राजकीय साठमारीत भरडली गेली एक हसीना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:02 AM2020-10-09T05:02:02+5:302020-10-10T11:32:54+5:30
रिया जामिनावर सुटली तरी बॉलिवूडमधील तिच्या करिअरचे काय होणार ते येणारा काळ ठरवेल. भविष्यात या विषयावरच चित्रपट येईल व त्यात अभिनयाची संधी तिला मिळू शकेल. कदाचित ‘बिग बॉस’ अथवा तत्सम रिअॅलिटी शोचे दार उघडू शकते. राजकीय ऑफरही नाकारता येत नाही.
रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत हे रूपेरी पडद्यावरील कलाकार. चित्रपटात कदाचित रियाने कोर्टकचेरीच्या दृश्यात उत्कट अभिनय केला असेल. मात्र सुशांतसिंहच्या आत्महत्येला राजकीय वळण लागेपर्यंत कदाचित रियाला जाणवले नसेल की, कधीकाळी खऱ्याखुऱ्या कोर्टात आरोपी म्हणून उभे राहण्याची, जेलमधील कुबट व अंधारे जीवन जगण्याची, मीडियापासून तोंड लपवून पळण्याची वेळ आपल्यावर येईल. मात्र या दिव्यातून रिया गेली आणि अखेर महिनाभरानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. अर्थात अजून दीर्घकाळ तिला या दिव्यातून वाटचाल करायची आहे.
सुशांतसिंहची आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. या आत्महत्येकरिता रियाला जबाबदार धरले गेले. सुशांतच्या पैशावर तिने मजा मारली, असा आरोप केला गेला. याखेरीज सुशांतला रिया अमली पदार्थ पुरवत होती, असे आरोप केले गेले. रियाने सुरुवातीलाच या आरोपांचा इन्कार केला होता. मात्र सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या चौकशीचा ससेमिरा तिच्या मागे लागला. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची दिल्लीतील ‘एम्स’च्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सकृतदर्शनी सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्या असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सुशांतच्या हत्येकरिता रिया जबाबदार असल्याच्या तिच्यावरील आरोपाची धार काहीअंशी बोथट झाली.
रियाने सुशांतच्या पैशावर मजा मारली हा आरोप सिद्ध होईल, असे वारेमाप खर्चाचे पुरावे शोधून काढण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे राहता राहिला सुशांतला अमली पदार्थ पुरवल्याचा आरोप. मात्र त्या आरोपांकरिता रियाला महिनाभर तुरुंगात कोंडून ठेवल्यानंतर जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, रिया हिने अमली पदार्थांकरिता पैसे पुरवले, बेकायदा कृतींना आश्रय दिला किंवा अमली पदार्थांच्या टोळीत तिचा सहभाग असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे तिला जामीन मंजूर केला. एनसीबीने रियाच्या जामिनाला विरोध करताना रियासारख्या सेलिब्रिटींच्या बाबत न्यायालयाने कठोर भूमिका घ्यायला हवी, कारण तरुण पिढी त्यांचे अनुकरण करते, असा युक्तिवाद केला. मात्र कायद्यासमोर सर्व समान असल्याची आठवण देत तो फेटाळला.
एनसीबीचा हा युक्तिवाद म्हणजे ही तपासयंत्रणा संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत गेल्याचा दाखला आहे. कदाचित रा. स्व. संघाच्या विचारधारेचा प्रभाव असलेली काही मंडळी ही तपासयंत्रणा चालवत असल्याचाही हा परिणाम असू शकतो. जेव्हा कुठलेही सरकार किंवा सरकारी यंत्रणा संस्कृती रक्षकाचा बुरखा परिधान करते तेव्हा तो कायद्याच्या कसोटीवर असाच टराटरा फाटतो. रियाने सुशांतला अमली पदार्थांचे सेवन करण्यास पैसे पुरवल्याचे सिद्ध झाले तर कायद्यातील तरतुदीनुसार, तिला २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला केवळ एक वर्षांची शिक्षा आहे. कायद्यातील ही तरतूद अतार्किक व अवाजवी असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. कायद्यातील विसंगती ही गोंधळात विधेयके रेटून मंजूर करण्याचे परिणाम आहेत.
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याचे अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांशी निकटचे संबंध असल्याने त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केलेला नाही. भविष्यात रियाची अमली पदार्थांच्या जगाशी असलेली जवळीक सिद्ध करणारे पुरावे एनसीबी गोळा करू शकली तर तिच्या अडचणी वाढतील. शिवाय कोर्टातून सुटका मिळेपर्यंत तिला लढावे लागेल. सुशांतचे प्रकरण बिहार निवडणुकीच्या तोंडावर तापवले गेले. मात्र, आपली प्रतिष्ठा पणाला लावणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर झालेली नाही. आता रियाला जामीन मिळाला. त्यामुळे सुशांतचे प्रकरण राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरणार नसल्याचे हे संकेत आहेत का? असा प्रश्न पडतो. सुशांतवर जिवापाड प्रेम करणारी रिया नावाची ‘हसीना’ या साठमाऱ्यांमध्ये भरडली गेली, हे खरे.