एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:56 IST2025-04-23T06:56:05+5:302025-04-23T06:56:36+5:30

'एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी ही काळाची गरज आहे आणि तोच आजचा आदर्श आहे' असे सांगताना भागवतांनी जातीभेद गाडून टाकण्याचे आवाहन केले

Editorial - One well, one temple, one crematorium. Article on Dr. Mohan Bhagwat's call to forget caste and come together | एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ।
आईका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा।

या तुकारामांच्या भाषेने आजवर अनेकांना आकाशाएवढे व्यापक केले आहे. पण, चक्क डॉ. मोहन भागवत आता त्या भाषेत बोलू लागले आहेत. महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांची ही भेदाभेदमुक्त भाषा आश्वासक आहे! आपण समरसतेचा पुरस्कार करतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच सांगत असतो. मात्र, समतेपासून ही समरसता दूर तर नाही ना, अशी शंका त्याचवेळी उपस्थित होत असते. यावेळी सरसंघचालकांनी थेटपणे एकतेची आणि सलोख्याची भाषा केली आहे. 'जातपात विसरा आणि एकत्र या' असे सरसंघचालक म्हणाले आहेत. भागवत हे म्हणाले अलीगढमध्ये.

'एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी ही काळाची गरज आहे आणि तोच आजचा आदर्श आहे' असे सांगताना भागवतांनी जातीभेद गाडून टाकण्याचे आवाहन केले. संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी 'समरसते'चा जोरदार पुरस्कार केला. भागवत हे ज्या उत्तर प्रदेशात बोलले, तिथे तर याची गरज आहेच. मात्र, संघाचे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्राला आज याची सर्वाधिक आवश्यकता आहे. 'आपल्या' दुकानदारांची यादी सध्या काही ठिकाणी व्हॉट्सअॅपवरून फिरत आहे. म्हणजे, आपल्याच जातीच्या दुकानदारांकडून खरेदी करा, असे सांगितले जात आहे. जाती-जातींमध्ये भयंकर तेढ तयार केली जात आहे. अशावेळी डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल! सध्या महाराष्ट्रात सर्वदूर महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून सुरू होणारे हे उत्सवी कार्यक्रम मेपर्यंत सुरू असतात. या महापुरुषांनाही आपापल्या जातीत बसवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. प्रत्यक्षात महात्मा फुलेंना गुरू मानले ते बाबासाहेबांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला तो महात्मा फुलेंनी. मात्र शिवबा-जोतिबा- बाबा यांच्यामधील हे जैव नाते विसरून त्यांना जातींमध्ये कैद करण्याचा प्रयत्न होतो. महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना मुलींची शाळा सुरू करण्यासाठी जागा दिली ती भिडे आणि चिपळूणकरांनी. बाबासाहेबांना सत्याग्रहात सोबत केली सहस्रबुद्धे-चित्रे यांनी, एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे यांनी. असा सारा महाराष्ट्राचा इतिहास असताना, इथे काय सुरू आहे? जातीय विखार भयंकर वाढत चालला आहे. जातीय ताण वाढला की तोडगा धर्मावर निघतो. मग धार्मिक ध्रुवीकरण होते.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या देशात 'हिंदू विरुद्ध मुस्लीम' असा संघर्ष पेटवून कबर चर्चेत येते. मग खरी 'खबर' मागच्या बाकांवर जाऊन बसते. महागाईने कंबर मोडले आहे. शेतकरी टाचा घासून मरतो आहे. पैसे भरले नाहीत म्हणून गर्भवती रुग्णालयाच्या पायरीवर अखेरचा श्वास घेते आहे. असे कैक प्रश्न असताना आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असताना महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? अशावेळी डॉ. मोहन भागवतांनी हे सांगणे खरोखरच आवश्यक होते. आजही अनेक गावांत दोन वा अधिक स्मशानभूमी आहेत. प्रत्येक जातीची स्मशानभूमी वेगळी. डॉ. बाबा आढावांनी 'एक गाव, एक पाणवठा' आंदोलन सुरू केले ते सत्तरच्या दशकात. मात्र, आजही अनेक गावांमध्ये वेगवेगळे पाणवठे आहेत. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे, यासाठी उपोषण केले ते १९४७ मध्ये, पण आजही काही गावांमधील मंदिरात भेदाभेद आहेच. काळ पुढे जाईल तसा जातीअंत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडताना दिसत नाही.

किंबहुना जात अधिकच घट्ट होऊन जातींमधील तेढ वाढू लागली आहे. म्हणूनच डॉ. भागवतांच्या आवाहनाचे स्वागत करायला हवे. समरसतेची भाषा करतानाच, संविधानातील समतेच्या दिशेनेही आता जावे लागेल. जातीभेद संपले पाहिजेत, असे भागवत म्हणाले. त्याचे स्वागतच. मात्र, ज्या विषमतावादी जातपितृसत्ताक व्यवस्थेने हा भेदाभेद निर्माण केला, सर्व जातींमधील स्त्रियांचे शोषण केले, अस्पृश्यतेसारखी अमानुषता दाखवली; ती व्यवस्थाच नाकारावी लागेल. तरच, 'हे विश्वचि माझे घर' असा भाव असलेले विश्वात्मक पसायदान आपल्याला उद्याच्या पिढ्यांसाठी मागता येईल!

Web Title: Editorial - One well, one temple, one crematorium. Article on Dr. Mohan Bhagwat's call to forget caste and come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.