पी. के. काय करणार..?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:24 AM2021-07-16T08:24:04+5:302021-07-16T08:25:02+5:30
Prashant kishore : चित्रपटाप्रमाणेच एक नवा पी.के. (प्रशांत किशोर) राजकीय पटावर विविध शक्यता व्यक्त करतो. तो अंदाजही बांधतो. त्यासाठी सामुदायिक मानवी वर्तनाचा, सरकारकडून मतदारांच्या अपेक्षांचा आणि विविध राजकीय पक्ष तसेच जातीय-धार्मिक समुदायांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतो.
पी.के. चित्रपटातील नायक आमीर खान परग्रहावरून येतो आणि पृथ्वीतलावरील मानवी व्यवहारातील विरोधाभास पाहून अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. नकळत आपणही अशा अनेक गोष्टी करत असतो, याच्या जाणिवेने प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडतो. तसाच एक नवा पी.के. (प्रशांत किशोर) राजकीय पटावर विविध शक्यता व्यक्त करतो. तो अंदाजही बांधतो. त्यासाठी सामुदायिक मानवी वर्तनाचा, सरकारकडून मतदारांच्या अपेक्षांचा आणि विविध राजकीय पक्ष तसेच जातीय-धार्मिक समुदायांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून अंदाज व्यक्त करतो. २०१७ मध्ये प्रशांत किशोर यांनी (पी.के.) काँग्रेस पक्षाबरोबर काम करीत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरविली आणि ती पूर्णत: फसली होती. त्याला काँग्रेसचे नेतृत्व आणि संघटन पातळीवरील कामाला दोष दिला जातो.
पंजाबमध्ये काँग्रेस, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्ष, तामिळनाडूत द्रमुक, बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि २०१४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपबरोबर प्रशांत किशोर यांनी व्यूहरचनाकार म्हणून काम केले आहे. अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेसह पाच राज्य विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाबरोबर सुमारे दोन वर्षे काम करून या पक्षाला दणदणीत यश मिळवून दिले. दहा वर्षांच्या सत्तेनंतर ममता बॅनर्जी यांचा विजय होणार नाही, शिवाय भाजपने पूर्ण ताकद लावून धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला होता. भाजपचे पारडे जड आहे, असे वाटत असताना तृणमूल काँग्रेसच विजयी होईल, दोनशेहून अधिक जागा मिळतील आणि भाजपला शंभरपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला होता.
निवडणुका सुरू होताच बंगाली भाषा, माणूस तसेच संस्कृतीचा विषय मुख्य प्रचार प्रवाहात आणण्याची त्यांची नीती योग्य ठरली. तेव्हापासून प्रशांत किशोर यांची चर्चा जोरदार होऊ लागली. शिवाय त्यांनी बंगालचा अंदाज चुकला तर व्यूहरचना आखून देण्याचा व्यवसाय सोडून देण्याची घोषणाही केली होती. राजकीय नेत्यांपेक्षा प्रशांत किशोर यांच्याच मुलाखती अधिक गाजत होत्या. बिहार राज्यातून आलेले प्रशांत किशोर यांनी आपली राजकीय विचारधारा कधी स्पष्ट केलेली नाही. भाजप, काँग्रेस, जनता दलासह अनेक राजकीय पक्षांसाठी त्यांनी काम केले असल्याने त्यांच्या राजकीय मताविषयी जनतेच्या मनात संभ्रमच आहे. ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरून त्यांनी अलीकडे अनेक राजकीय नेत्यांशी चर्चा करण्याचा सपाटा लावला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आदींशी चर्चा केली; पण कोणत्या पक्षासाठी, कोणत्या निवडणुकीसाठी व्यूहरचनाकार म्हणून काम करणार याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे पी. के. (प्रशांत किशोर) नेमके काय करू आणि काय साध्य करू इच्छितात, हे स्पष्ट होत नाही.
गांधी कुटुंबीयांना भेटताच ते काँग्रेस पक्षात सामील होतील, अशा वावड्या उठल्या, शरद पवार यांच्याशी तीन बैठका केल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतिपदासाठी त्यांना विरोधी पक्षांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास भाग पाडण्यात येईल, अशी चर्चा झाली. काँग्रेस पक्षात सामील होणे आणि राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता पवार यांनी फेटाळली आहे. आता पी.के. काय करणार? निवडणुकीतील व्यूहरचना, त्यातील पक्षांची भूमिका निश्चित करणे, त्याआधारे त्या पक्षाला विजयापर्यंत पोहोचविण्यास मदत करणे, आदी गोष्टी मागे पडून पी.के. थेट राजकारणात उडी घेणार का? यापूर्वी त्यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. त्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांना देण्यात आले होते. परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावरील पी. के. यांची भूमिका न पटल्याने नितीशकुमार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. ते भाजपविरोधी आहेत, असेदेखील स्पष्ट वाटत नाही.
काँग्रेस पक्षात जाण्यापेक्षा व्यूहरचनाकार म्हणून काम केल्याने त्यांच्या मतास अधिक मूल्य राहील. पी. के. यांच्या नावाचा आज जो दबदबा आहे, तो निवडणुकीचे व्यूहरचनाकार म्हणून. ती भूमिका महत्त्वपूर्ण आहे; पण एखादी अभ्यासू व्यक्ती आपली राजकीय मते बनवून समाजासाठी किंवा देशासाठी ठरावीक भूमिका घेऊ शकते. एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेल्या सुधींद्र कुलकर्णी भाजपमध्ये प्रवेश करून वरिष्ठ पातळीवर धोरणनिश्चितीचे कार्य करीत होते. पी.के. यापुढे काय करणार याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे.