गोगलगाय, पोटावर पाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:36 AM2022-07-16T07:36:04+5:302022-07-16T07:36:27+5:30

दरवर्षी पावसाळ्यात उगवणारी इवलीशी गोगलगाय यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. 

editorial on Snail eating destroying farmers farm crops maharashtra | गोगलगाय, पोटावर पाय !

गोगलगाय, पोटावर पाय !

googlenewsNext

शेतीवरील संकटांच्या मालिकेला अंत नाही. दरवर्षी नवनवीन विघ्ने येतच असतात. कधी अवर्षण, अतिवृष्टी, तर कधी अवकाळी. अशा अस्मानी संकटांची तर शेतकऱ्यांना आता सवयच झाली आहे. यंदा पावसाने महिनाभर ताण दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या. जून महिनाअखेर ज्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांवर नवेच संकट ओढवले आहे. या संकटावर कशी मात करायची याचा पूर्वानुभव नसल्याने शेतकरी पुरते गांगरून गेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उगवणारी इवलीशी गोगलगाय यंदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. 

गोगलगाय आणि पोटावर पाय, असे म्हणावे असले हे संकट!  चोरपावलाने आलेल्या शंखी गोगलगाई शेकडो एकरावरील कोवळी पिके फस्त करीत आहेत. गतवर्षी गोगलगायींनी विदर्भातील संत्र्यांचा फडशा पाडला. यावर्षी त्यांनी मराठवाड्याकडे मोर्चा वळविला आहे. सोयाबीन हे त्यांचे प्रमुख भक्ष्य आहे. नुकतेच उगवलेले सोयाबीनचे पीक रात्रीतून भुईसपाट होत आहे. आजवर हरिण, रानससे, मोर आणि रानडुक्कर अशा वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांना पळताभुई थोडी केली होती. आता गोगलगायींनी शेतकऱ्यांची झोपमोड केली आहे. वन्यप्राण्यांना बांधाबाहेर हलकण्यासाठी नाना उपाय योजता येतात; परंतु या गोगलगायीचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण हा कीटकवर्गीय जीव इतका चिवट, सर्व प्रकारच्या उपचारांना पुरून उरला आहे! 

कृषीतज्ज्ञ जे उपचार सांगतात, ते एक तर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत आणि दुसरे म्हणजे, गोगलगायींचा नेमका बंदोबस्त कसा करावा, यावर शास्त्रज्ञांमध्येच एकवाक्यता दिसून येत नाही. मुळात गोगलगायीसारखा कीटक असो की अन्य वन्यप्राणी; शेतकऱ्यांच्या मुळावर का उठले? मानवी भूक हे त्याचे प्रमुख कारण सांगता येईल. वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्याकरिता आपण अधिक उत्पादनाचा हव्यास धरला. त्यातून संकरित बियाणे, खते, कीटकनाशके तयार केली. अशा प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोगांनी पिकांची उत्पादन क्षमता वाढली खरी; परंतु त्यातून जमिनीची प्रत खालावली, अन्नधान्यातील पोषक घटकांचा ऱ्हास झाला. रासायनिक औषधांच्या माऱ्याने कृषी पंढरीतील जैवविविधताच संपुष्टात आली. कृमी कीटकांचा नाश झाल्याने त्यावर अवलंबून असलेले कीटकवर्गीय जीवजंतू नष्ट झाले. 

ज्ञात-अज्ञात अशा लक्षावधी जिवांची वंशावळ नष्ट करून आपण आपली भूक भागविली. मात्र, जीवसृष्टीचा हाच विनाश आज आपल्या अंगाशी आला आहे. गोगलगायीचेच उदाहरण घेऊ. मुख्यत: तृणवर्णीय वनस्पतींवर जगणारा हा इवलासा जीव आजवर शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जात होता. मात्र, शेतातील गवत कमी करण्यासाठी तृणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला. परिणामी, गवत नष्ट झाले; पण त्यातून गोगलगायींची उपासमार सुरू झाली. कोणत्याही जिवाची अन्नसाखळी तुटली की तो जीव अन्य प्रकारच्या अन्नाचा शोध घेणारच. गोगलगायी पिकांवर तुटून पडण्यामागे हेच कारण आहे. या कीटकाचा समूळ नाश करण्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आता नानाविध उपाय सुचवीत आहेत. अशा उपाययोजनांसाठी सरकारनेही अनुदान जाहीर केले आहे.  गोगलगायींचा समूळ वंश नष्ट करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.  या लढाईत गोगलगायींची हार होणार, हे नक्की; पण गोगलगायी नष्ट केल्याने पुन्हा नवे संकट उद्भवणारच नाही, याची खात्री कोण देणार? शिवाय, आपण दरवर्षी असा जीवसंहार करणार असू तर एक ना एक दिवस पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे हे सांगण्यासाठी भविष्यवेत्याची गरज नाही. 

मानवी भुकेसाठी पिकांचे रक्षण करणे जितके गरजेचे तितकेच मानवाच्या अस्तित्वासाठी जैविक पर्यावरणाचे रक्षण करणेदेखील अनिवार्य आहे. गोगलगायीसारख्या जैविक संकटावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी तात्पुरते उपाय योजण्याऐवजी यावर अक्षय इलाज शोधला पाहिजे. शाश्वत शेतीसाठी याची नितांत गरज आहे. करपा, बोंडअळी, कपाशीवरील लाल्या, तुरीवरील मर अशा प्रकारची शेतीवर येणारी विघ्ने ही नैसर्गिक आपत्ती नसून संकरित वाणांमुळे ओढवून घेतलेले हे संकट आहे. 

Web Title: editorial on Snail eating destroying farmers farm crops maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.