शतकवीर पाऊस अन् कृषीक्षेत्राच्या अपेक्षांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:00 AM2021-06-03T06:00:55+5:302021-06-03T06:01:18+5:30
ग्रामीण विभागाला संजीवनी ठरणाऱ्या कृषी क्षेत्राची गती कमी हाेऊ नये, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे अप्रत्यक्ष नियंत्रण मान्सूनच्या वाऱ्यात आणि त्याद्वारे पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज एक शुभवर्तमान ठरले आहे.
भारतीय हवामान विभागाने नैर्ऋत्य मान्सूनच्या पहिल्या दिवशी नव्याने अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या मान्सूनमध्ये १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस हाेईल, असा अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी १६ एप्रिल राेजी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ९८ टक्के पाऊस हाेईल, असे म्हटले हाेते. हवामान विभागाच्या छत्तीस विभागांतर्गत घेतलेल्या आढाव्यानुसार आता हा पाऊस पुन्हा एकदा शतकवीर ठरणार आहे. भारतात नैर्ऋत्य मान्सून पावसाने सुमारे सत्तर टक्के पाणी उपलब्ध हाेते. निम्म्याहून अधिक शेती पावसावर अवलंबून असल्याने हवामान विभागाच्या अंदाजाला महत्त्व आहे. काेराेना संसर्गामुळे सलग दुसऱ्या आर्थिक वर्षातही उद्याेग, व्यापार आणि सेवा क्षेत्राची गती मंदावली आहे. अशा पार्श्वभूमीवर गतवर्षी सरासरी १०९ टक्के पाऊस झाल्याने भारतीय कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला हातभार लावला हाेता. यापूर्वी १९९४ मध्ये सरासरी ११० टक्के पाऊस झाला हाेता. हा माेठा कालावधी आहे.
चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगामातील जिरायत तसेच सिंचनाखालील क्षेत्रात पेरण्या हाेऊ शकतात. गतवर्षी भारतीय शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ११ काेटी १६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली हाेती. परिणामी अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळाले. त्याच्या मागील वर्षी (२०१९) १० काेटी ६६ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या हाेत्या. काेराेनामुळे शहरी विभागातील असंघटित क्षेत्रातील राेजगार माेठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामध्ये काम करणारा कामगारवर्ग ग्रामीण भागाकडे परतला आहे. या वर्गाने उत्तम पाऊस झाल्याने शेतीवर काम करून अधिक उत्पादनास हातभार लावला हाेता. कोरोना संसर्सगात दुसऱ्या लाटेतही हाहाकार माजल्याने हा कामगार वर्ग परत आपल्या गावाकडे परतला आहे. गतवर्षी जुलै महिन्याचा अपवाद वगळता सरासरीपेक्षा अधिक पाऊस तीन महिन्यात झाला हाेता. परिणामी खरीप हंगामाबराेबर रब्बी हंगामही साधला गेला हाेता. आपल्या देशात यासाठीच नैर्ऋत्य मान्सून पावसाचे महत्त्व खूप आहे. शेतमालाच्या उत्पादनावर त्याच्या व्यापाराचे गणितही मांडले जाते. ग्रामीण भागात राेजगारही उपलब्ध हाेताे आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थादेखील गतिमान हाेते. त्यासाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे.
मध्यंतरी अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात उठलेल्या चक्रीवादळाने मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम झाल्याने केरळमध्ये १ जूनला येणारा पाऊस दाेन तीन दिवसांनी लांबणीवर पडला आहे. कदाचित ताे आठवडाभरही लांबणीवर पडू शकताे. मात्र याचा सरासरी पावसावर परिणाम हाेणार नाही, असा दिलासा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभाग अलीकडे व्यक्त करीत असलेले अंदाज खरे येऊ लागल्याने शेतकऱ्यांना नियाेजन करणे साेपे हाेऊ लागले आहे. ‘यास’ आणि ‘ताैक्ते’ चक्रीवादळाचा अंदाजही तंताेतंत वर्तविण्यात आला हाेता. राज्य प्रशासन तसेच केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दक्षता घेतल्याने मनुष्यहानी कमी झाली. वीजपुरवठा राेखणे, प्रवासी वाहतूक राेखणे, समुद्रातील इतर व्यवहार थांबविणे शक्य झाले. परिणामी आर्थिक नुकसानही कमी झाले. हवामान विभाग छत्तीस विभाग तयार करून त्या त्या विभागातील अंदाजही मांडत असल्याने विशाल खंडप्राय देशाचे नियाेजन करणे साेयीचे ठरणार आहे. दरवर्षी दाेन-तीन वेळा मान्सूनपूर्व अंदाज व्यक्त करण्याबराेबरच दर पंधरवड्याचे हवामान अंदाज देखील सांगण्याची गरज आहे.
गतवर्षी मान्सूनची सुरूवात लवकर झाल्याने शेतकऱ्यांनी घाईगडबडीने खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र जुलै महिना अनेक विभागात काेरडा गेल्याने अनेक पिकांना फटका बसला. विशेषत: तेलबियांच्या पिकांचे नुकसान माेठ्या प्रमाणात झाले. त्याचा परिणाम उत्पादनावर हाेऊन सध्या खाद्यतेलाचे भाव जवळपास एका वर्षात दुप्पट झाले आहेत. शिवाय पामतेल माेठ्या प्रमाणात आयात करण्याची गरज निर्माण झाली. यासाठी नियाेजन करण्याकरिता हवामान विभागाने कृषी खात्याशी समन्वय ठेवून काम केले पाहिजे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियाेजन आणि अंदाज मांडणे यात माेठी तफावत पडणे आता परवडण्यासारखे नाही. पुढील एक-दाेन वर्षांत काेराेना विषाणूच्या संसर्गाची स्थिती काय असेल याचा अंदाज सांगता येत नाही. कृषी क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांचे अर्थकारण पार बिघडून गेले आहे. त्याचा फटका शहरी विभागांना सर्वाधिक बसला आहे. ग्रामीण विभागाला संजीवनी ठरणाऱ्या कृषी क्षेत्राची गती कमी हाेऊ नये, ही अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे अप्रत्यक्ष नियंत्रण मान्सूनच्या वाऱ्यात आणि त्याद्वारे पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज एक शुभवर्तमान ठरले आहे.