सारेच शेजारी उपद्रवी; दररोज वाढवताहेत अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:56 AM2021-10-21T05:56:28+5:302021-10-21T05:56:56+5:30
निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत.
निंदकाचे घर असावे शेजारी, परि चेष्टेकरी असू नये,’ असे संत तुकारामांनी लिहिले तेव्हा त्यांना भारताचे सारेच शेजारी केवळ निंदकच नव्हे, तर उपद्रवीही असतील, हे माहीत नव्हते. आज आपले सारे शेजारी रोजच्या रोज आपल्याला उपद्रव देत आहेत. अगदी आताचे उदाहरण म्हणजे बांग्लादेशचे. दुर्गापूजेचा उत्सव पश्चिम बंगालमध्येही वर्षानुवर्षे उत्साहाने, आनंदाने साजरा होतो; कारण बांग्लादेश व पश्चिम बंगाल यांचे पूर्वापर नाते आहे. ते जसे भाषिक आहे, तसेच सांस्कृतिकही आहे. धर्म भलेही वेगळे असोत; पण दोन्हीकडील लोकांमधील सांस्कृतिक वीण इतकी वर्षे टिकून आहे. खरे तर आता ती टिकून होती, असे म्हणायची वेळ आली आहे, याचे कारण दुर्गापूजेच्या काळात यंदा बांग्लादेशात झालेला हिंसाचार. यंदाचा हा हिंसाचार धार्मिक आहे. हिंदू विरुद्ध मुस्लीम असे स्वरूप त्याला आले आहे. त्यामुळेच बहुसंख्य हिंदू राहत असलेल्या भारताला त्याची दखल घेणे, काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
या हिंसाचारात दुर्गापूजेचे मंडप तोडून टाकण्यात आले, इस्कॉन मंदिराचे नुकसान करण्यात आले आणि काहींना तर ठारच मारण्यात आले. अलीकडील काळातच काय, पण पूर्वीही बांग्लादेशात हिंदूंवर इतके हल्ले झाले नव्हते; पण सर्वच देशांत अतिरेकी वा टोकाचा धार्मिक विचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे असहिष्णुता वाढणे स्वाभाविकच आहे. याला बांग्लादेशही अपवाद राहिलेला नाही. बांग्लादेशचे सरकार हिंसाचाराच्या विरोधात बोलत आहे, अनेक जणांवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. पण दुर्गापूजा उत्सवामुळे एरवी जो धार्मिक सलोखा वाढत असे, त्याला यंदा तडाच गेला आहे. त्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. अगदी अमेरिकेतही बांग्लादेशातील हिंसाचाराविरोधात निदर्शने झाली, अन्य देशांनीही त्याची निर्भर्त्सना केली. भारतात त्याची उलटी प्रतिक्रिया आली नाही, हे सुदैवच म्हणायला हवे. आपल्याकडेही टोकाचा विचार करणारे व असहिष्णू लोक आणि त्यांच्या संघटना बक्कळ आहेत. तरीही इथे अद्याप शांतता आहे, ही बाब समाधानाची.
बांग्लादेश हे अलीकडील काळातील उदाहरण; पण भारताचे अन्य शेजारी देशही गेल्या काही काळात उपद्रवी बनले आहेत किंवा त्यांच्या उपद्रवाचे प्रमाण वाढले आहे, असे म्हणता येईल. भारत आणि या शेजारी राष्ट्रांमधील संबंध पूर्वीइतके मधुर वा चांगले न राहिल्याचाच हा परिणाम म्हणता येईल. पाकिस्तान तर कायमच त्रास देणारा शेजारी आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर सतत तणाव असतो, तेथून घुसखोरी होत असते. तेथील गुप्तचर यंत्रणा भारतातील तरुणांना, गुन्हेगारांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत असतात. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यात आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात पाकिस्तानचाच हात असतो. आपण भारताविरुद्धचे युद्ध कधीही जिंकू शकणार नाही, हे माहीत असल्याने पाकिस्तान अशा उपद्रवी कारवाया करीत असतो. पाकिस्तानच्या कारवायांमुळेच गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये अशांतता आहे. रोज चकमकी होत आहेत, अतिरेकी मरत आहेत आणि भारताच्या सुरक्षा दलाचे जवानही शहीद होत आहेत.
लडाख आणि अरुणाचलच्या सीमेवर चीनचे सैनिक रोजच त्रास देत आहेत. गेल्या वर्षी ते गलवान खोऱ्यात घुसले. यंदा उत्तराखंडात घुसून त्यांनी एक पूल तोडून टाकला. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग आहे, असा दावा चीन सतत करतो आणि तिथेही कुरापती काढत असतो. आता तर चीनने युद्धाची भाषा सुरू केली आहे. तसे प्रत्यक्ष घडणार नाही, ही बाब वेगळी; पण त्या सीमेवरही आपल्याला सावध राहावे लागणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या भूतानच्या सीमा सांभाळण्याचे काम आपण आतापर्यंत करीत आलो, त्या भूताननेच अलीकडे चीनशी परस्पर व आपल्याला अंधारात ठेवून एक करार केला आहे.
नेपाळ हा भारताचा दोस्त असे आपण मानत राहिलो; पण आता नेपाळलाही आपल्यापेक्षा चीनच अधिक जवळचा वाटू लागला आहे. नेपाळ, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका यांना अर्थसाहाय्य करून चीन त्यांना आपल्या कवेत घेत आहे. आपणही या देशांना मदत करतोच; पण त्या देशांशी आपले संबंध पूर्वीइतके उत्तम राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ते सुधारावे लागतील. पाकिस्तान व बांग्लादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत, म्हणून आपण तसे वागून चालणार नाही. तसे केल्याने संबंध आणखी बिघडतील. चीनच्या हातात कोलीत मिळता कामा नये. त्यासाठी शेजारी अधिक उपद्रवी असून चालणार नाही. ती जबाबदारीही आपलीच आहे.