ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 06:04 AM2024-07-06T06:04:35+5:302024-07-06T06:06:19+5:30
स्टार्मर हे ब्रिटनचे ऐंशीवे पंतप्रधान असतील. जगातील या प्राचीन राजेशाहीप्रधान लोकशाहीला, पंतप्रधानपदाला तीनशे वर्षांहून मोठा इतिहास आहे.
भारताचे जावई म्हणून आपल्याला ज्यांचे प्रचंड काैतुक होते, असे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक अखेर वीस महिन्यांनंतर पायउतार झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या हुजूर पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. चाैदा वर्षांनंतर इंग्लंडमध्ये सत्तांतर होत आहे. लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्षाने मोठा विजय मिळविला असून ६५० पैकी दोनच जागांचा निकाल शिल्लक असताना नवे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या नेतृत्वात मजूर पक्षाने तब्बल ४१२ जागा जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्या तब्बल २११ जास्त आहेत. मजूर पक्षाने असे मोठे यश २७ वर्षांपूर्वी, १९९७ साली टोनी ब्लेअरच्या नेतृत्वात मिळविले होते. सत्ता गमावलेल्या हुजूर पक्षाने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या तब्बल अडीचशे जागा गमावल्या असून त्यांच्या संख्याबळात १२१ पर्यंत घसरण झाली आहे.
ब्रिटनचे राजकारण हुजूर व मजूर या दोनच पक्षांभोवती फिरत असले तरी इतरही पक्ष रिंगणात असतात. त्यापैकी लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाने लक्षणीय यश मिळविताना ७१ जागा जिंकल्या आहेत. मावळत्या सभागृहात त्या पक्षाचे केवळ ८ खासदार होते. जगातील सर्वांत जुनी लाेकशाही म्हणून ब्रिटनचे जगात महत्त्व आहेच. त्याशिवाय भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या रूपाने प्रथमच गैरश्वेतवर्णी नेत्यांकडे हुजूर पक्षाचे नेतृत्व असल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. भारताचे तर विशेष लक्ष होते. सुनक कुटुंब मूळचे भारतीय असणे हे त्याचे एक कारण, तर नारायण मूर्ती व सुधा मूर्ती या बहुपरिचित उद्योजक दाम्पत्याची कन्या अक्षता ही ऋषी सुनक यांची पत्नी हे दुसरे कारण. शिवाय ब्रिटिशांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले असल्याने त्या देशाचे पंतप्रधानपद भारतीयांना मिळण्याचे अप्रूप होतेच. त्यामुळे ऑक्टोबर २०२२ मध्ये श्रीमती लिझ ट्रस यांच्या जागी सुनक पंतप्रधान बनले, १० डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहायला गेले तेव्हा भारतीयांची मान अभिमानाने उंचावली गेली.
तथापि, आता स्पष्ट झाले आहे की, इंग्लंडमध्ये स्थिरावलेल्या भारतीयांनीच सुनक यांच्या पक्षाला साथ दिलेली नाही. भारतीय वंशाचे जवळपास १८ लाख मतदार इंग्लंडमध्ये आहेत. त्यापैकी ६५ टक्के मतदार हुजूर पक्षावर नाराज होते. विशेषत: सुनक यांच्या कार्यकाळात वाढलेली महागाई, त्यांनी लावलेले विविध कर, ढासळलेली अर्थव्यवस्था, रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे ब्रिटनवर दुष्परिणाम आणि ‘ब्रेक्झीट’नंतर न झालेला अपेक्षित फायदा अशा मुद्द्यांवर मतदार हुजूर पक्षावर नाराज होता. सुनक यांची व्यक्तिगत तसेच पक्षाची लोकप्रियता जवळपास वीस टक्क्यांनी ढासळली. सुनक यांच्या मंत्रिमंडळातील अकरा मंत्री पराभूत झाले. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचा धक्कादायक पराभव झाला. याउलट युक्रेनच्या बाजूने युद्धखोर रशियाच्या विरोधात उभे राहणे, नाटो संघटनेला सहकार्य आदी मुद्द्यांवर हुजूर पक्षाच्या धोरणांवर पुढे निघालेल्या मजूर पक्षाने नव्या घरांची योजना जाहीर केली. तिला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
स्काॅटलंडमधील ३६ जागा स्काॅटिश नॅशनल पार्टीकडून मजूर पक्षाने हिसकावल्या. ही करामत कीअर स्टार्मर यांच्या नेतृत्वामुळे साधली. ६२ वर्षांचे सर कीअर स्टार्मर नामवंत बॅरिस्टर आहेत. लेफ्टी लाॅयर म्हणून ओळखले जाणारे स्टार्मर यांनी इंग्लंड तसेच बाहेरच्या देशांमध्ये सामाजिक न्यायाचे विविध खटले लढले, जिंकले आहेत. मॅकडोनाल्डविरुद्ध त्यांनी लढलेला व जिंकलेला खटला जगभर गाजला. उत्तर आयर्लंडमधील संघर्ष संपविणाऱ्या १९९८ मधील गुड फ्रायडे करारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘चारसाै पार’ यश मिळविल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान होताना त्यांनी बदलाचा, सामाजिक न्यायाचा निर्धार व्यक्त केला आहे.
स्टार्मर हे ब्रिटनचे ऐंशीवे पंतप्रधान असतील. जगातील या प्राचीन राजेशाहीप्रधान लोकशाहीला, पंतप्रधानपदाला तीनशे वर्षांहून मोठा इतिहास आहे. निवडणुकीत विजयी पक्षाच्या प्रमुखाला इंग्लंडचे राजे किंवा राणी पंतप्रधानपदी नियुक्त करते. आतापर्यंत बारा राजांनी किंवा राणींनी असे पंतप्रधान नियुक्त केले आहेत. राॅबर्ट वाॅलपोल हे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान मानले जातात. पंतप्रधानांच्या सर्वाधिक नियुक्त्या महाराणी व्हिक्टोरिया व महाराणी एलिझाबेथ यांनी केल्या. आता कीअर स्टार्मर यांची नियुक्ती किंग चार्लस् करतील. ऋषी सुनक पायउतार झाले तरी त्यामुळे भारत-इंग्लंड संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही. भारतीयांना नव्या पंतप्रधानांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून कीअर स्टार्मर त्या पूर्ण करतील, अशी आशा आहे.