इम्रान खान यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाचा अर्थ काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:48 AM2022-03-22T05:48:30+5:302022-03-22T05:48:54+5:30
पाकिस्तान पुन्हा लष्कराच्या ताब्यात गेल्यास भारताची डोकेदुखी वाढणार, यात शंकाच नाही. सुदैवाने भारतात स्थिर सरकार आहे, त्यामुळे कोणतीही आगळीक पाकिस्तानचे लष्कर करणार नाही
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पाकिस्तान या म्हणीची आपल्याला वारंवार प्रचिती देत असतो; परंतु परवा याच्या नेमके उलट घडले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे भरभरून कौतुक केले. जाहीर प्रचार सभेत त्यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले, हे शेवटी घडले कसे, याची अनेक कारणे आहेत. सध्या इम्रान खान त्यांच्या देशातील राजकीय परिस्थितीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या विरोधात पाकिस्तान संसदेत अविश्वास ठराव दाखल झाला आहे. इम्रान खानच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षातील जवळपास चोवीस खासदारांनी बंडखोरी केली आहे. विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने ते मतदान करण्याची शक्यता आहे. पुढच्याच आठवड्यात अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवाही इम्रान खानच्या विरोधात असल्याचे चित्र आहे.
इम्रान खान पंतप्रधानपदाची खुर्ची वाचविण्यासाठी प्रचंड धडपड करीत आहेत. जन समर्थनासाठी ते जाहीर सभांमधून भूमिका मांडत आहेत. पाकिस्तानचे आर्थिक ताळतंत्र सध्या प्रचंड बिघडले आहे. सगळीकडून त्यांची नाकेबंदी झाली आहे. सगळ्याच अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपली पत त्यांनी कधीचीच गमावली आहे. महागाईने जनता हैराण झाली आहे. पाकिस्तानच्या या स्थितीला इम्रान खान यांचे चुकीचे परराष्ट्र धोरण कारणीभूत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. युक्रेनच्या युद्धात पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूने उभे राहिला असता तर कदाचित त्यांना आर्थिक मदत मिळाली असती आणि महागाईचे, तसेच आलेले दिवाळखोरीचे संकट तूर्त टाळता आले असते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यापूर्वीच्या अफगाणिस्तानच्या युद्धात आपण अमेरिकेला पाठिंबा दिला होता आणि त्यात आपल्या ८० हजार लोकांचे मृत्यू ओढावून घेतले होते, त्याचबरोबर, प्रचंड आर्थिक फटकाही पाकिस्तानला बसला होता, ही चूक पुन्हा करायची नाही, असे इम्रान यांचे म्हणणे आहे. हे सांगताना त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले. अमेरिका जेवढी पाकिस्तानवर दबाव टाकते, तेवढी हिंमत भारताविरुद्ध का दाखवीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारत एकीकडे अमेरिकेसोबत आहे आणि त्याचबरोबर निर्बंध टाकलेल्या रशियाकडून तेलही खरेदी करतो आहे. भारत सरकार त्यांच्या नागरिकांचे हित जपतो आहे. त्यांच्या या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेला माझा सलाम आहे, अशा शब्दांत इम्रान खानने कौतुक केले. इम्रान खानच्या या कौतुकामागचे अर्थही बरेच आहेत. त्यांना एकीकडे विरोधकांच्या आरोपांना उत्तरे द्यायची आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळवायची आहे. त्याचबरोबर, पक्षात उफाळलेल्या बंडाला शमवायचे आहे. गेल्या ७५ वर्षांत पाकिस्तानमध्ये एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. इम्रान खान त्याला अपवाद ठरतील, अशी शक्यता वाटत असतानाच, अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. अफगाणिस्तानच्या परताव्यानंतर अमेरिकेचे संबंध आधीच तणावाचे झाले आहेत. युक्रेन युद्धात पाकिस्तान पाठीशी न राहिल्याने अमेरिका चिडली आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने चीनशी मैत्री घट्ट केली आहे. मात्र, युक्रेन युद्धात चीन रशियाच्या बाजूने असल्याने, पाकिस्तानची कोंडी झाली. त्यामुळे युनोमध्ये पाकिस्तान तटस्थ राहिला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची अशी घुसमट होत असतानाच, देशामध्ये राजकीय अविश्वास प्रस्तावाचे संकट उभे राहिले. या साऱ्या पार्श्वभूमीवर इम्रान खान खुर्ची टिकविण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाकिस्तानातील या सगळ्या घडामोडींचा भारतावर परिणाम होणार, हे निश्चितच. पाकिस्तान पुन्हा लष्कराच्या ताब्यात गेल्यास भारताची डोकेदुखी वाढणार, यात शंकाच नाही. सुदैवाने भारतात स्थिर सरकार आहे, त्यामुळे कोणतीही आगळीक पाकिस्तानचे लष्कर करणार नाही, शिवाय त्यांचेच प्रश्न मोठे आ वासून उभे आहेत. त्यातून हा आपला शेजारी देश कसा मार्ग काढणार, ते येत्या घडामोडींवर ठरेल. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी भारताचे केलेले कौतुक ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे, एवढं मात्र निश्चित. अर्थात शत्रूने केलेले कौतुक मोलाचे असते, हेही तितकेच खरे.