अग्रलेख : सगळ्यांच्याच झाकल्या मुठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:35 AM2022-10-18T10:35:33+5:302022-10-18T10:36:08+5:30

सारे काही ठरल्यासारखे सोमवारी सकाळी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे उमेदवार मुरजी पटेल माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ....

editorial on maharashtra election andheri vidhansabha bypoll rutuja latke sharad pawar raj thackeray letter | अग्रलेख : सगळ्यांच्याच झाकल्या मुठी

अग्रलेख : सगळ्यांच्याच झाकल्या मुठी

googlenewsNext

कार्यकर्ता-अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेताना विचारलेला, ‘आम्हा मतदारांना काही किंमत आहे की नाही’, हा प्रश्न पुन्हा विचारण्याचे निमित्त आहे, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे. हा प्रश्न आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विचारत आहेत. रविवारी सकाळपर्यंत या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या भाजपसोबत घनघोर लढाईचे चित्र होते. अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिवंगत रमेश लटके यांनी मतदारसंघात केलेले काम आठवले. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याप्रति सहानुभूती दाटून आली.

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, भाजपच्या उमेदवाराने माघार घ्यावी, अशा विनंतीचे पत्र लिहिले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या सुसंस्कृत, शालीन राजकारणाची आठवण करून दिली. एकमेकांशी हाडवैर घेतलेल्या शिंदे गटातील प्रताप सरनाईक यांनाही रात्री उशिरा रमेश लटके यांची दोस्ती आठवली. भाजपला माघार घेण्याची विनंती करा, अशी विनंती त्यांनी मु्ख्यमंत्री शिंदे यांना केली. सारे काही ठरल्यासारखे सोमवारी सकाळी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे उमेदवार मुरजी पटेल माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असला तरी लढतीत आणखी काही उमेदवारही आहेत. त्यांनी माघार घेतली नाही तर ३ नोव्हेंबरला या जागेसाठी मतदान होईलच.

तेव्हा भलेही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होणार नसली तरी भाजपच्या माघारीमुळे आता केवळ सोपस्कार बाकी राहिला आहे. बृहन्मुंबई महापालिकेआधीची लिटमस टेस्ट, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील पहिली खडाजंगी वगैरे गोष्टी मागे पडल्या आहेत. हे इतके सगळे अवघ्या चोवीस तासांत कसे काय बदलले, ही स्क्रीप्ट कोणी लिहिली, यामागची शक्ती कोण, असे भाबडे प्रश्न मतदारांनी विचारायचे नसतात. हे विचारायचे नाही, की सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना असा सुसंस्कृतपणाचा व नैतिकतेचा उमाळा याआधी गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये झालेल्या पंढरपूर, देगलूर व कोल्हापूर दक्षिण या इतर पोटनिवडणुकींमध्ये का आला नव्हता? त्यापुढे हेदेखील विचारायचे नाही, की खुद्द ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेतील सेवेचा राजीनामा लटकला, त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयात धाव का घ्यावी लागली, तिथे महापालिकेच्या वतीने आदल्या दिवशी झालेल्या त्यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे कारण का सांगण्यात आले आणि महत्त्वाचे हे की इतके सारे होत असताना आता शालीन, सुसंस्कृत व नैतिक राजकारणावर बोलणारे नेते त्यावेळी गप्प का राहिले?

थोडक्यात, कार्यकर्ते जरी पक्षीय अभिनिवेश अंगात आल्यामुळे एकमेकांच्या जिवावर उठत असले तरी वरच्या पातळीवर सगळे काही मोठे नेते एकमेकांच्या सोयीने ठरवतात की काय, अशी शंका यावी. अन्यथा, देशातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाकडून आपल्या विनंतीचा मान राखला जाईल याची खात्री असल्याशिवाय राज ठाकरे यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी त्या विनंतीचे पत्र सार्वजनिक करणार नाहीच. असो. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची ही साठा उत्तराची कहाणी भाजप उमेदवाराच्या माघारीमुळे पाचा उत्तरी सुफळ व संपन्न झाली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षांना पुढच्या प्रचारासाठी काही ना काही मुद्दा मिळाला आहे. भाजपने पोटनिवडणुकीत माघार घेतली म्हणून शिवसेनेशी संघर्ष थांबला असे नाही.

उलट हा संदेश आहे, की ‘अशा किरकोळ लढतीसाठी कशाला सगळी ताकद लावायची? बीएमसीच्या निवडणुकीत भेटूच!’ महापालिकेची ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढविणार हे नक्की आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाचा महापालिका निवडणुकीवर नक्कीच परिणाम झाला असता. तेव्हा, झाकली मूठ सव्वालाखाची असा विचार करण्यात आला असावा. राजकारण हा केवळ आणि केवळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. ही अनिश्चितता अलीकडे क्रूरदेखील बनली आहे. त्यामुळे झाकली मूठ केवळ भाजपचीच आहे असे नाही. उद्धव ठाकरे यांचीही पोटनिवडणुकीची दगदग वाचली आणि प्रत्यक्ष लढतीत नसलेल्या बाकीच्या पक्षांनाही प्रोपगंडा करण्यासारखे बरेच आहे.

Web Title: editorial on maharashtra election andheri vidhansabha bypoll rutuja latke sharad pawar raj thackeray letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.