संपादकीय: मदांधांचा नंगानाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:16 AM2021-08-25T07:16:30+5:302021-08-25T07:16:54+5:30
केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांची भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा हेतू केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांशी संवाद साधणे हा असल्याचे जाहीर केले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत प्रथा, परंपरांना तिलांजली देऊन ते अधिकाधिक हिंस्र व विकृत करण्याची सर्वच पक्षात अहमहमिका लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्याची टपोरीछाप भाषा केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे वापरतात, शिवसैनिक नाशिक, पुणे वगैरे शहरात लागलीच राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतात व तत्काळ पोलीस बाकी सर्व कामे सोडून राणे यांच्या अटकेकरता धाव घेतात, काही शहरांत शिवसैनिक व भाजप स्वयंसेवक कोरोनाबिरोना विसरून रस्त्यात लठ्ठालठ्ठी करतात अशा दिवसभराच्या घडामोडींनी छोट्या पडद्यावरील अफगाणिस्तानातील हिंसाचारालाही बाजूला सारले.
केंद्रात नव्याने मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांची भाजपने जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेचा हेतू केंद्र सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवणे व लोकांशी संवाद साधणे हा असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुंबईतील यात्रेची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन करणार, असे सांगून राणे यांनी ही यात्रा राडा करण्याकरिता असल्याचे जणू सूतोवाच केले. लागलीच काही सेना नेत्यांनी स्मारकात पाय ठेवून बघा, असा इशारा दिला. मात्र स्मारकापाशी होणारा संभाव्य राडा टळला. राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जाहीर सभांचे कार्यक्रम टाळले हेही बोलके होते. त्यानंतर महाडमध्ये राणे यांची जीभ घसरली. राणे हे स्वत: मुख्यमंत्रिपदी राहिले असून, आता केंद्रात मंत्री आहेत. आपले वक्तव्य मुख्यमंत्रिपदाची व स्वत:च्या पदाचीही अप्रतिष्ठा करणारे आहे, याचे भान त्यांना न रहावे इतका त्यांचा मधुमेह बळावणे चांगले नाही. देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्रिपदी राहिले आहेत. राणे यांचा बचाव करताना ते वकिली युक्तिवाद करतात की, राणे यांच्या वक्तव्याशी सहमत नाही; पण त्यांच्यावरील कारवाईला विरोध आहे. गुन्ह्याचे समर्थन नाही, पण शिक्षेला विरोध हा फडणवीस यांचा बचाव हास्यास्पद आहे.
पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याकरिता राणे, फडणवीस व प्रवीण दरेकर दौऱ्यावर गेले असता अधिकारी हजर न राहिल्याने राणे यांचा पारा चढला तेव्हा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरेकर यांचा राणे यांनी सर्वांसमक्ष एकेरी उल्लेख केला होता. ‘मुख्यमंत्री गेला उडत’, असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे राणे हे शिवसेनेला अंगावर घेण्याकरिता हेतूत: मुख्यमंत्र्यांचा शेलक्या शब्दांत वारंवार उल्लेख करीत होते, असेच दिसते. राडा करणे ही भाजपची संस्कृती नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. मग महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राणे यांना मंत्रिपद देऊन ताकद का दिली, याचेही उत्तर त्यांना द्यावे लागेल. राणे यांच्या अंगी निश्चित काही गुण आहेत. शिवाय ज्या परिस्थितीतून वर येऊन त्यांनी स्वत:ला सिद्ध केले ते वाखाणण्याजोगे आहे. परंतु सत्तेचा स्पर्श होताच राणे मदांध का होतात ते कळत नाही. राणे यांनी पातळी सोडून वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेतील नेत्यांनी त्यांना दिलेले प्रत्युत्तर हेही तेवढेच हिणकस भाषेतील आहे. सत्ता हाती असल्यावर अधिक प्रगल्भतेने वर्तन करायला हवे, याचा विसर सेनेलाही पडल्याचे स्पष्ट जाणवते. आकसपूर्ण व वावदूक वर्तनाची जणू केंद्र व राज्य सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे असे वाटते. आता राणे यांना पोलिसांनी अटक केल्याने भाजपमध्ये राणे यांची उंची वाढणार व ते कदाचित थेट फडणवीसांशी स्पर्धा करू लागतील.
मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे यापूर्वी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर टीका करून राणे जसे अडचणीत आले तसे ते भाजपमध्ये वागणार नाहीत, याची कोण हमी देणार? जोपर्यंत शिवसेना सत्तेवर आहे तोपर्यंत राणे यांचे भाजपमध्ये महत्त्व आहे. राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य करताच शिवसैनिक वेगवेगळ्या शहरात आक्रमक झाला. युवासेनेच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पाहणारे वरुण सरदेसाई तर शिवसैनिक घेऊन जुहूत राणेंच्या निवासस्थानी धडकले. वेगवेगळ्या शहरांत राडेबाजी करून दोन्ही पक्षांनी माध्यमांना टीआरपी व सर्वसामान्यांना उबग दिला. महाविकास आघाडी व भाजप यांच्या ताब्यात असलेल्या सर्व महापालिकांत टक्केवारीला ऊत आला आहे. कुठे एसीबी कारवाई करतेय तर कुठे आयकर विभागाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येतेय. रस्त्यांना खड्डे, अपुरा पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकामे, महापालिकांच्या रिकाम्या तिजोऱ्या याबद्दल बोलायला एकाही पक्षाला तोंड नाही. कारण याबाबत एकाही पक्षाने भरीव असे कार्य केलेले नाही. त्यामुळे असे वर्तन करायचे की, ६० ते ६५ टक्के मतदार निवडणुकीत मतदानाला बाहेरच पडणार नाही. मग आपली कट्टर, बांधलेली प्रजा आणून मतदान करवून घ्यायचे आणि पुन्हा गळ्यात गळे घालून राज्य करायचे, हाच या मागील हेतू आहे.