आजचा अग्रलेख : काशीचा कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 08:04 AM2021-12-15T08:04:07+5:302021-12-15T08:04:07+5:30

पंतप्रधानांनी आपल्या मतदारसंघातील सुधारणा, विकास, प्रगती याची इतक्या बारकाईने पाहणी करणे  कौतुकास्पद म्हणायला हवे.

editorial on pm narendra modi how he changing varanasi in last six seven years | आजचा अग्रलेख : काशीचा कायापालट

आजचा अग्रलेख : काशीचा कायापालट

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा-सात वर्षांत आपला मतदारसंघ म्हणजेच वाराणसीचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. वाराणसीपेक्षा काशी नावानेच हा जिल्हा व शहर ओळखले जाते. काशी विश्वनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगामध्ये एक असले तरी देशात त्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे. काशी म्हणजे बाबा विश्वनाथ. काशी म्हणजे गंगा, काशी म्हणजे साधू-संन्याशांचे आश्रम. आयुष्यात एकदा काशीची यात्रा करायलाच हवी, असे म्हटले जाते. थोडक्यात, ख्रिश्चनांचे जसे व्हॅटिकन, मुस्लिमांचे जसे मक्का-मदिना तसेच हिंदूंचे काशी हे प्रमुख धार्मिक स्थान आहे. तेथून निवडून येणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी कमी काळात या शहराचे रूपडे बदलले आहे. 

काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन त्यांनी साेमवारी केले. त्याआधी गंगास्नान, मंदिरात पूजाअर्चा हेही केले. मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह शहरात फेरफटका मारला. रेल्वे स्थानकाचीही पाहणी केली. एखाद्या पंतप्रधानाने काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन करणे स्वाभाविकच आहे, पण आपल्या मतदारसंघातील सुधारणा, विकास, प्रगती याची इतक्या बारकाईने पाहणी करणे  कौतुकास्पद म्हणायला हवे. हल्ली नगरसेवक, आमदार व खासदार आपल्या भागात फिरकतही नाहीत, अशा तक्रारी ऐकू येत असताना देशाच्या पंतप्रधानाने आपल्या मतदारसंघाच्या विकास, प्रगतीसाठी लक्ष घालणे, याला खूपच महत्त्व आहे. 

ज्या शहरात सर्वत्र बकाली दिसायची, मंदिरांच्या परिसरात भिकाऱ्यांची गर्दी असायची, स्वच्छता नावालाही नसायची, सायकल रिक्षांच्या गदारोळात चालणे अशक्य व्हायचे, पानाच्या पिचकाऱ्यांनी परिसर रंगलेला असायचा, बाहेरच्या टपऱ्यांवर खायची हिंमत व्हायची नाही, गंगेत स्नान करायची हिंमत व्हायची नाही, ती काशीनगरी आता पूर्णपणे बदलली आहे. तिने नवे, चांगले स्वरूप धारण केले आहे. मोठ्या रस्त्यांवर स्वच्छता दिसू लागली आहे. चालणे सुसह्य झाले आहे. अनेक मंदिरांचा परिसर चकचकीत दिसू लागला आहे. धार्मिक पर्यटनासाठी जे काही आवश्यक असते, ते सारे काशीनगरीत झाल्याचे तिथे जाताच जाणवते. सगळे प्रश्न सुटलेले नसले, तरी काशीनगरी आता धार्मिक पर्यटकांना अधिक वेगाने खुणावू लागेल, हे निश्चित. त्याचे सारे श्रेय  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांनी तेथील प्रत्येक विकासकामात स्वत: लक्ष घातले, ती कामे वेळेत होत आहेत का, हे जातीने पाहिले. त्यासाठी ते तिथे नियमितपणे जात राहिले. 

पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्याने  प्रशासन अधिक काळजीपूर्वक आणि जरा वेगानेच कामाला लागते, हे खरे. पण त्यांच्यावर अवलंबून न राहता मोदी कामांचा वेळाेवेळी आढावा घेत राहिले. मोदी यांच्या कामाचा झपाटा आता सर्वांनाच माहीत झाला आहे. जे करायचे, ते भव्य असायला हवे, लोकांना ते आवडायला हवे, यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे एके काळी तीन हजार चौरस मीटरचा असलेला काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर आता पाच लाख  चौरस मीटरचा असेल. त्यासाठी आसपासची अनेक घरे, इमारती, दुकाने आस्थापने ताब्यात घेऊन लोकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले.  दुसऱ्या बाजूला गंगा नदी स्वच्छ व सुंदर करण्याची योजनाही काशीनगरीमध्ये वेगाने राबवली गेली. पंतप्रधानांनी गंगेत स्नान केले, तेव्हा हा बदल प्रकर्षाने जाणवला. तिथे क्रूझ सेवाही सुरू होत आहे. 

पंतप्रधान मोदी यांनीही या क्रूझमधून फेरफटका मारला. वाराणसी रेल्वे स्थानकही पूर्वी अस्वच्छ होते. आता ते एखाद्या मोठ्या विमानतळासारखे भासू लागले आहे. या दोन दिवसांच्या काशी दौऱ्यात मोदी यांनी भाजपच्या १२ मुख्यमंत्र्यांची बैठकही घेतली. गुड गव्हर्नन्स हा विषय होता. आपण केलेल्या कामांचा प्रचार व प्रसार धडाक्याने करा, सरकार व पक्ष संघटना यांच्यात समन्वय ठेवा, असा संदेेश त्यांनी दिला. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका असल्याने त्यांनी हे केले, हे खरेच. पण केलेल्या कामांचे श्रेय कोण घेत नाही? धर्मस्थळाचा विकास करत असतानाच सरकारला देशाच्या आर्थिक आणि तंत्र -वैज्ञानिक प्रगतीचेही भान आहे याचे प्रत्यंतर देत मोदीनी समुद्राखाली टाकल्या जाणाऱ्या ऑप्टिकल केबलचा उल्लेख केला! 

भाजपचे हे ‘मॉडेल’ सामान्य जणांना भावते त्यामागे हेच सूत्र आहे! उत्तर प्रदेशात याच पद्धतीने वेगाने विकास झाला, सुधारणा झाल्या, तर ते राज्य मागास राहणार नाही आणि तेथील लोकांना रोजगारासाठी देशभर भटकावे लागणार नाही. त्याकडे प्रामुख्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घालायला हवे. पंतप्रधान मोदी यांची त्यांना पूर्ण साथ असल्याचे काल आणि याआधी अनेकदा दिसले आहेच. 

Web Title: editorial on pm narendra modi how he changing varanasi in last six seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.