अग्रलेख : जयपूरची ‘कच्छी घोडी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:05 AM2022-09-27T10:05:21+5:302022-09-27T10:06:01+5:30

काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी.

editorial on political crisis congress rajasthan ashok gahlot sachin pilot congress president chief minister | अग्रलेख : जयपूरची ‘कच्छी घोडी’

अग्रलेख : जयपूरची ‘कच्छी घोडी’

googlenewsNext

रणांगणातील मर्दुमकीचे, शौर्याचे प्रतीक मानले जाणारे ‘कच्छी घोडी’ नावाचे एक लोकनृत्य राजस्थानात अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात केवळ पुरुष नर्तक असतात. धोती, कुर्ता, पगडी घातलेल्या पुरुषांची सोंगे नकली घोड्यांवर स्वार असतात आणि बासरी व ढोलकच्या तालावर तलवारी परजत लुटुपुटुची लढाई लढतात. लग्नात वरपक्षाच्या स्वागतासाठी ही सोंगे आणली जातात. काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यानंतरही राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आपणच राहू, असा हट्ट धरलेले अशोक गेहलोत यांच्यासाठी त्यांच्या आमदारांनी रविवारी जे काही केले, ते पाहून या नृत्याची आठवण यावी. त्या नृत्याचा आणि सध्या राजस्थानात होत असलेल्या राजकीय घडामोडींत फरक इतकाच, की गेहलोत समर्थकांनी पक्षाविरुद्धच तलवारी परजल्या आहेत. ही लढाई लुटुपुटुची अजिबात नाही. काँग्रेस पक्ष कधी नव्हे इतका दुबळा झाला असल्याने पक्षशिस्तीला वाकुल्या दाखविण्याची हिंमत आमदारांमध्ये आली आहे. पक्ष बलवान होता तेव्हा ‘विधिमंडळ नेता निवडण्याचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्या’चा एका ओळीचा ठराव घेतला जायचा.

आता त्या परंपरेला तिलांजली देणारे बंड आमदारांनी पुकारले आहे. विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे सामूहिक राजीनामे देऊन आमदार गायब झाले. दिल्लीवरून धावतपळत जयपूरला पोहोचलेले अजय माकन व मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्याचेही सौजन्य त्यांनी दाखविले नाही. काँग्रेससाठी हा खरोखर गंभीर पेच आहे. काल-परवापर्यंत काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद तसेच त्या अनुषंगाने राजस्थानची राजकीय परिस्थिती फारशी गुंतागुंतीची नव्हती. राज्या-राज्यांमधील पक्ष संघटनेने राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्याचे ठराव घेतले असले तरी ते त्यासाठी तयार नाहीत.

वय आणि प्रकृती या कारणांनी सोनिया गांधी यांना अगदी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील अधिक काळ सांभाळणे शक्य नाही. अर्थात, गांधी परिवारातील कुणीही यावेळी अध्यक्षपद स्वीकारणार नाही. अशावेळी आपण किंवा आपला परिवार कोण्याही एका व्यक्तीला समर्थन देणार नाही, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केल्यानंतरही असे दिसत होते, की शशी थरूर किंवा इतरांऐवजी अशोक गेहलोत यांना अध्यक्षपद दिले जाईल. ‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वानुसार राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी नव्या नेत्याची निवड होईल. त्यासाठी प्रियांका व राहुल गांधी यांची  सचिन पायलट यांना पसंती असेल. तथापि, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान गेहलोत व पायलट यांनी राहुल गांधी यांची वेगवेगळी भेट घेतली. तेव्हा, जयपूरच्या सत्तेवरून वादाची चिन्हे दिसू लागली.

गेहलोत यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी पूर्ण वेळ द्यावा, अशी गांधी परिवाराची अपेक्षा आहे. गेहलोत यांना मात्र अध्यक्षपदासोबतच राजस्थानची सत्ता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या स्वत:कडेच ठेवायची आहे. एकतर ‘एक व्यक्ती, एक पद’ सूत्र आपल्याला लागू करू नये आणि लागू झालेच तर नवा मुख्यमंत्री आपल्या मर्जीतला असावा, असा त्यांचा आग्रह आहे आणि त्यासोबत असेही स्पष्ट दिसते की दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी केलेल्या बंडामुळे दुखावलेले अशोक गेहलोत, त्यांचे पाठीराखे आमदार त्यासाठी पायलट यांना माफ करायला अजिबात तयार नाहीत.

पायलट यांच्याकडे बंड यशस्वी करण्याइतके आमदार नाहीत हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. आताही त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या डझनभराच्या पलीकडे नाही. म्हणूनच गेहलोत समर्थकांनी पक्षाला वेठीस धरले आहे; पण त्यातून अशोक गेहलोत यांच्याबद्दल चांगला संदेश गेलेला नाही. पक्षहितापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षा मोठ्या समजणाऱ्या व्यक्तीकडे अध्यक्षपद नको, असा आग्रह सोनिया गांधी यांच्याकडे धरला जात आहे. कमलनाथ व इतर ज्येष्ठ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.

दिल्लीत पक्ष दुबळा असला की राज्यातील नेते वरचढ ठरतात, हा अनुभव पुन्हा येत आहे. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांच्यारूपाने अशीच स्थिती निर्माण झाली, तेव्हा भाजपच्या बलवान राष्ट्रीय नेतृत्वाने ती कशी हाताळली याची आठवण फार जुनी नाही. भाजपइतके काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व मजबूत नाही. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी प्रादेशिक नेत्यांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर जयपूरमधील घटनाक्रम ही गेहलोत यांच्यासाठी हाराकिरी ठरू शकेल. काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांना कदाचित दिले जाणार नाही आणि तसे झाले तर ते पक्षात राहतील का आणि राहिले तरी निष्ठावंत असतील का, ही उत्सुकता देशभर आहे.

Web Title: editorial on political crisis congress rajasthan ashok gahlot sachin pilot congress president chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.