संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 05:52 AM2023-04-29T05:52:32+5:302023-04-29T05:53:11+5:30
अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले.
लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे संख्याबळ हाच जर नेत्याचा करिष्मा मोजण्याचा एकमेव निकष असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यात डावे ठरतील. संख्याबळात त्यांच्यापेक्षा काही पक्ष पुढे असतीलही, मात्र त्या पक्षाचे नेते करिष्मा दाखवण्यात अगदीच किरकोळ ठरतात. राज हे केवळ राजकारणी नाहीत. ते व्यंगचित्रकार आहेत. दिमाखदार सोहळे आयोजित करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. श्रोत्यांना खिळवून ठेवणारी वाणी व हजरजबाबीपणाचे वरदान त्यांना लाभले आहे. राज यांची शैली खिळवून ठेवणारी असल्याने सध्याच्या डिजिटल युगात त्यांना खणखणीत टीआरपीही आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार व राजकीय वारसा त्यांना लाभला आहे. लोकमतने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात राज यांची मुलाखत आयोजित केली हे कळताच वरळीच्या एनएससीआय डोममध्ये तुफान गर्दी उसळली. खा. अमोल कोल्हे आणि बँकर अमृता फडणवीस यांनी राज यांची मुलाखत घेतली. गेल्या दोन दिवसांत सोशल मीडियाच्या कट्ट्यांवर मुलाखतकारांच्या या निवडीवरून काही ट्रोलर्सनी चर्चेचा किस पाडला खरा, मात्र राज ठाकरे यांची खणखणीत मुलाखत अवघे मराठी चर्चाविश्व व्यापून उरली, हे मात्र खरे!
अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले. केंद्रीय यंत्रणांच्या जाचापासून घराणेशाहीपर्यंत आणि मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळवून देण्यापासून मनसेच्या ब्ल्यू प्रिंटपर्यंत सर्वच प्रश्न विचारले गेले. मुलाखतकारांनी हातचे काहीच राखून न ठेवता विचारलेल्या सर्वच प्रश्नांना राज यांनीही खुलेपणाने उत्तरे दिली. केवळ मराठी... मराठी... न करता आपण यापुढे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेणार हे राज यांनी स्पष्ट केले. मात्र हिंदुत्वाचा अभिमान बाळगताना उन्माद नको ही मध्यममार्गी भूमिका राज यांनी घेतली व ती स्वागतार्ह आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पडल्यानंतर झालेल्या दंग्यांना असलेली विविध घटनांची पार्श्वभूमी त्यांनी उलगडून दाखवली. राज यांनी यापूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’ या माध्यमातून अनेक हल्ले केले होते. आता राज यांची भूमिका मवाळ झाल्यामुळे या विषयावरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होणे स्वाभाविक होते. राज यांनी आपल्या बदललेल्या भूमिकांच्या कारणमीमांसेला खुबीने बगल देताना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा संस्कार आपल्यावर कसा जुना आहे व मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत याच माध्यमातून आपण त्या काळात थेट शिवसेनाप्रमुखांसमोर कसे प्रेझेंटेशन दिले होते, याकडे लक्ष वेधले. विषय झोपडपट्ट्यांचा असो की टोल नाक्यांचा किंवा ब्ल्यू प्रिंटचा; राज यांनी चिकाटीने पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्रातील टोल नाक्यांवरील बेलगाम वसुलीस त्यांच्या आंदोलनामुळे काही प्रमाणात लगाम लागला. विकासाची ब्ल्यू प्रिंट राज यांनी तयार केली. मात्र नाशिकमध्ये विकासाचे त्यांनी निर्माण केलेले मॉडेल मतदारांच्या पचनी पडले नाही, ही खंत त्यांच्या मनात आहे हे जाणवले. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख यांच्या संस्कारात घडलेल्या राज यांच्याकरिता शिवसेना ही दुखरी जागा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीबाबत राज यांना थेट विचारले असता त्यांनी शिवसेना हा विषय आपल्याकरिता संपल्याचे जाहीर केले.
ईडी, सीबीआय यांच्या दडपशाहीवरून राहुल गांधींपासून अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत अनेक नेते तोंडसुख घेत असताना राज यांनी संयत भूमिका घेतली. केंद्रीय यंत्रणांचा जाच आहे, पण भ्रष्टाचाराचे नाले तुंबलेले आहेत. ते साफ व्हायला हवेत. देशाच्या जडणघडणीत योगदान असलेल्या टाटा उद्योगसमूहाच्या रतन टाटा यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले होते, याची आठवण करून देताना ज्याच्या हाती सत्तेची लाठी असते तो तिचा वापर स्वार्थाकरिता करतो हेच अधोरेखित केले. शिवसेना फोडूनही सत्तेचा सुखी संसार करता न आलेल्या भाजपचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना डोळे मारणे सुरू असताना मनसेला गृहीत धरले जाण्याची नाराजी राज यांनी लपवली नाही. भक्कम संघटना बांधणीत आजवर आलेले अपयश आणि कृतिशीलतेची वानवा यावरून राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका होत असते, तरीही जनमानसाला - विशेषतः तरुण वर्गाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण आहे हे राज यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. ते आकर्षण कशातून येते, या प्रश्नाचे उत्तर हे या मुलाखतीचे फलित होते, हेच खरे !