देशोदेशी मातीच्याच चुली! शिवसेनेसारखी पुनरावृत्ती, जॉन्सन यांची खुर्ची धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:03 AM2022-07-07T07:03:04+5:302022-07-07T07:04:25+5:30
जॉन्सन यांनी अलीकडेच अनेक तक्रारी असलेल्या ख्रिस पिंचर या खासदाराची एका सरकारी पदावर नियुक्ती केली. त्यासाठी जॉन्सन यांना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील लोकांच्याही रोषास बळी पडावे लागले
महाराष्ट्रात शिवसेनेत उफाळलेल्या बंडाळीची लागण सातासमुद्रापलीकडील ब्रिटनमध्येही झाली की काय, अशी गमतीशीर शंका येण्यासारखी परिस्थिती त्या देशात निर्माण झाली आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना मंगळवारी ब्रिटनचे परराष्ट मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी राजीनामे दिले. त्यामुळे घमासान माजले असतानाच, बुधवारी बाल व कुटुंब मंत्री विल क्वीन्स यांच्याही राजीनाम्याची बातमी येऊन थडकली. महाराष्ट्रातही असेच घडले होते. आधी काही मोजकेच आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरतला गेले होते, मात्र हळूहळू त्यांचा आकडा वाढत गेला आणि शेवटी तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेचे फारच थोडे मंत्री व आमदार शिल्लक राहिले. ब्रिटनमध्येही त्याची पुनरावृत्ती होऊन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची खुर्ची धोक्यात येते की काय, अशी भीती आता व्यक्त केली जाऊ लागली आहे. सुनक आणि जाविद यांनी राजीनामे देताना थेट जॉन्सन यांचे नेतृत्व आणि काम करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जॉन्सन यांनी अलीकडेच अनेक तक्रारी असलेल्या ख्रिस पिंचर या खासदाराची एका सरकारी पदावर नियुक्ती केली. त्यासाठी जॉन्सन यांना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील लोकांच्याही रोषास बळी पडावे लागले. त्या नियुक्तीसंदर्भात आपल्याला चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करीत, क्वीन्स यांनी राजीनामा दिला आहे. वस्तुतः जॉन्सन यांनी पिंचर यांच्या नियुक्तीसंदर्भात यापूर्वीच माफीही मागितली आहे. सुनक, जाविद किंवा क्वीन्स यांनी राजीनामे देताना जी कारणे पुढे केली आहेत, त्यामध्ये एकच सूत्र दृष्टीस पडते आणि ते म्हणजे जॉन्सन यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे! लोकशाहीत सरकारचे नेतृत्व करीत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात उठाव होतो, तेव्हा सर्वसाधारणत: अशीच कारणे पुढे केली जातात; मग ते मध्य प्रदेश वा महाराष्ट्रासारखे भारतातील राज्य असो अथवा ब्रिटन! त्यामुळे जॉन्सन यांचे पंतप्रधानपदावरील दिवस आता भरत आले की काय, अशी शंका कुणाच्या मनात निर्माण झाल्यास ती चुकीची म्हणता येणार नाही. मंगळवारी ज्यांनी राजीनामे देऊन राजकीय पेचप्रसंगाची सुरुवात केली, त्यापैकी सुनक यांचे मूळ भारतात आहे, तर वाजिद यांचे पाकिस्तानात! उद्या जॉन्सन यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागलेच, तर ज्या भारत व पाकिस्तानला ब्रिटनने तब्बल दीडशे वर्षे गुलामीत ठेवले, त्या देशांत मूळ असलेल्या दोघांनी ब्रिटनच्या पंतप्रधानाला सत्तेतून बेदखल केल्याची नोंद इतिहासाला नक्कीच घ्यावी लागेल!
जॉन्सन यांच्या राजकीय अंताची ही सुरुवात ठरते की काय, अशी चर्चा ब्रिटनमध्ये सुरू झाली आहे. सत्ताधारी हुजूर (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्षातीलच काही खासदारांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी गत काही दिवसांपासून लावून धरली आहे. अर्थात काही वरिष्ठ मंत्री अजूनही जॉन्सन यांच्या पाठीशी उभे आहेत; पण सुनक, वाजिद आणि क्वीन्स यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी काही कनिष्ठ मंत्री राजीनाम्यांचे अस्त्र उपसू शकतात, अशीही चर्चा जोर धरत आहे. जॉन्सन यांच्या विरोधातील असंतोष कालपरवा उफाळलेला नाही. कोविड टाळेबंदी जारी असताना, पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी झालेली मेजवानी, जॉन्सन यांनी बरेचदा कोविडसंदर्भातील नियम पायदळी तुडविल्याचे आरोप, तसेच ताज्या करवाढीमुळे जॉन्सनविरोधातील क्षोभात भर पडली होती. त्यातच गत महिन्यात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभव बघावा लागल्याने, जॉन्सन यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना अधिकच चेव चढला. `संडे टाइम्स’ या वर्तमानपत्राने एप्रिलमध्येच ऋषी सुनक राजीनाम्याच्या विचारात असल्याची बातमी देऊन खळबळ उडवून दिली होती.
सुनक यांच्या अर्धांगिनी अक्षता मूर्ती ब्रिटनच्या कायमस्वरूपी निवासी नाहीत आणि स्वत: सुनक यांनी मंत्री झाल्यानंतरही अमेरिकेचे `ग्रीन कार्ड’ कायम ठेवले, या दोन रहस्योद्घाटनांनंतर सुनक आणि जॉन्सन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. त्यातच सुनक यांच्याकडे हुजूर पक्षाचे भविष्यातील नेते म्हणून बघितले जाते. त्यामुळे जॉन्सन यांना असुरक्षित वाटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील सत्ताधारी पक्षातील हा संघर्ष कोणते वळण घेतो, हे बघणे चित्तवेधक ठरणार आहे. एकंदरीत, देशोदेशी मातीच्याच चुली, हे या संघर्षाच्या निमित्ताने अधोरेखित झाले आहे!