लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:29 AM2022-09-14T11:29:16+5:302022-09-14T11:29:35+5:30

कोरोनाच्या तडाख्यातून माणसे बाहेर येत असताना आता लम्पी चर्मरोगाने जनावरांवर घाला घातला आहे. या रोगाविरुद्धही संघटितपणेच लढावे लागेल.

Editorial on lumpy skin disease on Animal | लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

लम्पी - माणसे झाली, आता जनावरांवर घाला? 

Next

डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. खेड्यापाड्यातील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या रोगाचा प्रादुर्भाव हा जगातील अनेक देशात सन २०१० पासून सुरू झाला. मोझांबिक या देशात सर्वप्रथम या रोगाचे पशुरुग्ण आढळले. त्यानंतर सन २०२० पासून बांगलादेश, चीन, भारतात कुठे ना कुठे या रोगाचा प्रादुर्भाव होत गेला. आता जून २०२२ पासून आपल्या देशात या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. ‘कॅप्रीपॉक्स’ विषाणू जो शेळ्या मेंढ्यांमध्ये देवी या रोगाचा प्रसार करतो, त्याच समूहातील हा विषाणू आहे. प्रामुख्याने देशी गाई, संकरित गाई यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित होतात. तथापि शेळ्या-मेंढ्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आजअखेर जगात कुठेही या रोगाचे संक्रमण मानवात झालेले आढळले नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.

या रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून परजीवी कीटक विशेषतः डास, गोचीड, गोमाशा, घरातील माशा त्याचबरोबर बाधित जनावरांच्या नाकातील, डोळ्यातील स्त्रावाने दूषित चारापाणी यामुळे होतो. बाधित जनावरांची वाहतूक, नवीन जनावरांची खरेदी यामुळेदेखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते. या आजाराची लक्षणे सुद्धा खूप वेगवेगळी आहेत. सर्व लक्षणे एकाच जनावरात दिसतील असे नाही. साधारणपणे विषाणू शरीरात प्रवेश केल्यापासून चार दिवसापासून ते पाच आठवड्यापर्यंत केव्हाही या रोगाची लक्षणे दिसतात. शरीराचे तापमान वाढते. भूक मंदावते. लसिकाग्रंथी सुजतात. दूध उत्पादन कमी होते. नाका-डोळ्यांतून स्त्राव येतो. नंतर शरीरावर एक ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात. त्या अनेक वेळा खोल मांसापर्यंत जातात. तोंडाच्या आतील भाग, श्वासनलिका या ठिकाणी या गाठी, अल्सर निर्माण होतात. डोळ्यांत देखील अल्सर होतात. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. गाठींमध्ये जखमा होऊन पुष्कळ वेळा जनावरे लंगडतात. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोणतीही लक्षणे न दाखवता जनावरे रोगप्रसार करू शकतात. वाढलेली प्रचंड भटक्या जनावरांची संख्या, त्यांची कमी असलेली रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक गोशाळा आणि त्यामधील जनावरांची गर्दी यामुळे काही ठिकाणी या रोगाचा जास्त प्रसार झाला आहे. सोबतच पावसामुळे वाढलेल्या माशा, गोमाशा, गोचीड यामुळे देखील या रोगाचा वेगाने प्रासार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या रोगामुळे होणारे आर्थिक नुकसान दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. या रोगाची लक्षणे जनावरांच्या कातडीवर आढळून येत असल्यामुळे चर्म उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसतो. बऱ्याचदा गाभण जनावरांचा गर्भपात होतो. त्यामुळे वेत फुकट जाते. संक्रमण काळात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घटते. जनावरे अशक्त होतात. त्यांना पुन्हा उत्पादनात आणण्यासाठी मोठा खर्च होतो. कासेवर जखमा झाल्या तर पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. भटकी जनावरे, गोशाळांमधील पशुधन मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले तर त्यांची विल्हेवाट लावणेदेखील जिकिरीचे ठरते.

औषधोपचाराचा भाग म्हणून प्रतिजैवके, वेदनाशामक औषधे, जीवनसत्वे त्याचबरोबर जखमांची व परिसराची स्वच्छता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गोचीड, गोमाश्या, माशा यांचे निर्मूलनही मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक ठरते. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषदांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या रोगावर ‘गोटपॉक्स’ (शेळ्यांमधील देवी) या रोगासाठी वापरली जाणारी लस प्रभावी ठरल्यामुळे लसीकरणासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोबत अनेक भागात आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपचाराचा देखील वापर सुरू आहे. प्रतिबंधक उपायांमध्ये मुख्यत्वे करून बाधित जनावरे विलगीकरणात ठेवणे, त्यांची सेवा-शुश्रुषा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे, संक्रमण काळात नवीन जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी, बाधित भागापासून दहा किलोमीटर परिसरातील बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने, बैलगाडी शर्यती यावर बंदी.. अशा उपायांची गरज आहे. अशा प्रतिबंधक उपचारासाठी पशुपालकांसह पशुसंवर्धन, महसूल, ग्रामीण विकास यंत्रणा यांनी एकमेकांशी सहकार्याने कार्यरत होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच याचे दृश्य परिणाम लवकर मिळतील व मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार रोखता येईल.

महाराष्ट्रात ७ सप्टेंबर २२ अखेर १७ जिल्ह्यात ५९ तालुक्यांमधील १६१ गावे प्रभावित झाली आहेत. एकूण २,८०,०७५ इतक्या पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्हास्तरावर प्रत्येकी दहा हजार लसमात्रा खरेदीसाठी अनुदान वितरित केले गेले आहे. अनेक पशुपालक बैलांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याकडे थोडे दुर्लक्ष करतात. बैलांची प्रतिकारशक्ती जास्त असते, असे वाटल्याने हे दुर्लक्ष होऊ शकते. पण, त्यामुळे काही बैल मृत्युमुखी पडले आहेत. लसीकरण झाल्यानंतरही काही पशुपालक थोडे निर्धास्त होतात. तथापि लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला १५ ते २१ दिवस लागतात. लसीकरणानंतर जनावरे चरायला सोडणे, इतर योग्य काळजी न घेणे जोखमीचे ठरू शकते. एकंदरीतच ज्या पद्धतीने कोविड काळात सर्वांनी सजग राहून लसीकरण आणि जनजागृतीच्या बाबतीत पुढाकार घेतला होता, त्या पद्धतीने सर्वांनी पुढाकार घेणे, लसीचा पुरवठा आणि उत्पादन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. खासगी लस उत्पादकांनाही प्रोत्साहन देऊन पुरेशा लसी उत्पादित होणे आवश्यक आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली (ICAR) यांनी नुकतेच या लम्पी चर्म रोगावर भारतीय बनावटीची लस निर्माण केली आहे. ती लवकर उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा देशातील दुग्ध व्यवसायास होईल.

Web Title: Editorial on lumpy skin disease on Animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.