रक्तरंजित चिनारचा क्षोभ! हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हे तर काश्मिरीयतवर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:37 IST2025-04-24T06:36:21+5:302025-04-24T06:37:01+5:30

श्रीनगरपासून जम्मूपर्यंत स्थानिकांच्या अंत:करणात या नरसंहारामुळे यातनांचा डोह ढवळला गेला आहे. तेथील जनतेने स्वयंस्फूर्तीने बुधवारी दैनंदिन व्यवहार बंद ठेवले, कडकडीत बंद पाळला.

Editorial on Pahalgam Terror AttacK, This attack is not only on tourists but also on Kashmiriyyat | रक्तरंजित चिनारचा क्षोभ! हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हे तर काश्मिरीयतवर आहे

रक्तरंजित चिनारचा क्षोभ! हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हे तर काश्मिरीयतवर आहे

हिरव्या गार चिनार वृक्षांनी वेढलेल्या विस्तीर्ण हिरवळीवर पतीच्या कलेवराजवळ शून्य बनून बसलेली तरुण सहचारिणी. अश्रू गोठलेले. नजरेला आयुष्याच्या घनदाट अंधाराने विळखा घातलेला. मंगळवारी दुपारी बंदुकीच्या गोळ्यांनी पर्यटकांच्या शरीराची चाळण झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथून आलेल्या या छायाचित्राने हृदये गलबलून गेली, कोट्यवधींच्या काळजाचा ठोका चुकला. हे दृश्य पुढची कित्येक वर्षे दीडशे काेटी भारतीयांच्या मन:पटलावर कायम राहील. दहशतवाद्यांनी घडवलेल्या नृशंस नरसंहाराच्या खोलवर जखमेचा तो वेदनादायी व्रण असेल.

ती विमनस्क तरुणी एकटी नाही. देशाच्या पश्चिम, पूर्व, दक्षिण अशा सर्वच भागातून पृथ्वीतलावरील नंदनवनात निसर्गसाैंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब गेलेल्यांपैकी कुणाचा पती, कुणाचा पिता, कुणाचा मुलगा असे कर्ते पुरुष दहशतवाद्यांनी मारले. ‘मिनी स्वीत्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन घाटीत निरपराध, निष्पाप पर्यटकांच्या रक्ताचा सडा पडला. थंड हवेच्या ठिकाणी दुपारची नीरव शांतता किंचाळ्यांनी चिणून गेली. देश हादरला, सुन्न झाला. गृहमंत्री धावून गेले. विदेश दाैरा अर्धवट सोडून पंतप्रधान परतले. या हल्ल्याने प्रत्येकाच्या मनात संतापाचा लाव्हा फुटला आहे. प्रत्येकजण आक्रंदतो आहे. हल्लेखोर देशाला माहिती आहेत. त्यांच्या कृत्यामागे पाकिस्तान आहे, हेदेखील उघड आहे. दहशतवादाची ही कीड एकदाची निपटून काढा, हीच एकमुखी मागणी आहे. असे दिसते की, पर्वतरांगांमधील जंगलाच्या आश्रयाने, पायवाटांनी हे दहशतवादी पर्यटकांपर्यंत पोहोचले. रहदारीचे रस्ते टाळून त्यांनी घोडे-खेचरांवर भ्रमण करणाऱ्या पर्यटकांना लक्ष्य बनवले. जेणेकरून पोलिस किंवा लष्कराची मदत वेळेवर पोहोचू नये.

ज्यांनी आपली रक्तानात्याची, जिवाभावाची माणसे डोळ्यादेखत मारली गेल्याचा भयावह अनुभव घेतला, अशा प्रत्यक्षदर्शींच्या मते, दहशतवाद्यांनी प्रत्येकाला धर्म विचारून टिपून टिपून गोळ्या झाडल्या. हे खरे असले तरी कोणताही धर्म असा रक्तपात, हिंसाचार शिकवत नाही. तेव्हा या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फोर्स’ किंवा ‘टीआरएफ’ नावाच्या कथित अतिरेकी संघटनेच्या चार-सहा माथेफिरूंच्या कृत्यासाठी संपूर्ण काश्मिरी जनतेला दोषी धरले जाऊ नये. सामान्यांना शिक्षा दिली जाऊ नये. कारण, काश्मीर ही गेली किमान ४५ वर्षे अव्याहत भळभळणारी जखम आहे. त्या जखमेने स्थानिकांना दिलेल्या वेदनाही भयंकर आहेत. आताही पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक काश्मिरी स्फुंदत आहे. खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.

श्रीनगरपासून जम्मूपर्यंत स्थानिकांच्या अंत:करणात या नरसंहारामुळे यातनांचा डोह ढवळला गेला आहे. तेथील जनतेने स्वयंस्फूर्तीने बुधवारी दैनंदिन व्यवहार बंद ठेवले, कडकडीत बंद पाळला. तिथला सामान्य माणूस कळवळून सांगतो आहे की, हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हे तर काश्मिरीयतवर आहे. काश्मीरचे निसर्गसाैंदर्य अनुभवण्यासाठी येणारे पर्यटक किंवा अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले करायचे नाहीत, अशी काहीशी अलिखित बंधने तिथल्या जनतेने दहशतवादी संघटनांवर घातली होती. ती पहलगामच्या घटनेने तोडली गेली आहेत. याचा दीर्घकालीन फटका काश्मीरच्या पर्यटनाला बसेल. सर्वसामान्यांची उपासमार होईल. रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा राहणार, हेही नक्की आहे. काश्मीरचे एकूणच अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आणि निसर्ग हा त्या पर्यटनाचा आधार. मंगळवारचा नृशंस नरसंहार लिद्दर नदीच्या निसर्गसंपन्न खोऱ्यात घडला.

कोलाहोई हिमशिखरातून उगम पावणारी, अवघ्या ७३ किलोमीटर लांबीची ही झेलमची उपनदी. नखशिखांत हादरलेल्या स्थानिकांना आता पर्यटन व्यवसाय बंद होण्याच्या चिंतेने ग्रासले आहे. पहलगाम पहाडीत चिनार वृक्षांवरील रक्ताच्या शिंपणाने काश्मीरचे अर्थकारण कोलमडून पडण्याची चिंता मोठी आहे. पोटापाण्याची ही भ्रांत संपवायची असेल तर सरकारने हा भ्याड हल्ला करणारे तसेच त्यांच्या सूत्रधारांना अद्दल घडवायला हवी. ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरशी संबंधित ३७० कलम हटवल्यानंतर, पूर्वीच्या त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर तिथल्या कायदा-सुव्यवस्थेची सगळी सूत्रे केंद्र सरकारच्या हातात आहेत. दहशतवादाविरुद्ध लढाईत जग भारताच्या सोबत आहे. अशावेळी अशा दहशतवादी हल्ल्यांचे धोके आधीच ओळखले गेले पाहिजेत. गुप्तचर संस्थांचे अपयश आता यापुढे देशाला परवडणारे नाही. अशा हल्ल्यांना आता केवळ आवेशपूर्ण घोषणा व भाषणांनी नव्हे तर कृतीने उत्तर द्यायला हवे. तरच जनतेचा सरकारवर आणि देश-विदेशातील पर्यटकांचा काश्मीरवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल.  

Web Title: Editorial on Pahalgam Terror AttacK, This attack is not only on tourists but also on Kashmiriyyat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.