श्रीमंतांच्या खेळाला सर्वसामान्यांचा खेळ बनवणाऱ्या सानियाला सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:33 AM2022-01-21T05:33:37+5:302022-01-21T05:33:54+5:30

कधीकाळी श्रीमंतांचा खेळ, अशी मान्यता असलेल्या टेनिसला सानियाने स्वकर्तृत्वाने सामान्यांचा खेळ बनविला. आपणही कोर्टवर कर्तबगारी गाजवू शकतो ही भावना तिने मुलींमध्ये रुजविली. सानियाच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे स्वप्न उराशी बाळगून टेनिस कोर्टकडे अनेकांचे पाय वळायला सुरुवात झाली.

editorial on sania mirzas successful tennis career and her achievements | श्रीमंतांच्या खेळाला सर्वसामान्यांचा खेळ बनवणाऱ्या सानियाला सलाम!

श्रीमंतांच्या खेळाला सर्वसामान्यांचा खेळ बनवणाऱ्या सानियाला सलाम!

Next

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा २०२२ नंतर टेनिसची रॅकेट सोडणार आहे. वयाच्या सहाव्या वर्षी वडील इम्रान मिर्झा यांच्या पुढाकाराने कोर्टवर पाय रोवणाऱ्या ३५ वर्षांच्या सानियाने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. जागतिक क्रमवारीत ५० ते ६० या क्रमांकामध्ये स्थान असल्याने यंदा पूर्ण हंगाम खेळण्याबाबत ती आशावादी आहे. इतकी वर्षे तब्बल दोन पिढ्यांना टेनिसचे दर्शन घडविणाऱ्या हैदराबादच्या या मुलीने देशभरात महिला टेनिसला ‘ग्लॅमर’ आणले, शिवाय जगातही डंका वाजविला. टेनिस खेळणे आणि ते देखील स्कर्ट घालून, हे अनेकांना मान्य नसते. यावरून अनेकदा वादही झाले. पायजमा घालून खेळ, अशी समज देत जिवे मारण्याच्या धमक्याही तिला मिळाल्या, तरीही तिचा प्रवास थांबला नाही.



आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करीत प्रवाहाविरुद्ध संघर्ष करीत सानियाने कोर्टवर यश संपादन केले. मधल्या काळात महिला एकेरीतही सानियाने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकापर्यंत मुसंडी मारली होती. परंतु, मनगटाच्या दुखापतीमुळे सानियाने एकेरीऐवजी दुहेरीकडे लक्ष केंद्रित केले आणि तिला अनपेक्षित यश मिळाले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही ती भारताचे प्रतिनिधित्व करते, या मुद्द्यावरून सानियावर अनेकदा टीका करण्यात आली; पण तिने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून ‘पॉवरफुल’ प्रतिमा जपली. तिच्या अशाच ‘पॉवरफुल’ रूपाचे पुन्हा एकदा दर्शन झाले ते म्हणजे तिने एका हातात बाळ आणि दुसऱ्या हातात रॅकेट घेत आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असल्याचा संदेश दिला. मार्च २०१९ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने कोर्टवर पुनरागमन केले.



सानिया मिर्झाला पाठिंबा देणारे आणि तिला विरोध करणारे कमी नाहीत. भारतीय असून पाकिस्तानला पाठिंबा देणारी सानिया असे म्हणत अनेकांनी तिच्या राष्ट्रीयत्वापासून तिच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केली. काहींनी तर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली. तरीही ती डगमगली नाही. ‘ज्यावेळी पती मैदानात चांगली कामगिरी करतो, त्यावेळी ते यश त्याच्या स्वतःच्या कौशल्याचे असते आणि ज्यावेळी कामगिरी खराब होते त्याचा दोष पत्नीवर येतो... लोक असा विचार कसा करू शकतात,’ अशा संयमी उत्तराने तो मुद्दादेखील सानियाने कौशल्याने हाताळला होता. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असेल तर आपले चाहते सानियावरून आमने-सामने येतात. ट्विटरवॉर सुरू होते. सानिया मात्र मिम्सवरून चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते.



एकदा पती शोएबने विचारले होते, ‘भारत-पाक सामना असेल तर तुझा पाठिंबा कोणाला?’ यावर सानियाने प्रतिप्रश्न केला, ‘मी पाकिस्तानच्या टेनिसपटूविरुद्ध खेळत असेल तर तुझा पाठिंबा कोणाला?’ तुझे जे उत्तर असेल तेच माझेही समज! या हजरजबाबीपणामुळे एका मुरब्बी आणि शांतताप्रिय खेळाडूच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व गुण सानियात दिसतात. अमेरिकन ओपन २०१५, विम्बल्डन ओपन २०१५, ऑस्ट्रेलियन ओपन २०१६, अशी दुहेरीतील तसेच ऑस्ट्रेलियन ओपन २००९, फ्रेंच ओपन २०१२, अमेरिकन ओपन २०१४ अशी मिश्र दुहेरीतील एकूण सहा ग्रॅन्डस्लॅमचे यश स्वत:च्या शिरपेचात रोवणारी सानिया भारतीय टेनिसची खऱ्या अर्थाने ‘ग्लॅमर डॉल’ आहे.

कधीकाळी श्रीमंतांचा खेळ, अशी मान्यता असलेल्या टेनिसला सानियाने स्वकर्तृत्वाने सामान्यांचा खेळ बनविला. आपणही कोर्टवर कर्तबगारी गाजवू शकतो ही भावना तिने मुलींमध्ये रुजविली. सानियाच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे स्वप्न उराशी बाळगून टेनिस कोर्टकडे अनेकांचे पाय वळायला सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांत सानियाने कोर्टवर केलेल्या कामगिरीचे फळ तिला मिळाले. अर्जुन, पद्मश्री, खेलरत्न अशा पुरस्कारांनी ती सन्मानित झाली, तरी तिचे पाय मात्र जमिनीवर आहेत. सानियाच्या आणखी एका कर्तृत्वाची दखल घ्यावी लागेल. प्रसंग होता, प्रतिष्ठेचा फेडरेशन पुरस्कार जाहीर होण्याचा. हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. पुरस्कारासाठी झालेल्या जगातील एकूण मतदानापैकी ६० टक्के मते सानियाला पडली होती. दोन हजार अमेरिकन डॉलरचा हा रोख पुरस्कार सानियाने मुख्यमंत्री निधीला दान दिला. मी हा पुरस्कार माझ्या देशवासीयांना समर्पित करते, अशी कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय टेनिसविश्वाला भुरळ पाडणारी सानिया वादाला मूठमाती देते. स्वत:चे आयुष्य दिलखुलास जगते, शिवाय देशाची पताकाही उंचावते, यातच तिच्या ग्लॅमरस यशाचे रहस्य सामावलेले आहे.

Web Title: editorial on sania mirzas successful tennis career and her achievements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.