अखेर खरेदीचा ‘भोंगा’ वाजला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:36 AM2022-05-05T11:36:18+5:302022-05-05T11:37:12+5:30
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सोन्याचे वेड असणाऱ्या भारतीय महिलांसाठी सोने खरेदी खऱ्या अर्थाने ‘सुवर्णसंधी’ असते.
महाराष्ट्राचे राजकारण सध्या भोंग्याभोवती घोंगावते आहे. एकमेकांच्या धर्माचे ‘भोंगे’ बंद करण्यासाठी राजकीय मंडळी सरसावली आहेत. राज्यात शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. रमजान आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आल्याने आणि अक्षय तृतीयेला महाआरतीचे आवाहन केल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. परंतु नंतर महाआरतीचे आवाहन मागे घेण्यात आले. सुदैवाने हे दोन्ही सण उत्साहात आणि आनंदात पार पडले. विशेषत: अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. सोन्याचे वेड असणाऱ्या भारतीय महिलांसाठी सोने खरेदी खऱ्या अर्थाने ‘सुवर्णसंधी’ असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सोने खरेदीचा हा आनंद लुटता आला नव्हता. बाजारही त्यामुळे ओस पडला होता. यंदा ही सोनेखरेदी उच्चांक गाठेल असा अंदाज होता; परंतु त्याला रशिया-युक्रेन युद्धाचे ग्रहण लागले. या युद्धाच्या पडसादामुळे सोने प्रतितोळा ५५ हजारांपर्यंत गेले होते. आंतरराष्ट्रीय बाजार आणि डॉलरच्या किमतीवर सोन्याचा दर ठरत असतो. जगात अजूनही कोरोनाचे सावट पूर्णपणे दूर सरलेले नाही. चीनमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा ‘लॉकडाऊन’ लावण्यात आले आहे. या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या.
अमेरिकेची बाजारपेठ सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. लोकांना जर या बाजारपेठेतून व्याज मिळाले नाही तर लोक बँकेतील पैसा सोन्यात गुंतवतात. त्यामुळे सोन्यात तेजी येतच राहणार, असा जो अंदाज होता, तो खरा ठरताना दिसला. कोरोनामुळे मुंबईच्या सराफ बाजाराला मोठा फटका बसला होता तोही यावेळी सावरताना दिसतो आहे. झवेरी बाजारात ३५ हजार कारखाने आणि कार्यालये आहेत. ही सगळी सोन्याशी निगडित आहेत. येथील सोने संपूर्ण आशियातील बाजारपेठेत विकले जाते. गेल्या दीड-दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कोणत्याही वस्तूची खरेदी - विक्री झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांच्या हाती थोडा पैसा आहे. ग्राहक हा पैसा सोन्यामध्ये गुंतवू इच्छित आहेत असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. हॉलमार्किंगच्या सोन्याची खरेदी-विक्रीही यंदा मोठ्या प्रमाणावर दिसली. यंदाच्या अक्षय तृतीयेला देशभरात १५ हजार कोटी तर महाराष्ट्रात तीन हजार कोटीपर्यंत सोने बाजारात उलाढाल झाली.
सोने खरेदीसोबतच नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस उत्तम समजला जातो. त्याची अचूक आकडेवारी अद्याप उपलब्ध झाली नसली तरी शेकडो व्यवसायांची सुरुवात झाल्याची नोंद बाजारपेठेने घेतली आहे. ‘अक्षय तृतीया’ हा भारतीयांसाठी श्रद्धेचा सण आहे. या दिवशी केलेल्या गोष्टीचा ‘क्षय’ होत नाही. ती गोष्ट कायमस्वरूपी आपल्याकडे राहते अशी भावना आहे. त्यामुळे सोन्याची या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले ही गोष्ट खरी असली तरी त्याचबरोबर खरेदीही फार मोठ्या प्रमाणात झाली नाही हेही खरे आहे. अर्थात मागणी कमी झाली म्हणून सोन्याचे दर फारसे घसरले नाहीत. तरीही या वाढीव दराचा कोणताही फटका यंदाच्या सोने खरेदीवर दिसला नाही. अनेक पेढ्यांवर सोने खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडाल्याचे चित्र होते. तब्बल दोन वर्षांच्या तणावानंतर हे उत्साहाचे चित्र महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात पाहायला मिळाले. सोन्याच्या चढ्या दरामुळे अनेकांनी जुने सोने मोडून नवे दागिने खरेदी करण्यावरही भर दिला. सोन्याबरोबरच यंदा वाहनखरेदी आणि घरखरेदीचा मुहूर्तही अनेकांनी साधला. इतर अनेक कारणांमुळे घरांच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या आहेत. तरीही बांधकाम व्यावसायिकांनी सवलती जाहीर करून ग्राहकांना खेचण्यात यश मिळविले.
यंदाच्या अक्षय तृतीयेची ही उलाढाल सुखावणारी आहे. बाजाराचा कल यावरून स्पष्ट होतो. भारतीय ग्राहक आता कोरोनाच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरला आहे, हेच दर्शविणारे हे चित्र आहे. युक्रेन युद्धाच्या झळा अद्याप तितक्या तीव्रतेने आपल्याला बसलेल्या नाहीत. मात्र, श्रीलंकेच्या कंगालपणामुळे भारतीय मानसिकता थोडी धास्तावली होती. पेट्रोल-डिझेलचे चढे भाव पाहता पुन्हा महागाईचा उच्चांक गाठणार आणि अर्थव्यवस्था कोसळून पडणार असे भीतीचे चित्र होते; पण अक्षय तृतीयेच्या उलाढालीवरून ही भीती अनाठायी ठरली, असे म्हणायला हरकत नाही. बाजारातील हे वातावरण असेच राहिले तर अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा कालावधी निश्चित कमी होईल, अशी आशा करण्यास हरकत नाही.