अग्रलेख : आयसी म्हणते, रात्र वैऱ्याची!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:49 AM2023-03-11T11:49:18+5:302023-03-11T11:50:12+5:30

पाकिस्तान व चीन या दोन शेजारी देशांसोबतचे भारताचे संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होण्याची आणि त्यातून लष्करी संघर्ष उफाळण्याची आशंका अमेरिकेला वाटत आहे.

editorial on united states intelligence community report on india pakistan military action china | अग्रलेख : आयसी म्हणते, रात्र वैऱ्याची!

अग्रलेख : आयसी म्हणते, रात्र वैऱ्याची!

googlenewsNext

पाकिस्तानचीन या दोन शेजारी देशांसोबतचे भारताचे संबंध अधिकाधिक तणावपूर्ण होण्याची आणि त्यातून लष्करी संघर्ष उफाळण्याची आशंका अमेरिकेला वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताकडून, पाकिस्तानद्वारा काढल्या गेलेल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष खोडीचे उत्तर, लष्करी कारवाईद्वारा दिले जाण्याची शक्यता, पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त असल्याची भीती अमेरिकेला भेडसावत आहे. युनायटेड स्टेट्स इंटेलिजन्स कम्युनिटी (आयसी) या गटाने तसा अहवालच अमेरिकन काँग्रेसला सादर केला आहे. अमेरिकेतील सर्व सरकारी गुप्तचर संस्था आणि त्यांच्या अधिनस्थ सर्व संस्थांचा गट म्हणजे आयसी! परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन क्षेत्रांतील आयसी हे खूप मोठे प्रस्थ आहे.

डायरेक्टर ऑफ नॅशनल  इंटेलिजन्स हे आयसीचे नेतृत्व करतात आणि थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ‘रिपोर्टिंग’ करतात! आयसीचे महत्त्व त्यावरून लक्षात येईल. अशा संस्थेने जर पाकिस्तान व चीनसोबत भारताचा लष्करी संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तविली असेल, तर ती नक्कीच गांभीर्याने घ्यावी लागेल. विशेषतः पाकिस्तानातील सध्याची स्थिती व पूर्वेतिहास लक्षात घेता त्या देशाकडून भारतासोबत कुरापत काढली जाण्याची शक्यता फेटाळता येत नाही. भारताची खोडी काढण्याचे काम पाकिस्तान १९४७ पासून सातत्याने करत आला आहे. पूर्वी भारताकडून अगदीच डोक्यावरून पाणी जाईपर्यंत संयम राखला जात असे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मात्र अरेला कारे म्हणण्याचे धोरण स्वीकारले आहे. पाकव्याप्त काश्मिरातील सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईकच्या निमित्ताने दोनदा त्याचे प्रत्यंतर आले आहे. बालाकोटच्या वेळी तर कोणत्याहीक्षणी युद्ध पेटेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आयसीच्या अहवालात निश्चितपणे तथ्य आहे.

अर्थात भारताकडून संघर्ष कधीच सुरू होणार नाही; परंतु पाकिस्तानातील आर्थिक आणीबाणी, तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी इत्यादी फुटीर संघटनांनी पाकिस्तानी सरकार व सैन्याच्या नाकात आणलेला दम, पाकव्याप्त काश्मीर व गिलगिट बाल्टीस्तानमध्ये वाढत असलेला असंतोष, जम्मू-काश्मीरमध्ये प्रस्थापित झालेली शांतता, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने सरकारविरुद्ध छेडलेले आंदोलन, या पार्श्वभूमीवर जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, पाकिस्तान सरकारकडून अथवा सरकारला अंधारात ठेवून लष्कराकडून भारताची कुरापत काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंजाब शांत झाला की जम्मू-काश्मिरात दहशतवादास चालना द्यायची आणि जम्मू-काश्मीर शांत होऊ लागले, की पंजाबात खलिस्तानवाद्यांना फूस लावायची, असे पाकिस्तानचे पूर्वापार धोरण राहिले आहे. आताही जम्मू-काश्मिरात शांतता नांदू लागली असताना, पंजाबात पुन्हा खलिस्तानवादी डोके वर काढू लागले आहेत, हा योगायोग खचितच नाही! पाकिस्तानची आर्थिक अराजकाकडे सुरू असलेली वाटचालही चिंताजनक आहे.

एकाच वेळी स्वतंत्र झालेल्या भारत व पाकिस्तानातील परिस्थितीची तुलना करीत, भारतातून फुटून निघणे ही मोठी चूक होती, असा सूर पाकिस्तानी जनतेतून उमटू लागला आहे. भारताला लागून असलेल्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तर त्याची तीव्रता जरा जास्तच आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाल्यास, उद्या त्या प्रांतातून भारताकडे निर्वासितांची घुसखोरी सुरू होण्याची शक्यता मोडीत काढता येणार नाही. बांगलादेश युद्धाचा प्रारंभ अशाच परिस्थितीतून झाला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आर्थिक महासत्ता म्हणून होत असलेला भारताचा उदय लक्षात घेता, भारताला युद्ध परवडण्यासारखे नाही. युद्ध जिंकले तरी त्यामुळे भारताची सर्वच क्षेत्रात पीछेहाट होईल आणि पाकिस्तानला तेच हवे असते.

स्वत:ला कोणत्याच क्षेत्रात दिवे लावता येत नसल्याने त्यांनी नेहमी भारताच्या पीछेहाटीतच विकृत आनंद मानला आहे. आयसीच्या अहवालानुसार पाकिस्तानद्वारा भारताची खोडी काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयसीने चीनसोबतही संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तविली असली तरी सध्याच्या घडीला भारताप्रमाणेच चीनची प्राथमिकताही आर्थिक विकास हीच असल्याने, पाकिस्तानच्या तुलनेत चीनसोबत संघर्ष उफाळण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील रात्र वैऱ्याची असल्याचे लक्षात घेऊन भारतीय नेतृत्वाने दोन्ही आघाड्यांवर डोळ्यात तेल घालून सजग राहण्याची गरज आहे.

Web Title: editorial on united states intelligence community report on india pakistan military action china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.