आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 08:08 AM2021-12-13T08:08:04+5:302021-12-13T08:08:35+5:30

क्रिप्टोकरन्सी व सोशल मीडियावर नियंत्रणासाठी जगभरातल्या देशांनी एकत्र यायला हवं या पंतप्रधानांच्या आवाहनाला ४८ तास उलटण्याच्या आत त्यांचेच ट्विटर अकाउंट काही क्षणांसाठी हॅक झाले.

editorial on pm narendra modi twitter account hacking cryptocurrency bitcoin tweet | आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा

आजचा अग्रलेख : हॅकिंगचा इशारा

Next

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जागतिक परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करताना क्रिप्टोकरन्सी व सोशल मीडियावर नियंत्रणासाठी जगभरातल्या सगळ्या देशांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन केले. या आवाहनाला ४८ तास उलटण्याच्या आत त्यांचेच ट्विटर अकाउंट काही क्षणांसाठी हॅक झाले. रविवारी मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी मोदींच्या ट्विटर खात्यावरून बिटकॉइन या आभासी चलनाला सरकारने अधिकृत मान्यता दिल्याचे आणि असे पाचशे बिटकॉइन सरकारने खरेदी केले असून ते लोकांना वाटले जाणार असल्याचे एक फसवे ट्वीट केले गेले. साहजिकच गोंधळ उडाला. तासाभरानंतर हा हॅकिंगचा प्रकार होता, असे जाहीर करण्यात आले. पराग अग्रवाल यांच्या रूपाने भारतीय तंत्रज्ञ ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त झाल्याला जेमतेम बारा-तेरा दिवस होत नाहीत, तोच हा प्रकार घडला हादेखील एक योगायोग. 

तेव्हा, आम्ही अहोरात्र पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात असतो व हा प्रकार लक्षात येताच लगेच दुरुस्ती करण्यात आली, असे ट्विटरकडून सांगण्यात आले. सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या घटनेची चौकशी केली जाईल, असे घोषित केले. या निमित्ताने क्रिप्टोकरन्सीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला हे महत्त्वाचे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांच्याच ट्विटर अकाउंटला हात घालण्यामागे हॅकर्सचा काय हेतू असावा, हे स्पष्ट झाले. क्रिप्टोकरन्सी हा अशा अनेक घटनांच्या रूपाने समोर आलेल्या गंभीर विनोदाचा केंद्रबिंदू आहे. खुद्द मोदींचीच वेबसाइट व ट्विटर खाते गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हॅक झाले होते. तेव्हाही कोविड विषाणू संक्रमणाविरोधात लढाईसाठी उभारल्या जाणाऱ्या निधीमध्ये क्रिप्टोच्या स्वरूपात निधी स्वीकारला जाईल, असे ट्वीट करण्यात आले होते. त्याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, तेव्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले जो बायडन, तो प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस्, टेस्लाचे संस्थापक एलन मस्क आदी मान्यवरांचे ट्विटर अकाउंट असेच हॅक करण्यात आले होते. त्यांच्या नावाने केलेल्या ट्वीट्समध्ये दिलेल्या लिंकवर बिटकॉइन जमा केले तर दुप्पट मोबदला मिळेल, असे सांगितले गेले होते. इतकेच कशाला थेट ट्विटरसाठी काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवरही हॅकर्सनी सामूहिक हल्ला चढविला होता. 

बिटकॉइनसारखी क्रिप्टोकरन्सी हे या सगळ्या सायबर हल्ल्यांचे मध्यवर्ती सूत्र आहे, हे लक्षात घेतले तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. एखाद्या राष्ट्रप्रमुखांच्या, प्रतिष्ठित राजकारणी, व्यावसायिक, उद्योजक किंवा कलावंतांच्या म्हणण्यावर लाखो, कोट्यवधी लोक विश्वास ठेवतात. हॅकिंगच्या रूपाने सायबर गुन्हेगार त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून असे काही पोस्ट करतात तेव्हा गोंधळ उडतो. अशा खात्यांना जास्तीची सायबर सुरक्षा आवश्यक ठरते. चुकीच्या माहितीचा प्रचंड प्रमाणावर प्रसार व दुष्परिणाम टाळणे गरजेचे ठरते. वर उल्लेख केलेल्या घटनांमधील क्रिप्टोकरन्सीचा सामाईक संदर्भ पाहता, या आभासी चलनाचा कारभार पाहणारे हातघाईवर आल्याचे स्पष्टपणे जाणवते. अलीकडच्या काळात क्रिप्टोकरन्सीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचा या हातघाईला संदर्भ आहे. भारताचे सरकार बिटकॉइनसारख्या सगळ्याच प्रकारच्या आभासी चलनावर नियंत्रण ठेवण्याचा, त्यासाठी आवश्यक ते कायदे करण्याचा प्रयत्न करीत आहे. रिझर्व्ह बँकेनेही तसा इरादा जाहीर केला आहे. मुळात त्याच्या विनिमयासाठी मान्यताप्राप्त चलन खर्च होत असतानाही वरवर आकर्षक वाटणारे, जणू विज्ञानाचाच नवा आविष्कार आहे, अशी ज्याची भलामण केली जाते ते हे चलन सरकार नावाच्या व्यवस्थेच्या नियंत्रणाबाहेर आहे. 

देशाच्या प्रगतीला, विकासाच्या वाटचालीला सध्या त्याचा काही फायदा नाही. उलट तरुण पिढी या चलनाच्या आकर्षणापायी जणू वेडावली आहे. एका वर्गामध्ये असे चलन आपल्या मालकीचे असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनू पाहात आहे. अशा वेळी थेट पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून बिटकॉइनशी संबंधित ऑफर ट्विट करण्यामागे थेट सरकारलाच इशारा देण्याचा प्रयत्न दिसतो. तुम्ही आमच्या व्यवहारात हस्तक्षेप कराल, त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कराल तर असे सायबर हल्ले होतील, हा त्या इशाऱ्याचा गर्भितार्थ आहे. म्हणून मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक करण्याची घटना गंभीरपणे हाताळायला हवी. त्याची सखोल चौकशी करून सायबर चाच्यांचा शोध घ्यायला हवा.

Web Title: editorial on pm narendra modi twitter account hacking cryptocurrency bitcoin tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.