...तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी अन्यथा ‘फिनिशर’चा शेवट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:18 AM2020-01-18T06:18:19+5:302020-01-18T06:18:41+5:30

सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या ‘फॅन्टॅस्टिक फाइव्ह’चा आणि युवराज, झहीर, हरभजन या हुनरबाज क्रिकेटपटूंचा अस्त महेंद्रसिंह धोनीने जवळून पाहिला आहे. स्वत:च्या कारकिर्दीची अखेर कशी व्हावी, याचाही आडाखा त्याने बांधलेला असणार.

Editorial on Mahendra Singh Dhoni only then the chance to end a brilliant career otherwise | ...तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी अन्यथा ‘फिनिशर’चा शेवट?

...तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी अन्यथा ‘फिनिशर’चा शेवट?

googlenewsNext

‘शायनिंग इंडिया’चा बोलबाला सन २००० नंतरच्या पहिल्या दशकात सुुरू झाला तेव्हा भारतीय क्रिकेटही वेगाने बदलत होते. परदेशात जाऊन यशाची चव चाखण्याची सवय भारताला पुन्हा एकदा सौरव गांगुलीने लावली. मुंबई-दिल्ली-बंगळुरू-कोलकाता अशा ‘मेट्रो सिटीज’च्या पलीकडे जाऊन नजफगडातून कोणी वीरेंद्र सेहवाग थेट आंतरराष्ट्रीय मैदानात धीटाईने ‘तोडफोड’ करू लागला. श्रीरामपुरातून येणारा झहीर खान हा वेगवान गोलंदाज विदेशी फलंदाजांना घाबरवू लागला. ‘इंडिया’प्रमाणेच भारतातल्या छोट्या गावांमधले तरुण जगात नाव कमावण्याची उमेद बाळगू लागले. त्यासाठी लागेल ते परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. महेंद्रसिंह धोनी हा रांचीतला रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून काम करणारा तगडा तरुण याच वर्गाचा प्रतिनिधी होता.

Image result for dhoni

स्वत:च्या गुणवत्तेवर प्रचंड विश्वास, कसलेही दडपण न घेता कोणत्याही स्तरावर कामगिरी करण्याचा बिनधास्तपणा हे या मंडळींचे सर्वात मोठे बळ. सन २००४ मध्ये धोनीने एकदिवसीय संघात पदार्पण केले, पण पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पुढचे सलग तीन सामने किरकोळीत गेले. तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्यावरचा विश्वास तरी कायम ठेवला आणि तो धोनीने सार्थ केला. पाचव्या सामन्यात त्याने पाकिस्तानच्या दर्जेदार गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १४८ धावा ठोकल्या; त्यानंतर धोनीने मागे वळून पाहिले नाही. कितीही कठीण प्रसंग आणि कोणताही प्रतिस्पर्धी असला तरी धोनी खंबीरपणे उभा राहू लागला. हरलेला सामना जिंकण्याची उमेद धोनी दाखवू लागला. शेवटच्या षटकापर्यंत सामना न्यायचा आणि हुकमी फटके लगावत विजयश्री खेचून आणायची सवयच जणू त्याने भारताला लावली. प्रतिस्पर्ध्याच्या हातातोंडातला घास काढून घेण्याच्या जिगरबाज शैलीने धोनीला एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वात यशस्वी ‘फिनिशर’ बनवले.

Related image

सन २००७ मध्ये सचिन तेंडुलकरच्या शिफारशीवरून नवख्या धोनीकडे त्या वेळी पहिल्यांदाच होणाऱ्या ‘टी-टष्ट्वेन्टी’ विश्वकरंडक स्पर्धेसाठीचे नेतृत्व देण्यात आले. धोनीने तो विश्वकरंडक जिंकला. त्यानंतर चार वर्षांनी भारतात झालेला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून दिला. ‘आयसीसी ट्रॉफी’ त्याच्या नेतृत्वाखाली जिंकली. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल ठरला तो त्याच्याच नेतृत्वात. यशासारखे दुसरे काहीच नसते आणि अपयशासारखेही कडू काही नसते. ज्या धडाकेबाज आणि अविश्वसनीय रणनीतीने धोनीने भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिले त्याच धोनीची बॅट अडखळू लागली. ‘कॅप्टन कूल’ आणि चपळ यष्टिरक्षक म्हणून धोनीची कामगिरी अगदी कालपर्यंत अव्वल होती, मात्र त्याच्यातला स्फोटक फलंदाज विझू लागला. त्याच्या ताकदी फलदांजीतले कमकुवत दुवे जगभरचे गोलंदाज हेरू लागले. धोनीने वाढत्या वयाचा इशारा लक्षात घेत २०१४ मध्ये कसोटीतून अकस्मात निवृत्ती घेतली.

Related image

आंतरराष्ट्रीय कारकिर्द लांबवण्याचा त्याचा हा प्रयत्न होता. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलिया (२०१५) आणि इंग्लंड (२०१९) मधल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत धोनीच्या फलंदाज म्हणून मर्यादा आणखी उघड झाल्या. क्रिकेट क्रूर असते. येथे इतिहासाला किंमत नसते. गेल्या वर्षीच्या विश्वकरंडकानंतर एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी धोनीची निवड झाली नाही. हा इशारा न समजण्याइतका धोनी दूधखुळा नाही. तरी अद्याप त्याने निवृत्ती जाहीर केली नाही. यंदा ऑस्ट्रेलियातला ‘टी-टष्ट्वेन्टी’ विश्वकरंडक खेळण्याची त्याची इच्छा असणार. त्यासाठी त्याला येती ‘आयपीएल’ एकहाती खेळ करून गाजवावी लागेल, तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी त्याला मिळेल. ती मिळाली नाही तरी ‘स्मॉल टाऊन बॉय’ची अचंबित करणारी यशोगाथा म्हणून धोनी क्रिकेटमध्ये अजरामर राहील. जागतिक क्रिकेटवर स्वत:चा अमिट ठसा उमटवणाºया क्रिकेटपटूंच्या यादीतले धोनीचे अढळ स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर जगात नाव कमावता येते, ही प्रेरणा धोनी सदैव देत राहील.

Related image

Web Title: Editorial on Mahendra Singh Dhoni only then the chance to end a brilliant career otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.