अग्रलेख : क्रांतिज्योती अन् विकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 08:20 AM2023-06-02T08:20:55+5:302023-06-02T08:22:56+5:30

इंडिक टेल्स नावाच्या पोर्टलवरील संबंधित मजकूर इतका घाणेरडा, संतापजनक, तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे की त्याचा उल्लेखही करता येत नाही.

editorial on indic tales Offensive article krantijyoti savitribhai phule cm eknath shinde Order of action | अग्रलेख : क्रांतिज्योती अन् विकृती

अग्रलेख : क्रांतिज्योती अन् विकृती

googlenewsNext

स्त्रियांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याचा बादरायण संबंध ब्रिटिश कॅन्टोन्मेंट व सैनिकांच्या शारीरिक गरजांशी जोडणाऱ्या एका वेबपोर्टलविरुद्ध कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जाते. या कारवाईचे स्वागत करायला हवे. इंडिक टेल्स नावाच्या पोर्टलवरील संबंधित मजकूर इतका घाणेरडा, संतापजनक, तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे की त्याचा उल्लेखही करता येत नाही.

माजी मंत्री, महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेतली गेली हे बरे. कारण, वेळीच दखल घेतली नाही तर विकृती बळावत जातात, संताप वाढत जातो, एका क्षणी त्या संतापाचा स्फोट होतो, हे महाराष्ट्राने काही वर्षांपूर्वी जेम्स लेन प्रकरणात अनुभवले आहे. आताच्या प्रकरणात मजकुराचे लेखक व वेबपोर्टल चालविणाऱ्या सरयू ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा आहे. हे प्रकरण संतापजनकच आहे. महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई या दांपत्याचे बहुजन उद्धाराचे कार्य अलौकिक आहे.

विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र वर्गाची जी देदीप्यमान कामगिरी सध्या दिसते, तिचा पायाच मुळी या दांपत्याने घातल्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे. पावणेदोनशे वर्षांपूर्वी पुण्यात काढलेली मुलींची पहिली शाळा हा त्या पायाचा पहिला दगड होता. म्हणूनच सावित्रीबाई स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत ठरल्या. नंतर शासक बनलेले ब्रिटिश व्यापारी हिंदुस्थानातून नफा कमवायला आले हे खरे. हा संपन्न देश त्यांनी लुटला. लष्करी सामर्थ्याच्या बळावर दीडशे वर्षे राज्य केले हेही खरेच. परंतु, शिक्षण, आरोग्य, रेल्वेचे जाळे, दळणवळणाची साधने, टपाल-तार ही संपर्क यंत्रणा, असे बरेच काही या आमदानीतच देशाला मिळाले. ते शिक्षण चांगले की वाईट हा चिरंतन चर्चेचा व वादविवादाचा विषय आहे. तथापि, आपल्या धर्मपरंपरेत ज्ञानार्जनाचे व ज्ञानदानाचे अधिकार विशिष्ट वर्गाला असल्याने शिक्षणापासून वंचित बहुसंख्य समाजात ज्ञानाची गंगा ब्रिटिशांच्या सत्तेमुळे प्रवाहित झाली, हे नाकारता येत नाही.

शिकलेला माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहतोच. साक्षरतेसोबत भारतात स्वातंत्र्याची ऊर्मी आली. मर्यादित असो की संपूर्ण, स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिल्या फळीतले सारे लोक उच्चशिक्षित होते, ही बाब सामाजिक उत्थानाची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरावी. एकप्रकारे ब्रिटिशांनी भारताला आधुनिक जगाचे दर्शन घडविले. प्रगत विचारांचे बीजारोपण त्यातून झाले. मुळात एकोणिसावे शतक सामाजिक सुधारणांचे ठरले. सतीप्रथेवर बंदी, बालविवाहांना प्रतिबंध, संमतीवयाचा कायदा, विधवाविवाहांना मान्यता अशा बहुतेक सुधारणा स्त्रियांशी संबंधित होत्या.

महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई राऊत आदींचे या सुधारणांमधील योगदान ऐतिहासिक आहे. फुले दांपत्याने सुरू केलेला विधवांचा आश्रम, एका विधवेच्या मुलाला दत्तक घेणे, विधवांचे केशवपन रोखण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने पुण्यातील नाभिकांनी केलेला संप, सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गतिमान केलेली बुद्धिप्रामाण्यवादाची परंपरा अशा अनेक गोष्टीमुळे सिद्ध होते, की दोघेही कृतिशील विचारवंत होते.

विशेषतः हिमतीने घराबाहेर पडून, स्वतः शिक्षण घेऊन इतरांनाही शिकविण्यासाठी झटणाऱ्या, प्लेगच्या साथीत शुश्रूषा करतानाच मरण पावलेल्या सावित्रीबाई पतीच्याही दोन पावले पुढे होत्या. म्हणूनच फुल्यांचे कार्य हा भारतीय नवनिर्माणाचा टप्पा मानला जातो. माणसांना माणूस म्हणून जगता यावे, यासाठी झटणारे समाजसुधारक आणि त्यांचे माणूसपण नाकारणारा मनुवादी मानसिकतेचा प्रतिगामी वर्ग यांच्यातला संघर्ष नवा नाही. ज्योतीराव व सावित्रीबाईंच्या हयातीत या वर्गाने त्यांना अतोनात त्रास दिला. भिडेवाड्यातील शाळेत मुलींना शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाईंवर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी शेण फेकले. आताही त्या विकृती पुन्हा तेच करीत आहेत. थेट आरोप न करता, संशय निर्माण करणारे संदिग्ध लेखन व त्यातून कुजबुज हा असा बदनामीचा अश्लाघ्य प्रकार फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अजिबात खपवून घेतला जाऊ नये. अशा विकृती वेळीच ठेचून काढायला हव्यात.

Web Title: editorial on indic tales Offensive article krantijyoti savitribhai phule cm eknath shinde Order of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.