संपादकीय: मेंदूतली घाण आधी काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:29 AM2021-08-24T06:29:34+5:302021-08-24T06:34:03+5:30
महाराष्ट्राच्या आग्नेय टोकावर, चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम जिवती तालुक्यात वणी खुर्द नावाच्या छोट्याशा गावात भानामती व करणीच्या संशयावरून चाळिशी, पन्नाशी, साठी ओलांडलेल्या महिला व वृद्धांना चौकात झाडाला, खांबाला बांधून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. सातजण त्या मारहाणीत जखमी झाले.
लोकांच्या डोक्यातला अंधश्रद्धेचा कचरा बाहेर काढण्यासाठी आयुष्य वेचता वेचता त्यासाठीच जीव गमावलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला शुक्रवारी, २० ऑगस्टला आठ वर्षे पूर्ण झाली. कायद्याने मिळणाऱ्या शिक्षेपर्यंत त्यांच्या मारेकऱ्यांना ज्यांनी न्यायचे अशा सगळ्यांनी, सूत्रधार अजून मोकाट असल्याची खंत न बाळगता कोरडी श्रद्धांजली वाहिली. नेमके याचवेळी महाराष्ट्राच्या आग्नेय टोकावर, चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम जिवती तालुक्यात वणी खुर्द नावाच्या छोट्याशा गावात भानामती व करणीच्या संशयावरून चाळिशी, पन्नाशी, साठी ओलांडलेल्या महिला व वृद्धांना चौकात झाडाला, खांबाला बांधून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. सातजण त्या मारहाणीत जखमी झाले.
गावातले म्होरके संशयावरून दलितांच्या एक-दोन कुटुंबातल्या वृद्ध बायाबापड्यांना बांधून मारत असताना अख्खे गाव तो प्रकार हात बांधून पाहत होते. किंबहुना आनंद घेत होते. घटनेला चोवीस तास उलटल्यानंतरही पोलिसांनी फार काही केले नाही. उलट घटना बाहेर कळू नये म्हणून किंवा मारहाण झालेले लोक अनुसूचित जातींचे असल्याने प्रकरणाला जातीय वळण मिळू नये म्हणून गावची वेस बंद करून गावात येणे-जाणे बंद करून टाकले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करायलाही छत्तीस तास उलटून जावे लागले. ‘लोकमत’ला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसांना खडबडून जाग आली. रात्रभर जागून पोलिसांनी आता कुठे बारा गावकऱ्यांना अटक केली आहे.
मारहाण झालेले लोक दलित समुदायातील असले तरी मारहाण करणाऱ्यांमध्ये सगळ्याच जातींचे लोक असल्याने ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान प्रकरणाला जातीय संघर्षाचे वळण तरी मिळणार नाही. तथापि, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन गावकऱ्यांनी निरपराध दुबळ्या म्हाताऱ्याकोताऱ्यांना जीवघेणी मारहाण करण्याची बाब त्यापेक्षा गंभीर आहे. हा प्रश्न केवळ पोलिसांचा, कायदा-सुव्यवस्थेचा किंवा गावागावातल्या जातीय तंट्यांचा राहत नाही. त्या पलीकडे अशिक्षित, अज्ञानी समाजातील भोळेपणा, अंधश्रद्धा, अघोरी प्रथा-परंपरांचा पगडा या समस्या किती गंभीर आहेत व त्यांच्या निराकरणासाठी अजूनही किती कष्ट घ्यावे लागणार आहेत, हे दर्शविणारी ही घटना आहे. त्यासाठी कायदा तयार व्हावा म्हणून ज्या दाभोलकरांनी अपार कष्ट घेतले, त्यांच्याच स्मृतिदिनी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडावी हा यातील दुर्दैवी योगायोग! भूतप्रेत, भानामती, करणी, काळी जादू, जादूटोणा हे सगळे भ्रम आहेत. आंधळ्या श्रद्धा आहेत. नरबळी दिल्याने गुप्तधन मिळत नाही तर न्यायालयात फाशी होते. जे या अघोरी प्रथांना बळी पडतात ते खरेतर मानसिक रोगी असतात. अंगात येण्याचा प्रकार त्यातून घडतो. बऱ्याच वेळा अशा घटनांना शेजाऱ्यापाजाऱ्यांमधील किरकोळ वाद, जमीन किंवा अन्य मालमत्तांच्या मालकीचे वाद, गावकीतले कसले तरी भांडण अशांची पृष्ठभूमी असते. त्यातील दुबळे कुटुंब किंवा व्यक्तीला आयुष्यातून उठविण्यासाठी, संपूर्ण गाव त्या व्यक्ती-कुटुंबाविरोधात उभे करण्यासाठी करणी, भानामती, जादूटोण्याचा आधार घेतला जातो.
महिला अशा घटनांमध्ये सोपे लक्ष्य बनतात. त्यांना चेटकीण, डाकीण, करणीवाली बाई ठरविले जाते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली तीन-चार दशके प्रचंड परिश्रम घेऊन गावेच्यागावे या गर्तेमधून बाहेर काढली. असे प्रकार सिद्ध केले तर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ते बक्षीस कुणीही मिळवू शकलेले नाही. एका बाजूला रोज चंद्रावर, मंगळावर वस्ती किंवा केवळ शौक म्हणून अंतराळ पर्यटनाच्या बातम्या आणि दुसऱ्या बाजूला डोक्यात करणी, भानामतीचे खूळ घेऊन हातात दगड, काठ्या घेऊन मारहाणीचे प्रकार, हा एकविसाव्या शतकातील दुसरे दशक उलटून गेल्यानंतरचा अत्यंत चिंताजनक असा विरोधाभास आहे. तो संपविण्यासाठी पुन्हा एकदा गावागावात जाण्याची, लोकांना या दलदलीतून बाहेर काढण्याची गरज आहे. परंतु, अशा समाजसुधारणेच्या कामाला वाहून घेतलेल्या चळवळी क्षीण झाल्या आहेत. कार्यकर्ते दुर्मीळ झाले आहेत. प्रबोधनाची वाट अधिक खडतर झाली आहे. अशावेळी सरकार, प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात हात घालून एकत्र यायला हवे. गावे स्वच्छ व्हायची तेव्हा होतील, आधी ही डोक्यात, मेंदूत साचलेली घाण दूर होणे गरजेचे आहे.