहन विभागाचे अधिकारी आणि पाेलिस काेणतीही गाडी अडवून तपासणी सुरू करतात. महामार्गाच्या मधाेमध थांबून समाेरून येणाऱ्या वाहनांना अडवितात. तपासणीच्या नावाखाली ताेडपाणी सुरू हाेते. वैजापूर तालुक्यातील या ठिकाणी तपास नाका नाही. महामार्गावरून असंख्य वाहने धावत असतात. त्यांना सावज बनवून ताेडपाणी करण्याचा हेतूच अधिक असताे. रस्त्यावरील वाहने अडवून बेमालूम लूटमार सुरू असते. अनेक घाटांत दाेन-चार पाेलिस उभे असतात. घाटात वाहन चालविताना चालकास सतर्क राहावे लागते. अशा गर्दीच्या ठिकाणीदेखील ही ‘वाट’मारी करण्यासाठी फाैज तयार असते. वैजापूरचा अपघात केवळ या परिवहन अधिकाऱ्यांनी मालमाेटारीस अचानक थांबविल्यानेच झाला आहे. समाेर लाल दिव्याची गाडी दिसताच चालक घाबरून जातात. पाेलिस किंवा परिवहन खात्याचे कर्मचारी वाहनधारकांना मदतीस येत नाही, अडविण्यासाठीच असतात, हे आता महाराष्ट्राला माहीत झाले आहे.

शेजारच्या गुजरात, कर्नाटक किंवा गाेवा आदी राज्यांत वाहनांना थांबवून तपासणी करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्या तुलनेने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमेवर आणि टाेलनाक्यावर पाेलिस वाहने अडविण्यासाठी तैनातच असतात. नियमानुसार तपासणी करण्यास हरकत असण्याचे कारण नाही; पण परराज्यातील किंवा महाराष्ट्रातीलच वेगळ्या विभागातील गाड्या हेरून अडविल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याची वाहने प्रामुख्याने येतात, कर्नाटकाची असतात. त्यांनाच अडविण्याचे उद्याेग भर महामार्गावर सुरू असतात. खान्देशात विदर्भातील अडवायची, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील वाहनांची अडवाअडवी करायची हे प्रकार सर्रास सुरू असतात. तपासणीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचे उघड धंदे आता कोणासाठीच नवीन नाहीत. ठराविक ठिकाणी तपासणी वाहने लावून सर्वच वाहनांची तपासणी करण्याची रचना निर्माण करा, अनावश्यक आणि आडमार्ग पकडून चाेरीछुपे वाहने का अडविता, असा सवाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वैजापूरजवळच्या अपघातात असेच घडले आहे. वास्तविक समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचे नियमन नीट करता न आल्याने दहा महिन्यांत १२८१ अपघात हाेऊन त्यात १२३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. यामध्ये ४१७ माेठे अपघात आहेत. अपघातांची ही मालिका राेखण्यासाठी सजगपणे प्रयत्न हाेत नाहीत. परिवहन खात्याच्या तपासण्यांमुळेही आणखी अपघातांची भर पडत असेल तर हे महाभयानक क्राैर्य आहे. विशेष म्हणजे अपघात माेठा झाला आणि त्यात भाविक यात्रेकरू असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मृतांच्या नातेवाइकांस पाच लाख रुपये जाहीर करतात. वैजापूरच्या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधानांनीही प्रत्येकी दाेन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. माेठा अपघात आणि भाविक असतील तरच अशी मदत जाहीर करण्यात येत असेल तर दरराेज छाेट्या अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? त्यासाठी भाविक-यात्रेकरूच असावे लागते का? एक-दाेन जण ठार झालेल्यांच्या नातेवाइकांना मदतीची गरज नसते का?

दाेन दिवसांपूर्वी कऱ्हाडजवळ पाेलिस कर्मचारी बहीण-भावासह ठार झाले. तेदेखील देवदर्शनालाच जात हाेते. त्यांना पाच अन् दाेन लाखांची मदत जाहीर झाली नाही. लाेकांचा संताप वाढू नये म्हणून ही मदतीची दिलेली हमी आहे का? महाराष्ट्र पाेलिस आणि परिवहन खात्याने अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे वाहनांची तपासणी करावी. ‘वाट’मारीसारख्या मार्गाचा वापर आता बंद करायला हवा. इतर प्रदेशांच्या मानाने महाराष्ट्रात खूप त्रास हाेताे, याबाबतच्या वाहनचालकांच्या प्रतिक्रियाही परिवहन मंत्र्यांनी ऐकायला हव्यात..

Web Title: Editorial: looting on the highway by RTO, Police! Financial assistance only to devotees-pilgrims after accident, why not others...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.