अग्रलेख : सिंह... शालीन आणि हिंस्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:29 AM2022-07-14T07:29:17+5:302022-07-14T07:29:52+5:30

नव्याने विकसित होणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनाच्या शीर्षस्थानी बसविण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून दुर्दैवी वाद उभा राहिला आहे.

editorial on central vista pm narendra modi inaugurate national emblem and its controversy | अग्रलेख : सिंह... शालीन आणि हिंस्र

अग्रलेख : सिंह... शालीन आणि हिंस्र

googlenewsNext

नव्याने विकसित होणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनाच्या शीर्षस्थानी बसविण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून दुर्दैवी वाद उभा राहिला आहे. तब्बल साडेनऊ टन वजनाच्या, सात मीटर उंचीच्या या भव्य प्रतिकृतीचे अनावरण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या उपस्थितीत केले.

ती छायाचित्रे समोर येताच अनेकांनी आक्षेप घेतला, की १९५० साली प्रजासत्ताक भारताने राष्ट्रीय चिन्ह किंवा राजमुद्रा म्हणून स्वीकारलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांपेक्षा या सिंहांची भावमुद्रा थोडी हिंस्र वाटते. मूळ अशोकस्तंभावरील सिंह शांत, धीरगंभीर, शालीन व अर्थातच सामर्थ्यशाली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर महासत्तेचा सार्थ अभिमान, आत्मविश्वास दिसताे. भक्ष्यावर झडप घालण्याची घाई त्यात नाही. विरोधकांनी आक्षेप घेतला, की केवळ सिंहांची छबीच नव्हे तर राष्ट्रपती-उपराष्ट्रपती आणि विरोधी पक्षांना या कार्यक्रमापासून दूर ठेवणे गैर आहे. त्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अपेक्षित प्रतिक्रिया उमटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी, त्यांना लक्ष्य बनविण्यासाठी विरोधकांनी शोधलेली आणखी एक संधी वगळता यात काहीही नाही, असे भाजपचे म्हणणे.

काही इतिहासकार व अभ्यासकांचे सिंहांच्या भावमुद्रेबद्दलचे आक्षेप मात्र नागरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी खोडून काढले. त्या भव्य प्रतिकृतीचे छायाचित्र समोरून घेणे शक्य नसल्यामुळे ते खालच्या बाजूने घेतले गेले व त्यामुळे सिंहाचा चेहरा उग्र दिसतो, असा पुरी यांचा प्रतिवाद आहे आणि सारनाथ येथील मूळ अशोकस्तंभ व या प्रतिकृतीच्या आकाराची, वजनाची तुलना करता हा प्रतिवाद बऱ्याच जणांना पटण्यासारखाही आहे. त्यातून हेदेखील स्पष्ट झाले, की आता या वादाचे पुढे फारसे काही होणार नाही. ज्यांनी आयुष्यभर इतिहास संशोधन केले, ऐतिहासिक घटना आणि प्रतीके, प्रतिमांचा अभ्यास केला, त्यावरून काही अनुमान काढले, त्याला मान्यता मिळाली, असे मान्यवर काही आक्षेप घेत असतील व सरकारचे मंत्री त्यावर तितक्याच गंभीरपणे उत्तर देत असतील, सरकारची बाजू मांडत असतील, तर ते लोकशाहीमूल्यांना धरून, खुल्या संवादाचा धागा पकडून होत आहे, असे म्हणावे लागेल. तथापि, सरकारच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावरच टाकली आहे, असे स्वत:च ठरवून काही वाचाळवीर ज्या प्रकारे या वादात उतरले आहेत व खतपाणी घालत आहेत ते केवळ संतापजनक नाही तर गंभीरपणे विचार करायला लावणारे आहे. ही सगळी मंडळी सत्ताशरण आहेत.

सार्वभौम देशाच्या राजमुद्रेबद्दल, राजचिन्हांबद्दल पुरेसे गांभीर्य न बाळगता केवळ सत्तास्थानांना खूश ठेवण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे. त्यातूनच, सिंह असाच असतो, तो बकरीसारखा शांत कसा असू शकेल किंवा शेर दहाडते हुए अच्छा दिखता है, अशी मुक्ताफळे केवळ आक्षेप घेणाऱ्यांना डिवचण्यासाठी काही मान्यवरांनी केली आहेत. त्यात ज्यांनी विवेक व तारतम्य गुंडाळून ठेवले आहे व ज्यांच्या सत्तानिष्ठेबद्दल अजिबात शंका नाही असे थोर कलावंत आहेत. आधीच ज्यांची गोदी मीडिया अशी संभावना होते असे काही पत्रकार आहेत. खंत अशी, की या शिल्पकृतीचे कर्तेकरविते शिल्पकारही मूळ राजमुद्रेबद्दल न बोलता सिंहाच्या गुणवैशिष्ट्यांवर जाहीरपणे बोलत आहेत. तरी बरे सम्राट अशोकाने शांततेचे प्रतीक म्हणून सिंह का निवडले यावर ते विचार करताहेत. भारताच्या ज्ञात इतिहासातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सम्राट अशोक अजिबात दुबळा नव्हता.

कलिंगासह अनेक लढाया जिंकल्यानंतर, त्यातील रक्तपातानंतर त्यांना तथागत बुद्धाच्या अहिंसा तत्त्वाचे महत्त्व पटले होते. म्हणून त्यांनी उरलेले आयुष्य बुद्धविचारांच्या प्रसारासाठी घालविले आणि आपल्या मुलामुलींनाही भारताच्या सीमापलींकडे या मानवीय, अर्थातच ईश्वरी कार्यासाठी पाठवले.  साम्राज्याचा वृथा अभिमान किंवा अहंकार म्हणून सम्राट अशोकांनी अशा धीरगंभीर सिंहमुद्रांचे राजचिन्ह नक्कीच स्वीकारले नव्हते.

सिंह हा हिंस्र प्राणी असूनही तो शांत, गंभीर यासाठी आहे की स्वत:च्या सामर्थ्याची त्याला पुरेशी जाणीव आहे व ते सामर्थ्य कुठे वापरायचे याचे भानही आहे. तसेही दया, क्षमा, शांती ही बलवानांनाच शोभून दिसते. दुबळ्यांच्या अहिंसेला फारशी किंमत नसते. आपण म्हणतोही, क्षमा वीरस्य भूषणम्... तेव्हा, अशा वादांवर गंभीरपणेच चर्चा व्हावी. समाजमाध्यमांवरील ट्रोलिंगचा नवा मुद्दा असे त्याचे स्वरूप असू नये.

Web Title: editorial on central vista pm narendra modi inaugurate national emblem and its controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.