अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:44 AM2022-07-08T05:44:27+5:302022-07-08T05:44:53+5:30

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

Editorial on Monsoon climate change affected to farmers | अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी

Next

अलीकडील एक-दोन दशकात मान्सूनच्या पावसाची लय आणि चाल दोन्ही बिघडत असल्याचे दरवर्षी दिसते आहे. भारतात मान्सूनचा पाऊस  हा एकच पावसाळ्याचा ऋतू आहे. तो साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर असतो. मात्र या चार महिन्यातील कोणत्या आठवड्यात किंवा महिन्यात जोरदार पाऊस होईल याचा अंदाज लागत नाही. गतवर्षी जूनमध्ये एकूण पावसाच्या २१ टक्के पाऊस अपेक्षित असताना तो ३५ टक्के पडला. ऑगस्टमध्ये २८ टक्के अपेक्षित असताना केवळ १६ टक्केच पडला. वर्षाअखेरीस सरासरी १०९ टक्के पाऊस पडला. टक्केवारीच्या भाषेत उत्तम  अपेक्षेइतका पाऊस झाला असला तरी तो सलग होत नसल्याने पिकांच्या उगवणीवर  आणि वाढीवर परिणाम करून जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच नगदी पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. यावर्षीची थंडी लवकर संपली आणि मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतात कडक ऊन पडल्याने गव्हाचे उत्पादन एक कोटी टनाने घसरले. हा फटका शेतकऱ्यांना बसला आणि ग्राहकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो आहे. निर्यातीवरही बंधने घालण्याची वेळ आली.  

महाराष्ट्रात होणाऱ्या मान्सूनच्या पावसाचा नकाशा समोर ठेवला तर कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या थोड्या जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. महाराष्ट्राचे पाऊसमानाचे मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे विभाग आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील प्रत्येकी एक-दोन जिल्ह्यांचा अपवाद सोडला  तर पावसाने अजून सरासरी गाठलेली नाही. २० ते ५६ टक्क्यांपर्यंत या जिल्ह्यात पाऊस कमी आहे. विदर्भात यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांत फारच कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली इत्यादि जिल्ह्यांत अपवादवगळता बहुतांश तालुके कोरडे आहेत. हीच अवस्था मराठवाड्यात आहे. पश्चिम विदर्भातसुद्धा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. याचा परिणाम जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी महाराष्ट्रात सरासरी साठ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आणि जुलैमध्ये दांडी मारल्याने दुबार पेरण्यांचे संकट उद्भवले होते. यासाठीच मावळते कृषिमंत्री दादा भुसे पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन करीत खरिपाच्या तयारीचा विभागवार आढावा घेत होते.

जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांना गती आलीच नाही. ज्या भागात पाऊस झाला आहे तेथे सोयाबीन आणि इतर कडधान्यांची पेरणी झाली आहे. जुलैपासून पावसाने जोर धरला असला तरी काही जिल्ह्यात सात दिवस एक मिलीमीटरदेखील पावसाची नोंद झालेली नाही. त्या तुलनेने कोकण किनारपट्टी आणि  सह्याद्री पर्वतरांगांच्या भागात आता पावसाने जोर धरला आहे. धरणांचा सरासरी पाणीसाठा आता वाढू लागला आहे. मुंबईने सरासरी बावीसशे मिलीमीटरपैकी एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद  गाठली आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये महाबळेश्वर, आंबोली, कोयनानगर, भंडारदरा, ताम्हिणी घाट या परिसराने चार-पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी गाठली आहे.  लय आणि चाल बदलणाऱ्या मान्सूनच्या पावसाची धडकीच भरते आहे. याचा सर्वात मोठा फटका २००५  मध्ये मुंबई महानगरीला आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापणाऱ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याला बसला होता. २००६, २०१९ आणि २०२१ या तीन हंगामात पावसाने लय आणि चाल बदलून झोडपून काढले होते.

गतवर्षी मान्सूनच्या परतीच्या पावसाने मराठवाडा अक्षरशः धुवून काढला होता. प्रचंड हानी झाली. वाईटात चांगले घडते म्हणतात तसे मराठवाड्याचा रब्बीचा हंगाम चांगला गेला. उसाचे प्रचंड उत्पादन आले. सलग दोन वर्षे पावसाने उत्तम सरासरी गाठल्याचा तो  परिणाम होता. पण, पीकपद्धतीनुसार होणारे अतिउत्पादन किंवा नापिकी या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांचा तोटा करून जातात. सरकारलादेखील शेतमालाच्या उत्पादनाचा अंदाज येत नाही. आयात-निर्यातीचे वेडेवाकडे निर्णय घेऊन बाजारपेठेत विनाकारण हस्तक्षेप केला जातो, परिणाम शेतमालाचे दर कमी होऊन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. हवामान बदलाने हे सर्व घडते आहे. याबद्दल आता संदिग्धता नाही. आसाम गेले तीन-चार आठवडे महापुरात डुबतो आहे आणि राजस्थान अचानक झालेल्या जोरदार पावसाने सावरतो आहे. याचा अधिक अभ्यास करून मान्सूनची लय आणि चाल ओळखायला हवी.

Web Title: Editorial on Monsoon climate change affected to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.