IPL Auction 2022: क्रिकेटविश्वातील भारताची ताकद अन् श्रीमंती डोळे दिपवणारी; तब्बल ५०० कोटींहून अधिक उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:39 AM2022-02-14T05:39:07+5:302022-02-14T05:39:37+5:30
देशी लीग, देशी खेळाडू! काही खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे, तर काही खेळाडूंनी अनपेक्षितपणे मोठी किंमत मिळविली. त्याचवेळी ज्यांनी एकेकाळी आयपीएल गाजविली आहे, अशा दिग्गजांकडे, तर सुरुवातीला सर्वच संघांनी पाठ फिरविली.
दोन दिवस रंगलेल्या आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल ५०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. क्रिकेटविश्वातील भारताची ताकद आणि श्रीमंती डोळे दिपवणारी ठरली. ज्यांनी वयाची २४-२५ वर्षेही पूर्ण केली नाही अशा खेळाडूंनी १० कोटींहून अधिक रक्कम मिळवून लक्ष वेधले. झारखंडचा इशान किशन जो सध्या २३ वर्षांचा आहे, त्याच्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपयांची किंमत मोजून मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल केले. अर्थात यामध्ये इशानच्या मेहनतीचाही वाटा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने चमकदार खेळाने सर्वांना प्रभावित केले. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने त्याला गमावले नाही आणि सर्वांत मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल केले. या लिलाव प्रक्रियेमध्ये अनेक धक्कादायक निर्णय पाहण्यास मिळाले.
काही खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे, तर काही खेळाडूंनी अनपेक्षितपणे मोठी किंमत मिळविली. त्याचवेळी ज्यांनी एकेकाळी आयपीएल गाजविली आहे, अशा दिग्गजांकडे, तर सुरुवातीला सर्वच संघांनी पाठ फिरविली. यावरूनच सध्या आयपीएलमध्ये युवा आणि सळसळत्या रक्ताच्या खेळाडूंना अधिक मागणी असल्याचे दिसून आले. त्यातही भारतीय खेळाडूंसाठी सर्वाधिक मागणी झाल्याने यंदाची आयपीएल खऱ्या अर्थाने ‘इंडियन प्रीमियर लीग’ होईल. अंतिम संघात केवळ चार विदेशी खेळाडूंना खेळविण्याची मुभा. त्यातही तो खेळाडू गोलंदाज असेल, तर केवळ चार षटके म्हणजे २४ चेंडू टाकणार. त्यामुळे ज्या विदेशी खेळाडूंचा प्रभाव अधिक दिसून येईल, अशांसाठी सर्व दहा फ्रेंचाईजींनी प्रयत्न केले.
यामध्ये जेसन होल्डर, लियाम लिव्हिंगस्टोन, वानिंदू हसरंगा यांसारख्या काही विदेशी खेळाडूंची चांदी झाली. भारतीय खेळाडूंबाबत सांगायचे झाल्यास, प्रत्येक भारतीय खेळाडू आयपीएलचा पूर्ण मोसम खेळणार हे निश्चित आहे. विदेशी खेळाडू आयपीएलदरम्यान एखाद्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी आपल्या राष्ट्रीय संघातून खेळण्यास जाऊ शकतो. अशा वेळी त्या फ्रेंचाईजीला फटकाही बसेल. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूला सुरुवातीला कोणत्याही संघाने स्वीकारले नाही. एकतर यंदाच्या आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलियन्स खेळाडू सुरुवातीचे काही सामने पाकिस्तान दौऱ्यात व्यस्त राहतील. त्यात स्मिथ टी-२० क्रिकेटमध्ये फारसा चमकलेला नाही. त्यामुळे अशा खेळाडूंवर पैसा खर्च करताना सर्वच फ्रेंचाईजींनी खूप विचार केला आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी घसघशीत कमाई केली.
लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघाने अंतिम संघ तयार करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. ज्यांचा मैदानावर जास्तीत जास्त प्रभाव दिसेल, अशाच खेळाडूंवर जास्त खर्च करण्याचा प्रयत्न फ्रेंचाईजींनी केला. काही अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा दिलासा मिळाला. शिखर धवन, अंबाती रायूडू, रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंना किंमत मिळाली. पण, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन अशा स्टार खेळाडूंसाठी सुरुवातीला कोणी उत्सुकता दाखविली नाही. यामुळेच मॅचविनिंग अष्टपैलू खेळाडूंसाठी मोठी चढाओढ रंगली आणि यातूनच प्रत्येक फ्रेंचाईजीची मानसिकता दिसून आली. फ्रेंचाईजींनी अनुभव तर पाहिलाच, पण खेळाडूंच्या वयाकडेही लक्ष दिले. टी-२० क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळेच रैना, स्मिथ, हसन या ‘वयस्कर’ खेळाडूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले.
काही खेळाडू स्वस्तामध्ये विकले गेले, जसे की, गेल्या सत्रातील महागडा खेळाडू पॅट कमिन्स कोलकाताला यावेळी अर्ध्या किमतीमध्ये मिळाला. शिवाय अनकॅप्ड खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले. ज्या भारतीय खेळाडूंची घसघशीत कमाई झाली, त्यांचे आयुष्य एका दिवसात बदलेल हे नक्की. पण, त्याचवेळी त्यांना आपल्या खेळाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. सर्वांत महत्त्वाचे, फ्रेंचाईजीने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. बीसीसीआयच्या केंद्रीय करारानुसार अ+, अ, ब आणि क अशा चार गटवारीतील खेळाडूंना दरवर्षी अनुक्रमे सात कोटी, पाच कोटी, तीन कोटी आणि एक कोटी रुपये पगार मिळतो. त्याउलट आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेले खेळाडूही केवळ दोन महिन्यांच्या एका मोसमातून कोटींची कमाई करतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे आयपीएलकडे लक्ष असते. आयपीएलमुळे खेळाडूंना आर्थिक स्थिरता मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीचे हे फळ आहे. पण ही चमकदार कामगिरी आणि तंदुरुस्ती कायम राखणे खेळाडूंपुढील मुख्य आव्हान आहे.