शेकडो गब्बरसिंग तुमच्या मोबाइलमधील हालचाली टिपतायेत; वेळीच सावध व्हा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 10:15 AM2022-09-13T10:15:09+5:302022-09-13T10:16:43+5:30
गेमच्या नादात होतो ‘गेम’; मोबाईल ॲप्स आधारित गेम्सची सेवा (?) देणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे.
एखाद्या अनोळखी घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातील लहान मुलाने आपल्या मोबाइलकडे पाहून ‘अंकल, यात गेम आहे का? मला तुमचा मोबाइल गेम खेळायला द्याल का?’, असे विचारल्यावर भावी पिढ्यांमध्ये मोबाइल गेमची क्रेझ किती खोलवर रुजली आहे, याचा अंदाज येतो. अर्थात याचा दोष त्या लहानग्या मुलाचा नाही. त्या लहान पोराने दंगामस्ती करू नये, याकरिता त्याला सतत मोबाइलमधील गेम खेळायला देणाऱ्या पालकांचाच आहे. किंबहुना अशा घरातील पालकही मोबाइल गेम्सच्या अधिन गेले असल्यानेच हा संस्कार त्या लहानग्याला मिळाला आहे. एकेकाळी गणपतीमध्ये कुटुंबातील वडीलधारी एकत्र आल्यावर रम्मी, बिझीक, लँडिज वगैरे पत्त्यातील खेळ खेळले जायचे. लहान मुले वडील, काकांच्या शेजारी बसून त्यांचे पत्ते सांभाळायचे. अर्थात तेव्हाही तो संस्कार लहानपणापासूनच मिळत होता. मात्र आता कोण, कुणाबरोबर, कितीवेळ, कुठला गेम खेळत आहे ते कळायला मार्ग नाही.
मोबाईल ॲप्स आधारित गेम्सची सेवा (?) देणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे. अनेक लोकप्रिय अभिनेते ‘तुम्ही रम्मीचे बादशहा असाल तर तुमच्या गल्लीतील. एक कोटी रम्मी खेळणाऱ्यांना चितपट करण्याचे चँलेंज स्वीकारण्याची हिंमत आहे का तुमच्यात?’ अशा शब्दांत आव्हान देतात आणि मग पत्ते कुटण्याची सवय व संस्कार असलेले अलगद त्या जाळ्यात अडकतात. हातात बंदूक घेऊन समोरच्या शत्रूशी दोन हात करताना काल्पनिक जगात शेकडो लोकांचे मुडदे पाडण्यात धन्यता मानणारे अनेक आहेत. चाळिशी पार केलेल्यांना कुणी हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये डबा ऐसपैस किंवा लपाछपी खेळा म्हटले तर ते तयार होणार नाहीत. पण काही मोबाइल गेम्स लहान मुलांचे असून अनेक मोठी माणसंही ते खेळताना दिसतात. तात्पर्य हेच की, मोबाईलमध्ये तुम्ही काय करताय, हे जगजाहीर होणार नसल्याने अनेकजण गेम्स खेळत असतात. याच आपल्या कमकुवतपणाचा गैरफायदा उठवला जातो.
त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ई-नगेट्स या कंपनीच्या संचालकांवर ईडीने टाकलेल्या छाप्यांत शनिवारी त्यांनी पलंगात लपवलेले १२ कोटी रुपये जप्त झाल्याची घटना. या गेम्सचे ॲप डाऊनलोड केल्यावर सुरुवातीला वॉलेटमध्ये जमा केलेले पैसे गेम खेळला नाही तर काढून घेता येत होते. इतरांना गेम खेळायला प्रोत्साहित केले तर कमिशन दिले जात होते. जेव्हा हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये वॉलेटमध्ये जमा केले तेव्हा मग पैसे काढून घेता येणे बंद झाले. त्याबाबत तक्रारी सुरू झाल्यावर अखेर ईडीने दणका दिला. शेकडो लोकांकडून हडप केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटांच्या पुडक्यांवर गेम्स कंपनीचा संचालक ढाराढूर झोपत होता. ऐंशी-नव्वदच्या दशकात भिशीच्या योजना चालवून दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून अशीच फसवणूक केली जात होती. सुरुवातीला तीन महिन्यांत दुप्पट पैैसे मिळायचे. नंतर मग पैसे घेऊन पोबारा केला जायचा. तसेच हे फसवणुकीचे प्रकरण आहे.
ज्या दिवशी ही कारवाई झाली त्याच दिवशी चिनी लागेबांधे असलेल्या जिलिअन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीच्या उपकंपनीचा संचालक दोर्तस याला सीरियल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसच्या तपास पथकाने देशाबाहेर पळून जाताना पकडले. लोकांना कर्जाचे आमिष दाखवून ॲप डाऊनलोड करायला भाग पाडायचे. मग कर्ज वसुलीकरिता त्यांना ठार मारण्याच्या धमक्या द्यायच्या, असे उद्योग त्याने केले होते. मोबाइलमधील वेगवेगळ्या संदेशांपैकी कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे, कुठल्या गोष्टींवर क्लिक करण्यामुळे आपली आयुष्यभराची कमाई एका मिनिटात गायब होईल, याची कुठलीही माहिती देशातील कोट्यवधी लोकांना नाही. मोबाइलवर गेम्स खेळताना आपले पार्टनर अनोळखी आहेत. त्यामध्ये कुणी सायबर भामटा असल्यास तो तुम्हाला उल्लू बनवू शकतो, याचे भान लोकांना नाही. कुणी कर्ज देतो म्हटले तर लागलीच उड्या मारत होकार भरणारे शेखचिल्ली पावलोपावली आहेत. आजूबाजूच्या वास्तव व काल्पनिक जगातील ऐश्वर्य पाहून झटपट श्रीमंत होण्याचा मोह हेच अशा जाळ्यात फसण्याचे मूळ कारण आहे.
ईडीने एका ई-नगेट्सवर छापा घातला किंवा एका दोर्तसच्या मुसक्या आवळल्या पण, अशा पद्धतीने दरोडे घालणारे शेकडो गब्बरसिंग तुमच्या मोबाइलमधील हालचाली टिपत बसले आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा. अन्यथा गेमच्या नादात तुमचाच गेम होण्याची शक्यता आहे.