संपादकीय: पंजाबचा भयसूचक खेळ; पुन्हा पेटला तर देशाला अजिबात परवडणारे नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:42 AM2023-02-28T07:42:00+5:302023-02-28T07:42:55+5:30

अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर शस्त्रधारी हजारोंचा जमाव अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी चालून गेल्याची गुरुवारची दृश्ये तर देशवासीयांना धडकी भरवणारी आहेत.

Editorial: Punjab's horror game; If it burns again, the country cannot afford it at all, amrutpal singh issue | संपादकीय: पंजाबचा भयसूचक खेळ; पुन्हा पेटला तर देशाला अजिबात परवडणारे नाही

संपादकीय: पंजाबचा भयसूचक खेळ; पुन्हा पेटला तर देशाला अजिबात परवडणारे नाही

googlenewsNext

काँग्रेस आणि अकाली दलाच्या आलटून-पालटून सत्तेचा क्रम संपुष्टात आणणारे, निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठे यश देणारे पंजाब गेले काही दिवस अत्यंत भयसूचक घटनांमुळे चर्चेत आले आहे. हे राज्य धार्मिक, राजकीय, सामरिक, आर्थिक अशा सगळ्याच दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाचे असल्यामुळे स्वतंत्र देशाची मागणी अधूनमधून हिंसक पद्धतीने समाेर येणे गंभीर आहे.

अमृतसर जिल्ह्यातील पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर शस्त्रधारी हजारोंचा जमाव अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी चालून गेल्याची गुरुवारची दृश्ये तर देशवासीयांना धडकी भरवणारी आहेत. एरव्ही किरकोळ गुन्ह्यातही बळाचा वापर करणारी पोलिस यंत्रणा जमावाच्या दांडगाईपुढे झुकली. दुसऱ्या दिवशी त्या आरोपीची सुटका झाली. त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता, अशी कबुली देऊन एफआयआर रद्द केला गेला. त्या जमावाचे नेतृत्त्व करणारा अमृतपाल सिंग ‘वारिस पंजाब दे’ नावाच्या संघटनेचा म्होरक्या आहे आणि ही संघटना खलिस्तानची मागणी करते. अभ्यासकांच्या मते आता जे घडते आहे ते सत्तरच्या दशकाची पुनरावृत्ती आहे. त्यातून जे पेरले गेले त्याचे भयावह पीक ऐंशीच्या दशकात देशाने अनुभवले. पंजाबने कधी दिल्लीचे वर्चस्व मान्य केलेले नाही. तिथला शिखांचा स्वाभिमान धार्मिकतेच्या कोंदणात आहे. प्रारंभीची अनेक वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिलेले प्रतापसिंग कैरो यांची १९६५ साली हत्या झाली. त्यानंतर पंजाबमध्ये अस्थिरता आली. ग्यानी झैलसिंग दिल्लीच्या हातचे बाहुले होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात फुटीरवादी गट सक्रिय झाले होते. आनंदपूर साहिब येथे स्वतंत्र खलिस्तानचा ठराव झाला. तेव्हाही असेच पोलिसांच्या ताब्यातल्या अपराध्यांना सोडवून नेले जायचे. फरक इतकाच की, तेव्हा पोलिस अगतिक दिसायचे. आता गुन्हाच खोटा असल्याची कबुली उजळमाथ्याने दिली जाते. आणिबाणीनंतर सत्तेवर आलेले प्रकाशसिंह बादल यांचे सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केल्याचा राग पंजाबने मनात धरला. झैलसिंगांच्या काळातच जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा उदय झाला होता. स्वत: भिंद्रनवालेने कधी खलिस्तानची उघड मागणी केली नाही. मात्र, अमृतपाल सिंगच्या तोंडातून बाहेर पडणारा पहिला शब्द खलिस्तान असतो.

अनेक दहशतवादी हल्ले, त्याला सीमेपलीकडून फूस, विमान अपहरण, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या, देशभर शीखविरोधी दंगली अशा घटनाक्रमात पेटत्या पंजाबने देशाला दिलेल्या जखमांचे व्रण आजही कायम आहेत. जवळपास दहा-बारा वर्षे हा प्रश्न धगधगत राहिला. हजारोंचे बळी गेले. त्यात देशाच्या पंतप्रधान, लष्करप्रमुखांचाही समावेश होता. इतके होऊनही आपण इतिहासापासून काही घेतल्याचे दिसत नाही. अमृतपाल सिंग थेट गृहमंत्री अमित शाह यांना इंदिरा गांधींसारखी अवस्था करण्याची धमकी देतो. तरी पंजाब पोलिस किंवा देशाचे गृहखाते तातडीने पावले उचलत नाही, हे चिंताजनक आहे. अमृतपाल सिंग प्रकरणी पडद्यामागे काहीतरी विचित्र घडल्याची शंका आहे. तीस वर्षांचा हा तरुण आताच दुसरा भिंद्रनवाले म्हणून ओळखला जातो. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चुलत्याचा वाहतुकीचा व्यवसाय सांभाळायला दुबईला गेलेल्या अमृतपाल सिंगचा दहा वर्षांनंतर पंजाबच्या समाजकारण व राजकारणातील प्रवेशही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

शेतकरी आंदोलनात संशयास्पद भूमिका व अभिनेता खा. सनी देओलसोबतच्या छायाचित्रांमुळे चर्चेत आलेला, नंतर रस्ते अपघातात मरण पावलेला अभिनेता दीप सिद्धू याचा हा समर्थक. ‘वारिस पंजाब दे’ ही संघटना दीपची. तिचे अध्यक्षपद अमृतपाल सिंगकडे कसे आले, हे गूढ आहे. दीपशी त्याची कधी समोरासमोर भेट झाली नाही. परंतु, दीपच्या पहिल्या स्मृतिदिनी मोठा मेळावा झाला व संघटनेचे अध्यक्षपद अमृतपाल सिंगकडे दिले गेेले. तिथेच त्याने उर्वरित आयुष्य कट्टर शीख बनून जगण्याची प्रतिज्ञा घेतली. त्याचा दस्तर बंदी म्हणजे पंजाबी पगडी बांधण्याचा सोहळा भिंद्रनवालेच्या रोडे गावातच झाला. त्याला लाखोंचा समुदाय जमला होता. या घटनाक्रमाकडे पंजाब सरकारचे तसेच दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांचे पुरेसे लक्ष आहे की नाही, की त्याऐवजी आप आणि भाजपला दिल्लीचे महापौरपद अधिक महत्त्वाचे आहे, हा प्रश्न आहे. लक्ष देणे याचा अर्थ राजकीय पक्षांनी विरोधकांना जबाबदार धरणे नव्हे. देशाचे ऐक्य, अखंडता, शांतता राजकारणापेक्षा महत्त्वाची आहे, हे वेळीच ध्यानात घ्यायला हवे. पुन्हा पंजाब पेटणे देशाला अजिबात परवडणारे नाही.

Web Title: Editorial: Punjab's horror game; If it burns again, the country cannot afford it at all, amrutpal singh issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Punjabपंजाब