मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?
By विजय दर्डा | Updated: February 10, 2025 08:16 IST2025-02-10T08:15:39+5:302025-02-10T08:16:26+5:30
पॅलेस्टिनी लोकांना तिथून बाहेर काढून संपूर्ण गाझा पट्टीवर कब्जा करण्याची, तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर देखणे शहर उभारण्याची भाषा ट्रम्प का करीत आहेत?

मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक; गाझामध्ये ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार का?
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात जवळपास नेस्तनाबूत झालेल्या गाझा पट्टीविषयी ट्रम्प यांची दोन विधाने, तसेच त्यांचे जावई तथा पूर्वीचे सल्लागार जेरेड कुशनर यांचे एक विधान एकत्र करून पाहिले, तर परिस्थिती स्पष्ट होईल. ‘गाझा पट्टी खरे तर उद्ध्वस्त करण्यासारखीच जागा आहे’, असे ट्रम्प अलीकडेच म्हणाले आणि त्यापाठोपाठ त्यांचे दुसरे वक्तव्य आले. ते म्हणाले, ‘गाझा पट्टीवर नियंत्रणासाठी अमेरिका तयार असून, त्या ठिकाणाला मध्यपूर्वेतील सुंदर समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य बहाल करण्याकडे आम्ही लक्ष देऊ.’ ट्रम्प यांनी ‘रिव्हिएरा’ हा शब्द वापरला. या इटालियन शब्दाचा अर्थ समुद्रकिनारा. फ्रेंच आणि इटालियन समुद्रकिनारे जगभरात पर्यटनासाठी ओळखले जातात. त्यातच ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर म्हणाले, ‘गाझाचा समुद्रकिनारा अत्यंत मौल्यवान असून, जर योग्य प्रकारे विकसित केला, तर मोनॅकोपेक्षाही देखणा होऊ शकतो!’
याचा अर्थ आता गाझा पट्टीत ‘ट्रम्प टॉवर’ उभे राहणार आहेत काय? डोनाल्ड ट्रम्प हे बांधकाम व्यावसायिक असून, जगात अनेक ठिकाणी त्यांच्या कंपनीचे आलिशान ‘ट्रम्प टॉवर’ उभे आहेत. गाझावर अमेरिकेचा कब्जा शक्य आहे काय? कायदेशीरपणे पाहता अजिबात नाही. परंतु अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा कधी केली? शिवाय, अमेरिकेला अडवणार कोण, हाही एक प्रश्न आहे. गाझा पट्टीविषयी अमेरिकेच्या मनात असे काही असेल, याचा अंदाजही कुणाला आला नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिका दौऱ्यावर असताना ट्रम्प यांनी एकाएकी हे विधान केले. दुसरा कुठला पर्याय नसल्याने पॅलेस्टिनी गाझा पट्टीत नाइलाजाने परत येत आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. ‘आता पॅलेस्टिनींना दुसऱ्या कुठल्या जागी वसवून शांतपणे जगू दिले पाहिजे. गाझा पट्टीवर नियंत्रण आल्यावर अमेरिका या संपूर्ण प्रदेशाचे पुनर्निर्माण करील. रोजगार उपलब्ध करून देईल,’ असे ट्रम्प यांनी सांगितले. या भागातील लोकांना जॉर्डन, तुर्कस्तान आणि इतर अरब देशांनी आपल्यात सामावून घ्यावे, अशीही ट्रम्प यांची इच्छा आहे.
खरे तर, गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांनी आपले ‘घर’ सोडून दुसऱ्या ठिकाणी का जावे? हाही एक प्रश्न आहे. त्यांना बेघर करण्याची योजना मांडणारे ट्रम्प कोण? ‘या प्रदेशाला शांततेच्या मार्गाने घेऊन जाऊ आणि तेथील लोकांना जगण्याचा नैसर्गिक अधिकार मिळवून देऊ’, असे ट्रम्प म्हणाले नाहीत. अमेरिका मध्यपूर्वेत गाझा पट्टीपर्यंत पोहोचली, तर तिला इराण, चीन आणि रशियाच्या विरुद्ध एक तळ उपलब्ध होईल. या भागात अमेरिकेचे सैन्य राहावे, जेणेकरून अमेरिका अधिक बळकट होईल आणि इस्रायलकडेही लक्ष राहील, असा ट्रम्प यांचा मानस आहे.
यावर मध्यपूर्वेतील देश संतप्त होणे स्वाभाविक आहे. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, तुर्कस्तान, पॅलेस्टाइन प्राधिकरण, कतार आणि अरब लीगने संयुक्तपणे निवेदन काढून ट्रम्प यांच्या योजनेला विरोध केला. द्विराष्ट्र सिद्धांतच मोडीत काढणारी ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी ट्रम्प सैन्याचा वापर करू शकतात काय? - हा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, तेव्हा ‘अमेरिका याकरिता मागेपुढे पाहणार नाही’, असे त्यांचे उत्तर होते. ‘मला जगात कुठेच युद्ध नको आहे,’ असेही ते म्हणतात. परंतु, ट्रम्प मनात आणले तर काहीही करू शकतात, हेही खरे! गाझा पट्टी हा ४५ किलोमीटर लांब आणि सहा ते दहा किलोमीटर रुंद, असा एक छोटा पट्टा आहे. ज्याच्या तीन बाजूला इस्रायलचे नियंत्रण आहे. ट्रम्प यांना याचे महत्त्व कळते, म्हणून गाझावर कब्जा करण्याची त्यांची भाषा अधिक गंभीर आहे.
समजा, ट्रम्प आणि इस्रायल यांनी एकत्र येऊन ही कल्पना अंमलात आणण्याचे ठरवले आणि गाझा पट्टीत सैन्य उतरवले तर काय होईल? - भयानक परिस्थिती निर्माण होईल. कारण, अरब देश हे कदापि सहन करणार नाहीत. मग त्यांची अमेरिकेशी टक्कर होईल का? टक्कर घेणाऱ्यांत कोण-कोण सामील असेल? अमेरिकेशी कायम मैत्री राखणारा सौदी अरेबिया कोणती भूमिका घेईल? ट्रम्प यांची योजना अरब देशातील स्थैर्याला धोका उत्पन्न करील हे सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे. रशिया आणि चीन यावर काय करील? त्या भागात मोठा दबदबा असलेले हमास आणि हिजबुल्ला यांच्याबरोबर काही देश लढाईत सामील होतील काय? मध्यपूर्वेत लढाई सुरू झाली, तर उर्वरित जगावर त्याचा काय परिणाम होईल? परंतु ट्रम्प यांना अशा प्रश्नांशी काय देणे-घेणे? ते तर फक्त ‘अमेरिका फर्स्ट’ असे फलक दाखवत फिरत आहेत.
जाता-जाता
ट्रम्पसाहेब, बेकायदा नागरिकांना आपण बाहेर काढत आहात. आपण शक्तिशाली आहात, म्हणून त्यांना बेड्या घालून लष्करी विमानातून पाठवत आहात. यामुळे जगाला वेदना होत आहेत. अशी वागणूक एखाद्या देशाने अमेरिकेला दिली तर? - याचा जरा विचार करा. जो मानवतेची कदर करतो, तो मोठा असे आम्ही मानतो. यापेक्षा आणखी काय म्हणावे !